esakal | या नेत्‍याच्या आमदारकीमुळे शिवसेनेला बळ
sakal

बोलून बातमी शोधा

chandrakant raghuvansh

पूर्वीच्या धुळे-नंदुरबार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, तापी खोरे विकास महामंडळाचे अध्यक्ष, तीन वेळेस विधान परिषदेचे आमदार आणि घरातील (स्व.) बटेसिंहदादा रघुवंशी यांचा राजकीय वारसा यामुळे खानदेशात चंद्रकांत रघुवंशी यांचे वजनदार नेतृत्व म्हणून नाव आहे.

या नेत्‍याच्या आमदारकीमुळे शिवसेनेला बळ

sakal_logo
By
धनराज माळी

नंदुरबार : विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा देत वर्षभरापूर्वी शिवबंधन बांधलेल्या माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या शिवसेना प्रवेशाने शिवसेनेचे वजन वाढले आहे. मात्र शिवसेनेने त्यांना दिलेला शब्द खरा ठरवत राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या आमदारकीसाठी नावाची शिफारस केली आहे. त्यामुळे श्री. रघुवंशी यांना मिळणाऱ्या आमदारकीने धुळे-नंदुरबार जिल्‍ह्यात शिवसेनेचे बळ दुपटीने वाढणार आहे. 

पूर्वीच्या धुळे-नंदुरबार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, तापी खोरे विकास महामंडळाचे अध्यक्ष, तीन वेळेस विधान परिषदेचे आमदार आणि घरातील (स्व.) बटेसिंहदादा रघुवंशी यांचा राजकीय वारसा यामुळे खानदेशात चंद्रकांत रघुवंशी यांचे वजनदार नेतृत्व म्हणून नाव आहे. काँग्रेसला खानदेशात त्यांच्यामुळेच भक्कम नेतृत्व लाभले, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही, असा वजनदार नेता राजकारणाचा श्रीगणेशा ज्या पक्षातून झाला. त्या पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केल्याने साहजिकच शिवसेनेचे वजन धुळे-नंदुरबार जिल्ह्यात वाढणार आहे. हे कोणी नाकारू शकणार नाही. कारण श्री. रघुवंशी यांचा काँग्रेसमध्ये सोबत असलेला राजकीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा जत्था टप्प्याटप्प्याने शिवसेनेत येऊ लागला आहे. सध्या प्रकृतीची अडचण, कोरोना आणि कोणतेही पद नसले तरी त्यांच्या प्रवेशानंतर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ. विक्रांत मोरे व आमशा पाडवी यांच्याशी समन्वय ठेवत शिवसेनेला वाढविण्याचे काम सुरू आहे. 

अविरत जनसेवा 
सध्या श्री. रघुवंशी माजी आमदार आहेत. तरी प्रशासनावरील दबाव, अधिकाऱ्यांशी असलेला सलोखा, नंदुरबारच्या गल्लीपासून मुंबईच्या मंत्रालयापर्यंत असलेले सलोख्याचे संबंध यामुळे जनसेवा अविरत करत आहेत. मात्र शेवटी पदालाच मान असतो. त्यामुळे शिवसेनेने योग्य वेळी, योग्य व्यक्तीला विधान परिषदेचे आमदार पद बहाल करण्याचा घेतलेला निर्णय नक्कीच शिवसेनेला बळ देणारा ठरणारा आहे. त्यामुळे जिल्ह्यात पुढील निवडणुकांमध्ये ग्रामपंचायतींपासून, सहकार व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेनेचे वाढते वर्चस्व राहील, यात शंका नाही. 

चंदूभय्यांनाही शब्द पाळावा लागणार 
शिवसेना नेते तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द पाळत विधान परिषदेच्या आमदारकीसाठी नाव दिले. तसेच श्री. रघुवंशी यांनीही शिवसेनेचे जिल्ह्यातून किमान दोन आमदार देण्याचा शब्द दिला आहे. त्यामुळे चंदूभय्यांना तो शब्द पाळण्यासाठी शिवसेना तळागळापर्यंत पोचविण्यासाठी झोकून काम करावे लागणार आहे. शिवसेना वाढली, तरच पुढच्या विधानसभा निवडणुकीत ‘मातोश्री’वर दोन आमदार पाठविता येतील. त्यामुळे मिळालेल्या संधीचे सोने करून ते शिवसेनेचे बळ वाढविणार आहेत. हेही तेवढेच खरे. 

दिवाळी, वाढदिवसाची भेट 
शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी यांचा १२ नोव्हेंबरला म्हणजे येत्या गुरुवारी वाढदिवस आहे. तसेच पुढच्या आठवड्यातच दिवाळीही आहे. त्यातच शिवसेनेने विधान परिषदेच्या आमदारकीसाठी त्यांच्या नावाची शिफारस केली आहे. त्याचदरम्यान, राज्यपालांनी आमदारांच्या शपथविधीची घोषणा केली, तर चंद्रकांत रघुवंशी यांच्यासाठी हा दुग्धशर्करा योग ठरणार आहे. शिवसेनेकडून मोठी भेट ठरणार आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे