नंदुरबार जिल्ह्यात मिरची उत्पादकांना मोठा फटका; काय आहे कारण वाचा

धनराज माळी
Friday, 4 September 2020

जिल्ह्यात सात ते आठ दिवस पावसाची रिपरिप होती. यामुळे मिरची, मूगासह कापूस पिकालाही याचा फटका बसला आहे. मिरची लागवडीनंतर पिकाची चांगल्या प्रकारे वाढ सुरू झाली होती. या झाडांना मिरची लागवड सुरू झाली होती.

वडाळी (नंदुरबार) : नंदुरबार जिल्हा हा प्रमुख मिरची उत्पादक जिल्हा आहे. यंदा मिरची पिकावर विषाणूजन्य रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्याने उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. फवारणी करूनही विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने शेतकऱ्यांसमोर आता मिरचीची झाडे काढून फेकण्याची वेळ आली आहे. 

अवश्‍य वाचा - मुलाच्या आग्रहाखातर आईचा चेहरा दाखविला तर उघडकीस आला धक्‍कादायक प्रकार
 

जिल्ह्यात सात ते आठ दिवस पावसाची रिपरिप होती. यामुळे मिरची, मूगासह कापूस पिकालाही याचा फटका बसला आहे. मिरची लागवडीनंतर पिकाची चांगल्या प्रकारे वाढ सुरू झाली होती. या झाडांना मिरची लागवड सुरू झाली होती. मिरचीचे झाड वाकू नये याकरिता शेतकऱ्यांनी लहान - लहान बांबूंचा आधार दिला आहे. याच सोबत मिरचीवर रोगराई येऊ नये याकरिता शेतकऱ्यांनी उच्चप्रतीची फवारणी देखील केली होती. 

व्‍हायरस फ्री वाण तरीही...
मिरचीचे अधिक उत्पादन मिळावे यासाठी शेतकऱ्यांनी कंपन्यांकडून संशोधन केलेल्या व्हायरस फ्री वाणाची लागवड केली होती. यासाठी वाणाच्या रोपांची खरेदी एक ते दीड रुपये प्रती रोप प्रमाणे केली होती. शेतात झाड लावल्यानंतर पूर्ण पीक येईपर्यंत त्यावर मोठा खर्च शेतकरी करत असतो. शेतकरी मिरची लागवडीपासून तर ते उत्पन्न निघेपर्यंत शेतात राबराब राबतो. मिरची लागवडीपासून फवारणी करणे, निंदणी करणे, त्याची तोड करणे याकरिता त्याला एकरी ५० हजार रुपये खर्च येतो. मात्र या वर्षी व्हायरस फ्री खरेदी केलेल्या वाणावर मोठ्या प्रमाणात विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाला असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. मोठ्या प्रमाणात फवारणी केल्यानंतर ही रोग आटोक्यात येत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी मिरची काढून फेकण्याचा पर्याय निवडला आहे. 
 
दीड एकर मिरची लागवड केली होती, त्यासाठी ठिबक केली. वेळोवेळी औषधांची फवारणी केली, तरीही व्हायरसचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने मिरची काढून फेकण्याशिवाय पर्याय नव्हता. यात मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. 
-नरेंद्र सोनवणे, शेतकरी वडाळी 

संपादन : राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar district chilli farmer Big blow to chilli growers