नंदुरबार : कोरोनाबाधितांचा आकडा दहा दिवसांत दुप्पट 

coronavirus
coronavirus

नंदुरबार : कोरोनाने जिल्ह्यात थैमान घातले आहे. गेल्या चार महिन्यात जेवढा आकडा कोरोना पॉझिटिव्हचा होता. त्याचा दुप्पट आकडा केवळ दहा दिवसात झाला आहे. दररोज शंभर ते दीडशे रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह येत आहेत. सध्या १२ दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने सर्दी, खोकला, तापाचे रूग्ण वाढले आहेत. वातावरणात गारठा आहे. त्यामुळे तपासणीसाठी जाणाऱ्या रूग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह येऊ लागले आहेत. त्यामुळे भीतीने अनेकजण घरगुती उपचार करताना दिसत आहेत. काहींना कोणत्याही प्रकारचा त्रास नसतानाही अहवाल पॉझिटिव्ह येत असल्याचे चित्र आहे. 

हेही वाचा - सॅनिटायझर लावून आरती घेत असाल तर सावधान... 

जिल्ह्यात मार्चमध्ये केवळ चार रूग्ण होते. एप्रिलला ते ३० झाले. मे महिन्यात काहीअंशी संख्या वाढली. जूनमध्ये हीच संख्या पाचशेवर गेली. तर जुलैत ती आठशेचा पुढे गेली. त्यानंतर ऑगस्टमध्ये १२ ऑगस्टला जिल्ह्याची एकूण पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या ९३० झाली तर मृत्यूची संख्या ४८ वर गेली होती. म्हणजेच एकंदरीत चार महिन्यात १२ ऑगस्टपर्यंत ९३० वर पॉझिटिव्ह संख्या पोहोचली. जो आकडा गाठायला चार महिने लागले. त्याच आकड्याचा दुप्पट पॉझिटिव्ह रूग्ण केवळ १२ दिवसात निघाले आहे. म्हणजेच १२ ते २२ ऑगस्ट या १२ दिवसाचा कालावधीत ही सख्या ९३० वरून १८१५ वर पोहोचली आहे. त्यामुळे १२ दिवसात पॉझिटिव्ह रूग्णांची सख्या दुप्पट झाली आहे. 

लॅब सुरू झाल्याने दररोज अहवाल 
जिल्हा रूग्णालयात स्वॅब तपासणी लॅब सुरू झाल्याने दररोजचे स्वॅब अहवाल तपासणीचा वेग वाढला आहे. स्वॅब तपासणीची वाढती संख्येचा तुलनेत स्थानिक लॅब व धुळे येथील लॅबकडून दररोज दोनशेवर स्वॅबची दररोज तपासणी केली जात आहे. त्याबरोबरच मोबाईल स्वॅब तपासणी केंद्र सुरू केल्याने स्वॅब देणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे तेवढ्याच झपाट्याने रूग्ण संख्येतही वाढ होत आहे. 

दररोज शंभरावर अहवाल पॉझिटिव्ह 
स्वॅब तपासणी अहवालात दररोजचे जिल्ह्यातील शंभर ते दीडशे अहवाल पॉझिटिव्ह निघत आहेत. गेले चार महिने दिवसात १० ते १२ रूग्ण पॉझिटिव्ह निघण्याचे प्रमाण या १२ दिवसात साधारण १२ ते १५ पटीने वाढले आहे. या १२ दिवसाचा विचार केल्यास दररोज कधी शंभर, कधी सव्वाशे तर कधी दीडशे पेक्षा जास्त अहवाल पॉझिटिव्ह येत आहेत. त्यामुळे चार महिन्यात जेवढी पॉझिटिव्ह संख्या झाली. तेवढी सख्या केवळ १२ दिवसात वाढली. म्हणजे आता पॉझिटिव्हचा आकडा दुप्पट झाला आहे. 

५७ जणांचा मृत्यू 
कोरोना पॉझिटिव्ह अहवालासोबतच मृत्यूचा आकडाही झपाट्याने वाढत आहे. जो आकडा दहापर्यंत होता. तो या १२ दिवसात वाढत जाऊन आज सायंकाळपर्यत ५७ वर पोहोचला आहे. त्यात पन्नाशी ओलांडणाऱ्या व्यक्तींची संख्या अधिक आहे. जिल्हा रूग्णालयात उपाचाराबाबतच्या सर्व सुविधा उपलब्ध असल्या तरी नागरिक रूग्णालयात जाण्यास टाळत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे वृद्धांना जास्त त्रास झाल्यावर आणले जात असल्याने त्यातून मृत्यूची शक्यता जास्त वाढली आहे. 
 
तारीखनिहाय पॉझिटिव्ह संख्या - मृत्यू संख्या 
१२ ऑगष्ट - ९३०-४८ 
१५ ऑगष्ट-११५२-५० 
१६ ऑगष्ट-१२०१-५२ 
१७ ऑगष्ट-१२२७-५२ 
१८ ऑगष्ट -१२९१-५३ 
१९ ऑगष्ट -१४३९-५४ 
२० ऑगष्ट-१५७३-५६ 
२१ ऑगष्ट-१७४९-५७ 
२२ ऑगष्ट- १८४०-५८

संपादन : राजेश सोनवणे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com