esakal | शेतकऱ्याचा कुटुंबातील सदस्यांनाही मिळणार विमा कवच 
sakal

बोलून बातमी शोधा

policy

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा सन २०१५ -१६ पासून राबविण्यात येत आहे. २०१९- २० मध्ये योजनेची व्याप्ती वाढवून राज्यातील सर्व सातबारा धारक खातेदार शेतकरी व त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य आई-वडील, शेतकऱ्याची पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणत्याही एकाला याचा लाभ मिळणार आहे.

शेतकऱ्याचा कुटुंबातील सदस्यांनाही मिळणार विमा कवच 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

शनिमांडळ : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेस आता नवे रूप देण्यात आले असून खातेदार शेतकरी व त्याच्या कुटुंबातील एका सदस्यास ही योजना लागू करून योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. या बदलामुळे अपघातग्रस्त शेतकरी कुटुंबांना दिलासा मिळाला आहे. प्रकरण परत्वे दोन लाख रुपये व एक लाख रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे. या योजनेचा पात्र शेतकरी कुटुंबांनी लाभ घ्यावा, असे कृषी विभागातर्फे आवाहन करण्यात आले आहे. 

क्‍लिक करा - Video : मुख्यमंत्र्यांच्या दारात कापूस, मका टाकू : आमदार मंगेश चव्हाण 

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा सन २०१५ -१६ पासून राबविण्यात येत आहे. २०१९- २० मध्ये योजनेची व्याप्ती वाढवून राज्यातील सर्व सातबारा धारक खातेदार शेतकरी व त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य आई-वडील, शेतकऱ्याची पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणत्याही एकाला याचा लाभ मिळणार आहे. यात शेतकऱ्यांना स्वतः किंवा त्यांच्या वतीने दुसऱ्या कोणासही विमा हप्त्याची रक्कम भरण्याची गरज नाही. विमा योजनेअंतर्गत मिळणारा लाभही स्वतंत्र आहे. 

राज्यातील १० ते ७५ वयोगटातील एकूण दोन जणांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविण्‍यात शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली आहे. याआधी मात्र फक्त कुटुंबातील शेतकऱ्याला एकट्यालाच अपघात झाला असेल तर या योजनेचा लाभ मिळत होता. आठ डिसेंबर २०१९ ते सात डिसेंबर २०२० या कालावधी करिता हे विमा कवच मिळणार आहे. 

अपघाती मृत्यू अथवा दोन अवयव निकामी झाल्यास दोन लाख व एक अवयव निकामी झाल्यास एक लाख रुपये नुकसानभरपाई या विमा अंतर्गत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मिळेल.अपघातात शेतकऱ्याचा अथवा त्याच्या कुटुंबातील सदस्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास अथवा अपंगत्व आल्यास ही योजना आर्थिक संरक्षण देणारी आहे.अपघात किंवा शेतकरी मृत्यू झाल्याच्या ९० दिवसांच्या आत कृषी विभागाला कळवा व अर्ज भरून घ्या. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी कृषी विभागाशी संपर्क साधावा. 
- नीलेश भाग्यशोर, जिल्हा कृषी अधिकारी, नंदुरबार