esakal | कॉटन बेल्ट धोक्यात; कापसाची उत्पादन क्षमता घटली  
sakal

बोलून बातमी शोधा

कॉटन बेल्ट धोक्यात; कापसाची उत्पादन क्षमता घटली  

सद्या शेतीत नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढला असून यांत्रिकीकरणातून शेती करण्यावर जोर असल्याने इंधनाचे वाढलेले भाव शेतकऱ्यासाठीच मारक ठरत आहे

कॉटन बेल्ट धोक्यात; कापसाची उत्पादन क्षमता घटली  

sakal_logo
By
किशोर चौधरी

बामखेडा ः नवनवीन तंत्रज्ञानाचा उपोयग करूनही कापसाचे अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने पश्चिम परिसरात कॉटनबेल्टचा हा पट्टा धोक्यात आला आहे. पर्यायाने शेतकऱ्यांनी इतर पिक घेण्याचा कल वाढलेला दिसत आहे. निसर्गाचे दुष्टचक्र पाठलाग करत असल्यामुळे व मजुरांची कमतरता भासत असल्याने शेती हा व्यवसाय तोट्यात चालल्याने बळीराजा चिंतेत सापडला आहे. 

वाचा- तळोद्याचे क्रीडा संकुल तीन वर्षांपासून धूळखात; एक कोटीचा खर्च गेल्या पाण्यात ! 
 

पश्चिम परिसरात त्यातल्या त्यात धुळे जिल्ह्यातील शिरपूर व नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्याच्या परिसरात सर्वाधिक पेरा हा कापसाचा होत आला आहे. नवनवीन तंत्रज्ञान त्यात बिजी १, बिजी २ सारखी संकरित वाणे बाजारात आल्याने कापसाच्या उत्पादनात सुरुवातीला रेकॉर्डब्रेक उत्पन्न शेतकऱ्यांना आली. नंतर दिवसेंदिवस ही संकरित वाणेही निसर्गाशी एकरूप झाल्याने फवारणीचा खर्च वाढत गेला, पर्यायाने उत्पादन कमी होत गेल्याने कपाशी पीक हे न परवडणारे पीक झाल्याने शेतकऱ्यांनी आपला मोर्चा इतर पिकाकडे वळविला आहे. पण त्यालाही निसर्गाचा फटका बसत गेल्याने सर्व पिके शेतकऱ्यांसाठी तोट्याची ठरत आली आहेत. सद्या शेतीत नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढला असून यांत्रिकीकरणातून शेती करण्यावर जोर असल्याने इंधनाचे वाढलेले भाव शेतकऱ्यासाठीच मारक ठरत आहे. बी बियाणे व रासायनिक खते यांचेही भाव गगनाला भिडले असताना पिकांचे भाव मात्र ‘जैसे थे’ राहत असल्याने उत्पन्न कमी व खर्च जास्त असे काहीसे चित्र झाल्याने शेती व्यवसाय हा धोक्यात सापडला आहे. यावर्षी तर कापसाला पाच हजार रुपये क्विंटलच्यावर भाव नसल्याने तेवढा खर्च तर शेतकरी पहिलेच त्यासाठी खर्च करून बसला आहे. यावर्षी हंगामाला सुरुवाती पासूनच मजुरांची टंचाई भासत असल्याने खुद्द शेतकऱ्यांना पेरणीसाठीही यांत्रिकी युगाचा वापर करावा लागत असताना कुठे पेरणी खोल झाल्याने सोयाबीन व मका जास्त पावसाअभावी उगवलेच नसल्याचे चित्र निर्माण झाले होते, त्यात आंतरमशागत ज्यात निंदणी साठीही मजूर मिळत नसल्याने महागड्या तणनाशकांचा वापर शेतकऱ्यांना करावा लागला. 

उत्‍पन्नापेक्षा खर्चच अधिक 
कापसाच्या बाबतीत विचार केल्यास सुरुवातीला नॉन बीटी कपाशीचे उत्पन्न बऱ्यापैकी होते. त्यात सुधारणा होऊन संकरित बीजी १ कापूस आले असता उत्पन्नात भर पडली, आता बिजी २ हे वाण बाजारात आल्यानंतर सुरुवातीला रेकॉर्डब्रेक कापूस शेतकऱ्यांनी पिकविला असताना त्यावर गेल्या एकदोन वर्षात बोंड अळीचा प्रकोप जाणवल्याने खर्च वाढला. उत्‍पन्न कमी आणि खर्चच डोहीजड झाला आहे. 

संपादन- भूषण श्रीखंडे