अक्कलकुवाच्या सीमेलगत कोरोना

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 16 April 2020

नंदुरबार जिल्हा हा गुजरात व मध्यप्रदेश राज्याचा दुवा आहे. पूर्वेस मध्यप्रदेश तर पश्‍चिमेस गुजरात आहे. तसे हे दोन्ही राज्य उत्तरेकडूनही नंदुरबार जिल्ह्याचा सीमेलगत आहेत. दुसऱ्या बाजूने नाशिक व धुळे जिल्ह्याच्या सीमा आहेत.

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या मध्यप्रदेश पाठोपाठ आता गुजरातमधून कोरोना नंदुरबार जिल्ह्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने गुजरातच्या डेडियापाडा, सेलंबा गावाचा सीमेवर कडक सुरक्षा तैनात केली आहे.

नंदुरबार जिल्हा हा गुजरात व मध्यप्रदेश राज्याचा दुवा आहे. पूर्वेस मध्यप्रदेश तर पश्‍चिमेस गुजरात आहे. तसे हे दोन्ही राज्य उत्तरेकडूनही नंदुरबार जिल्ह्याचा सीमेलगत आहेत. दुसऱ्या बाजूने नाशिक व धुळे जिल्ह्याच्या सीमा आहेत. उत्तर महाराष्ट्रात सीमावर्ती भागाला जोडलेली सर्वाधिक गावे नंदुरबार जिल्ह्यात आहेत. १६१ गावे इतर राज्य व परजिल्ह्याचा सीमेवर आहेत. काही दिवसापूर्वी धुळे, साक्री व मालेगाव येथे कोरोनाचे रूग्ण आढळून आले.  मध्यप्रदेशमधील सेंधवा येथेही रूग्ण आढळून आला आहे. तेथील स्थिती आटोक्यात येईपर्यत धुळे व साक्री येथे घटना घडल्या. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भितीचे सावट आहे. जिल्ह्यातील नागरिकांनीही आता गांभीर्याने घेतले आहे. त्यातूनच ग्रामसुरक्षा दलासाठी गावातीलच युवक पुढे आले आहेत.

दोन दिवसापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांचे संकेत
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड, पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी जिल्ह्याच्या सुरक्षेसाठी सर्वोतोपरी प्रयत्न करून उपाययोजना कठोर केली आहे. सीमावर्ती भागातील गावे व रस्ते सील केले आहेत. २२ सीमा तपासणी नाके बंद केले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. भारूड यांनी दोन दिवसांपूर्वीच जिल्ह्यात धोका नाही. मात्र जिल्ह्याला बाहेरील राज्याचा व इतर जिल्ह्यांकडून कोरोनाचा धोका आहे. त्यामुळे कोणीही गाफील राहू नये. असे सूचित केले होते.

उंबरठ्यावर कोरोना
डेडियापाडा व सेलंबा या सीमेलगत काही गावांमध्ये कोरोनाचे पॉझिटिव्ह रूग्ण आढळल्याची माहिती पुढे येत आहे. ही माहिती प्रशासनाला कळताच गुजरात सीमेलगत असलेले गव्हाळी, नवापाडा, तालांबा, काकडीआंबा, रामपूर,मिऱ्या, भादरीपाडा, शेंदवनपाडा या गावांमध्ये सीमा सुरक्षा कडक करण्यात आली आहे. त्या ठिकाणी अक्कलकुवा येथील गटविकास अधिकारी सी.के.माळी यांनी आज भेट देऊन तेथील ग्रामसुरक्षा दलांना आवश्‍यक त्यामार्गदर्शक सूचना देऊन ग्राम सुरक्षा दलाचा युवकांना कडक पाहरा ठेवण्याचे सांगितले आहे.

अजूनही वेळ गेलेली नाही...
मध्यप्रदेश मधील सेंधवा, धुळे, साक्री, मालेगाव नंतर आता गुजरात राज्याकडून नंदुरबार जिल्ह्याला कोरोनाचा धोका होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनो, अजूनही वेळ गेलेली नाही. नंदुरबार जिल्हा ग्रीन झोनमध्ये असला व जिल्हा अतंर्गत कोणताही धोका नसला तरी बाहेरून येणाऱ्या व बाहेर जाणाऱ्यांपासून घात होऊ शकतो. त्यामुळे काळजी घ्या, प्रशासनाचा सूचनांचे पालन करा. सतर्क राहा. बाहेर कोणाला जाऊ देऊ नका व बाहेरून कोणाला येऊ देऊ नका. घरातच थांबा, अन्यथा फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकेल. 

खापरला तीन दिवस जनता कर्फ्यू
अक्कलकुवा : नर्मदा जिल्ह्यात तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने अक्कलकुवा सीमेवर बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. खापरजवळच असलेल्या गुजरातमधील सेलंबा येथे कोरोना पॉझिटिव रुग्ण आढळून आल्याने खापर ग्रामपंचायतीतर्फे उद्यापासून तीन दिवस गावातील सर्व व्यापार व व्यवहार बंद ठेवत जनता कर्फ्यू पाळण्यात येणार आहे. तीन दिवस गावातील नागरिकांनी विनाकारण घरातून बाहेर पडू नये. अत्यावश्यक कामासाठी जाताना तोंडाला मास्क व रुमाल लावल्याशिवाय निघू नये असे आवाहन सरपंच सौ करुणाबाई वसावे, उपसरपंच विनोद कामे, ग्रामविस्तार अधिकारी विनोद ढोढरे यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar corona virus akkalkuwa border three pationt