esakal | गुजरातच्या वाहतुकीमुळे नंदुरबारची कोंडी 
sakal

बोलून बातमी शोधा

highway gujarat transportation

गेल्या अनेक वर्षांपासून नवापूर व चिंचपाडा रेल्वे गेटच्या दुरुस्तीचे काम रखडले होते. मध्यंतरीच्या कालावधीत दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. आता पुन्हा दुरुस्ती करण्यात येत आहे. गेट दुरुस्तीमुळे गुजरात राज्यात जाणारी वाहने नंदुरबारमार्गे वळविण्यात आली आहे.

गुजरातच्या वाहतुकीमुळे नंदुरबारची कोंडी 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नंदुरबार : चिंचपाडा व नवापूर रेल्वे गेटच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने गुजरातला जाणारी वाहतूक नंदुरबारमार्गे वळविण्यात आल्याने शहरातील वाघेश्वरी चौफुलीवर अवजड वाहनांचा धोका निर्माण झालेला आहे. त्यामुळे नागरिक जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करीत आहेत. 

गेल्या अनेक वर्षांपासून नवापूर व चिंचपाडा रेल्वे गेटच्या दुरुस्तीचे काम रखडले होते. मध्यंतरीच्या कालावधीत दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. आता पुन्हा दुरुस्ती करण्यात येत आहे. गेट दुरुस्तीमुळे गुजरात राज्यात जाणारी वाहने नंदुरबारमार्गे वळविण्यात आली आहे. त्यामुळे दिवसभर वेळोवेळी वाहतुकीचा खोळंबा होतो. 
शहरात धुळे-साक्री रस्ता, वाघेश्वरी चौफुली परिसरात शेकडोंवर नागरी वसाहती आहेत. त्या परिसरातील नागरिक दिवसभरातून अनेक वेळा गावात जाण्यासाठी याच मार्गाचा वापर करीत असतात. पादचारी नागरिकांची संख्याही मार्गक्रमण करणाऱ्यांमध्ये मोठी आहे. दुचाकी वाहनांची तर वर्दळ नेहमीच असते. गुजरातकडील वळविलेल्या वाहतुकीमुळे नागरिक अक्षरशः जीव धोक्यात घालून मार्गक्रमण करीत आहेत. 

उपाययोजना करणे आवश्यक 
धुळे रस्त्यावरील वाघेश्वरी चौफुली परिसरात अवजड वाहनांनामुळे मोठा धोका निर्माण झालेला आहे. रेल्वेगेट दुरुस्तीचे काम तितकेच महत्त्वाचे आहे तितकीच लोकांची सुरक्षा देखील. दिवसभरातून वाघेश्वरी चौफुली ते राजपूत पेट्रोल पंपापर्यंत अवजड वाहनांमुळे वाहतुकीचा खोळंबा होत असतो. वाहतूक पोलिस कर्मचारी त्यांच्या परिने वाहतूक सुरळीत करीत असतात. परंतु, वाहनधारकांनी देखील नियम धाब्यावर बसवता कामा नये. वाहतूक सुरळीत होण्यासाठी परिसरात जादा वाहतूक पोलिस व सुरक्षा कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. 

अत्यावश्यक सेवेतील वाहन अडकू नये 
सध्या कोरोना महामारीची साथ सुरू असल्याने व आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन जाणारे वाहने, रुग्णवाहिका वाघेश्वरी चौफुली मार्गावरूनच जात असतात. अशा परिस्थितीत वाहतुकीचा खोळंबा झाल्यास रुग्णांच्या जीवावर बेतू शकते. त्यामुळे प्रशासनाच्या माध्यमातून तात्काळ उपाययोजना व्हाव्यात.