नंदुरबार : ‘स्वॅब’चे ९७ अहवाल अजून प्रतीक्षेत 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 25 April 2020

स्वॅब’ नमुने घेतलेल्या व्यक्तींचे अहवाल अत्यंत संथ गतीने प्राप्त होत आहेत. दररोज सरासरी पाच ते नऊ जणांचे अहवाल येत असल्याने अहवाल ‘वेटिंग’ची संख्या वाढत चालली आहे. 

नंदुरबार : कोरोना पॉझिटिव्हचे रुग्ण जसजसे आढळून येत आहेत, तसतसे त्यांच्या संपर्कातील नागरिकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे ‘स्वॅब’ नमुने तपासणीची संख्याही वाढत आहे. गेल्या पाच दिवसांत ही संख्या झपाट्याने वाढली आहे. मात्र, ‘स्वॅब’ नमुने घेतलेल्या व्यक्तींचे अहवाल अत्यंत संथ गतीने प्राप्त होत आहेत. दररोज सरासरी पाच ते नऊ जणांचे अहवाल येत असल्याने अहवाल ‘वेटिंग’ची संख्या वाढत चालली आहे. 

नक्‍की पहा - साक्रीत 30 एप्रिलपर्यंत सर्व व्यवहार बंद 

नंदुरबार जिल्ह्यात पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण १७ एप्रिलला आढळून आला. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर त्या रुग्णाची ‘ट्रॅव्हल्स हिस्ट्री’ तपासून त्याच्या संपर्कातील नागरिकांना क्वारंटाइन करण्यात आले. त्यानंतर त्या रुग्णाच्या कुटुंबात कोरोना पॉझिटिव्ह निघाले. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्हची संख्या चार झाली होती. संपर्कातील नागरिकांची ‘स्वॅब’ नमुने तपासणी करण्यात आले. त्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयातील सहा कर्मचाऱ्यांचीही तपासणी करण्यात आली. त्यांचे अहवालही निगेटिव्ह आले. त्यानंतर शहादा येथील दोन व अक्कलकुवा येथील एक, असे तीन रुग्ण २२ एप्रिलला पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली. त्यात शहाद्यातील रुग्णाचा मृत्यू झाल्याने नागरिक अधिक सतर्क झाले. त्या शहाद्यातील तरुणाचा संपर्क परिसरातील गावांमध्ये होता. त्यामुळे तेथील ग्रामस्थांनीही स्वयंस्फूर्तीने ‘बंद’ पाळून त्या तरुणाच्या संपर्कातील व्यक्तीने तपासणी करून घेण्याचे आवाहन केले आहे. 

तपासणाऱ्यांची संख्या वाढती 
सात रुग्णांमुळे त्यांच्या संपर्कातील नागरिकांची ‘हिस्ट्री’ काढून त्यांची ‘स्वॅब’ नमनु तपासणी करण्यात येत आहे. त्यामुळे तपासणी करणाऱ्यांची संख्या गेल्या पाच दिवसांत झापाट्याने वाढली. आजअखेर २५७ जणांची तपासणी करण्यात आली आहे. मात्र, गुरुवारी (ता. २३) केवळ नऊ जणांचे अहवाल प्राप्त झाले. ते सर्व निगेटिव्ह आले. आता पुन्हा ९७ नागरिकांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे नमुने तपासणीची संख्या वाढते आहे. अहवाल मात्र संथ गतीने प्राप्त होत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य व्यक्तींमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar corona virsu swab 97 report pending