esakal | पक्षीय विचारांवर शिक्‍कामोर्तब की नाते अन्‌ हितसंबंध
sakal

बोलून बातमी शोधा

vidhan parishad election

विधानपरिषदेच्या या निवडणुकीत पक्षीय विचारांवर शिक्कामोर्तब होण्यापेक्षा नातेसंबंध व हितसंबंध यावर कसे मतदान होते. यावर या निवडणुकीची गणिते अवलंबून असल्याचे बोलले जात आहे. यामुळे ही निवडणूक कोणत्या दिशेला जाते हे येणारा काळच ठरवणार आहे. 

पक्षीय विचारांवर शिक्‍कामोर्तब की नाते अन्‌ हितसंबंध

sakal_logo
By
फुंदीलाल माळी

तळोदा (नंदुरबार) : धुळे व नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची विधान परिषदेची निवडणूक एक डिसेंबरला होणार आहे. या निवडणुकीत दोन्ही जिल्ह्यातील उमेदवारांचे मतदारांशी असलेले नातेसंबंध व हितसंबंध चर्चेत आहेत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांची रणनीती कशी असणार यावरच गणित अवलंबून असणार आहे.
विधानपरिषद निवडणुकीत भाजपकडून माजी मंत्री अमरीश पटेल व काँग्रेसकडून नंदुरबार जिल्हा परिषद सदस्य अभिजीत पाटील निवडणुकीच्या रणांगणात आहेत. या निवडणुकीत दोन्ही जिल्ह्यातील मतदारांचे उमेदवारांसोबत असणारे नातेसंबंध व हितसंबंध चर्चेत आले आहेत.

नगराध्यक्ष पिता भाजपात तर पुत्र काँग्रेसचे उमेदवार
निवडणुकीत काँग्रेसकडून उमेदवार असलेले अभिजीत पाटील शहाद्याचे नगराध्यक्ष मोतीलाल तात्या पाटील यांचे सुपुत्र आहेत. मोतीलाल पाटील हे भारतीय जनता पार्टीत असून त्यांचे पुत्र काँग्रेसकडून उमेदवारी करीत आहेत. त्यामुळे मोतीलाल पाटील कोणती भूमिका घेतात; याकडे लक्ष लागून आहे. दुसरीकडे दीपक बापू पाटील आता भाजपमध्ये आहेत. त्यामुळे त्यांची भूमिकाही यात महत्वाची असणार आहे.

खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा परिणाम
राष्ट्रवादीत आलेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे देखील नातेसंबंध शहादा तालुक्यात आहेत. त्यामुळे या नातेसंबंधांच्या वापर करून महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये भागीदार असलेल्या काँग्रेसच्या उमेदवाराला कितपत मदत होते हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे. आता दोन्ही जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉग्रेसचे मतदार काय भूमिका घेणार हे महत्वाचे ठरणार आहे.

शिवसेनेची भूमिकेकडे लक्ष
महाविकास आघाडीच्या प्रमुख घटक पक्ष शिवसेना या निवडणुकीत कोणती भूमिका घेते; याकडे ही लक्ष लागून आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व विधानपरिषदेच्या या निवडणुकीच्या गाढा अनुभव असणारे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी महाविकास आघाडीच्या आघाडी धर्म पाळत काँग्रेसच्या उमेदवाराला कशी व कितपत मदत करतात त्यावर ही गणित अवलंबून असणार आहे.

काँग्रेसचा मतदारांशी असलेले हितसंबंध
सर्वच नगरपालिकेतील काँग्रेसच्या नगरसेवकांचे भाजपचे उमेदवार अमरिशभाई पटेल यांच्याशी सलोख्याचे हितसंबंध आहेत. कॉग्रेसमध्ये असतांना अमरीशभाईंचे कॉग्रेस नगरसेवकांशी कोणत्याना कोणत्या स्तरावर जिव्हाळ्याचे संबध होते. एवढेच नव्हे तर अनेक उमेदवारांना त्यांनी प्रोत्साहन देऊन राजकीय वाटचालीत मदत देखील केली आहे. त्यामुळे या निवडणुकीत कॉग्रेसचे नेते व नगरसेवक कोणती भूमिका घेतात हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.

संपादन ः राजेश सोनवणे