esakal | नंदुरबारसाठी स्वतंत्र जिल्हा बॅंकेची निर्मिती करा 
sakal

बोलून बातमी शोधा

नंदुरबारसाठी स्वतंत्र जिल्हा बॅंकेची निर्मिती करा 

बँकेचा कारभार मोठा असला तरी निदान नंदुरबार जिल्ह्याच्या सभासदांकडे विशेष लक्ष दिले जात नसल्याची चर्चा खासगीत होते.

नंदुरबारसाठी स्वतंत्र जिल्हा बॅंकेची निर्मिती करा 

sakal_logo
By
धनराज माळी

नंदुरबार : शेतकऱ्यांसाठी अर्थकारणवाहिनी, तारणहार असलेल्या जिल्हा बँकेच्या स्वतंत्र निर्मितीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपले हितसंबंध बाजूला सारत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनदरबारी प्रयत्न करणे गरजेचे आहे. माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी तसेच जिल्हा परिषदेचे सभापती अभिजित पाटील या दोन्ही नेत्यांनी धुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विभाजन होऊन नंदुरबार जिल्ह्यासाठी स्वतंत्र जिल्हा बँक व्हावी हा मुद्दा उचलला असला, तरी जिल्ह्यातील इतर राजकीय धुरंधरांनी शेतकरी हितासाठी तरी एकत्रित येणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे. 

धुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेची सर्वसाधारण सभा नुकतीच झाली. नंदुरबार जिल्ह्याचा विचार करता शेवटच्या टोकावरील सभासदाला सभेसाठी जाताना किमान तीन तास तरी लागतात. प्रवासाच्या वेळेचा विचार करता त्या हिशेबाने सभासद हित साधत वेळेचे नियोजन करणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे दोन्ही जिल्ह्यांत कार्यक्षेत्र असल्याने बँकेचा कारभार मोठा असला तरी निदान नंदुरबार जिल्ह्याच्या सभासदांकडे विशेष लक्ष दिले जात नसल्याची चर्चा खासगीत होते. कधी-कधी सावत्रपणाची वागणूक दिली जात असल्याचाही आरोप जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून केला जातो. 

सावत्रपणाची वागणूक 
धुळ्यात झालेल्या जिल्हा बँकेच्या सर्वसाधारण सभेत शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी, नंदुरबार जिल्हा परिषदेचे सभापती अभिजित पाटील या दोन्ही नेत्यांनी नंदुरबारसाठी स्वतंत्र जिल्हा बँक व्हावी, असा मुद्दा सभेत उचलला त्यात त्यांनी स्वतंत्र जिल्हा बँक करण्याची शिफारस शासनाकडे करावी, अशी मागणीही केली. पूर्वी चंद्रकांत रघुवंशी यांनी हा मुद्दा उचलला होता, परंतु आता त्यांना सभापती अभिजित पाटील यांची या मुद्द्यावर भक्कम साथ मिळाल्याने जिल्ह्यातील नेत्यांनी उघडपणे स्वतंत्र जिल्हा बँकेच्या मागणीसाठी पुढे येणे गरजेचे आहे. धुळे जिल्ह्यातील बहुमताने निर्णय होतात. या भूमिकांमुळे नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सावत्रपणाची वागणूक दिली जाते. त्याचबरोबर सभेची वेळ अकराला असताना अवघ्या अकरा वाजून चार मिनिटांनी सभा संपते. याबाबत नाराजी व्यक्त होत आहे. 

...अन्यथा राष्ट्रीयीकृत बँक 
हल्ली अनेक राष्ट्रीयीकृत बँकांकडून शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा केला जातो. यापूर्वी शेतकरीवर्ग हा जिल्हा बँक, विविध कार्यकारी सोसायटी यांच्यामार्फतच कर्ज घेत असे. परंतु सध्या राष्ट्रीयीकृत बँकेकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढत आहे. तो कमी करण्यासाठी व बँकेच्‍या हितासाठी शेतकरी हित जोपासणे गरजेचे आहे. स्वतंत्र नंदुरबार जिल्हा बँकेची निर्मिती झाल्यास खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या भावनांना मूर्त स्वरूप येईल, असे नेत्यांचे मत आहे. 

नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती होऊन २२ वर्षे उलटले तरीही धुळे-नंदुरबार जिल्हा बॅंक एकच आहे. या बँकेचा व्यवहार धुळे येथून चालतो. बैठकांना जातानाही वेळेचे नियोजन अपूर्ण पडते. बैठका संपून गेल्यावर माणूस पोचतो. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील सभासदांना काहीही माहिती मिळत नाही. त्यामुळे आता केवळ स्वतंत्र नंदुरबार जिल्हा बॅंक व्हावी हाच एक पर्याय आहे. 
- चंद्रकांत रघुवंशी, शिवसेना नेते 

नंदुरबार जिल्ह्यासाठी संयुक्त असलेल्या बँकेकडून जिल्ह्यातील सभासदांना, विविध कार्यकारी सोसायट्यांना सावत्र वागणूक दिली जाते. नंदुरबार जिल्ह्यासाठी स्वतंत्र जिल्हा बँक व्हावी, यासाठी सभासदांना एकत्रित करून लवकरच बैठक बोलावून समन्वय साधण्याच्या प्रयत्न असेल. 
- अभिजित पाटील, सभापती, जिल्हा परिषद  

loading image