डॉक्‍टराने घेतली लाच; तीही एसटी चालकाकडून

धनराज माळी
Tuesday, 3 November 2020

चालकाला पचाराचा एकूण खर्च तीन लाखांच्या आसपास झालेला असून, हे बिल मंजूर होण्यासाठी त्यांनी एस.टी. महामंडळाने नियुक्त केलेले गाझीनगर, नंदुरबार येथे दवाखाना असलेले डॉ. मोजम अली खान यांच्याकडे गेल्या मे महिन्यात पडताळणीसाठी फाइल सादर केली होती.

नंदुरबार : एसटी महामंडळातील चालकाच्या वैद्यकीय बिलाच्या फायलीमधील त्रुटी दूर करण्यासाठी चार हजार रुपयांची लाच घेताना एस.टी. महामंडळाने नियुक्त केलेल्या कंत्राटी डॉक्टरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. 
नंदुरबार एसटी आगारातील एका ५५ वर्षीय चालकास हृदयविकाराचा त्रास आहे. यापूर्वी त्यांना ॲटॅक आलेला आहे. त्यांची अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी झालेली आहे. 

त्रुटी दूर करण्यासाठी
चालकाला पचाराचा एकूण खर्च तीन लाखांच्या आसपास झालेला असून, हे बिल मंजूर होण्यासाठी त्यांनी एस.टी. महामंडळाने नियुक्त केलेले गाझीनगर, नंदुरबार येथे दवाखाना असलेले डॉ. मोजम अली खान यांच्याकडे गेल्या मे महिन्यात पडताळणीसाठी फाइल सादर केली होती. नंतर ती फाइल धुळे विभागीय कार्यालयात पाठविली असता, ती त्रुटींमुळे परत आली. त्रुटींची पूर्तता करून तक्रारदारांनी सप्टेंबरमध्ये फाइल डॉ. खान यांच्याकडे दिली, परंतु लाच दिल्याशिवाय ते त्रुटींची पूर्तता करत नव्हते. त्यामुळे तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नंदुरबार कार्यालयात तक्रार दिली. त्यानुसार लाचलुचपत विभागाने गेल्या २९ ऑक्टोबरला पडताळणी केली असता, डॉ. खान यांनी पंचांसमक्ष चार हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून स्वत:च्या दवाखान्यात पंचांसमक्ष ही रक्कम स्वीकारली असता, त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar doctor bribe taken by doctor in driver