esakal | कोरोना रूग्‍णांचा आहारही नाही सोडला; काय आहे प्रकरण वाचा सविस्‍तर
sakal

बोलून बातमी शोधा

corona patient diet bill

जिल्हा रूग्णालयांमध्ये रूग्ण व त्यांच्यासोबतचा एक व्यक्ती किंवा नातेवाईकास जेवण दिले जाते. त्यासाठीचा ठेका नाशिक येथील छत्रपती शिवाजी महाराज स्वयंरोजगार संस्थेला देण्यात आला आहे. मार्च २०१९ पासून तीन वषार्साठी हा ठेका देण्यात आला आहे. त्यानुसार या संस्थेने ११ जिल्ह्यातील रूग्णालयांचे काम घेतले आहे.

कोरोना रूग्‍णांचा आहारही नाही सोडला; काय आहे प्रकरण वाचा सविस्‍तर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नंदुरबार : जिल्हा व ग्रामीण रूग्णालयांमधील रूग्णांना पुरविल्या जाणाऱ्या आहाराबाबतच्या बिलांमध्ये तफावत असून खोटी संख्या दाखवित लाखोचा मलिदा लाटलण्यात येत असल्याची माहिती उघडकीस आली आहे. अशा पुरवठादार संस्था व जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी आरटीआय कार्यकर्ते भरत देशमुख यांनी केली आहे. 

श्री. देशमुख यांनी आज पत्रकार परिषद घेत पत्रकारांना माहिती दिली. पत्रकाराशी संवाद साधताना श्री. देशमुख म्हणाले,‘ जिल्हा रूग्णालयांमध्ये रूग्ण व त्यांच्यासोबतचा एक व्यक्ती किंवा नातेवाईकास जेवण दिले जाते. त्यासाठीचा ठेका नाशिक येथील छत्रपती शिवाजी महाराज स्वयंरोजगार संस्थेला देण्यात आला आहे. मार्च २०१९ पासून तीन वषार्साठी हा ठेका देण्यात आला आहे. त्यानुसार या संस्थेने ११ जिल्ह्यातील रूग्णालयांचे काम घेतले आहे. या संस्थेला वर्क ऑडर्र दिली आहे. त्यानुसार जेवढे रूग्ण तेवढ्या रूग्णांसोबतच्या एका नातेवाईकाला जेवण देण्याचे नमूद केले आहे. त्यानुसार प्रति रूग्ण व व्यक्ती ग्रामीण रूग्णालयासाठी ११० व उपजिल्हा रूग्णालयासाठी १२० रूपये दर निश्चित करण्यात आला आहे. असे असतांना आहार सेवा पुरवितांना संबधित संस्था अधिकाऱ्यांच्या संगनमताने जास्तीचे बिले दाखवून आथिर्क घोटाळा करीत असल्याचे माहितीचा अधिकारात मिळालेल्या माहितीवरून स्पष्ट झाले आहे. 

रूग्ण कमी, नातेवाईक जास्त 
अनेक ठिकाणी रूग्ण संख्या व त्यांच्या नातेवाईकांची संख्या दुप्पट दाखविण्यात आली आहे. पाचशे रूग्ण असतील तर त्यांच्यासोबत पाचशे नातेवाईकांना जेवण दिले पाहिजे. मात्र प्रत्यक्षात रूग्णांपेक्षा त्यांच्या नातेवाईकांची संख्या जास्त दाखविण्यात आली आहे. संस्थेला आदेशात जर एकाच नातेवाईकाचे आहाराचे बिल मान्य केले जाण्याचे नमूद असतांना जास्तीचे नातेवाईकांची बिले मंजूर झालीच कशी ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशा प्रकारे खोटे बिले तयार करून आहार सेवेत लाखोचा भ्रष्टाचार केला जात आहे. नियमांचे उल्लंघन केले जात आहे असेही श्री.देशमुख यांनी सांगितले. 

धुळे-नंदुरबारसह ११ जिल्ह्यात ठेका 
केवळ हा प्रश्न धुळे किंवा नंदुरबार जिल्ह्याचा नसून या संस्थेला ११ जिल्ह्यातील आहार पुरवठ्याचा ठेका देण्यात आला आहे. त्याही ठिकाणची माहितीही मिळवित आहे असेही श्री. देशमुख म्हणाले. 

गुन्हा दाखल करण्याची मागणी 
श्री. देशमुख यांनी याबाबत नंदुरबार जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे तक्रार अर्ज सादर केला आहे. संबंधित संस्थेचे अध्यक्ष व संबंधित दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आल्याचेही श्री. देशमुख यांनी सांगितले.