के. सी.च्या मंत्रिपदाने कॉंग्रेसला नवसंजीवनी 

धनराज माळी
Tuesday, 31 December 2019

राज्यात गेले पाच वर्ष कॉंग्रेस सत्तेबाहेर राहिली. त्यातच केंद्र व राज्यात असलेल्या भाजप सरकार आता लवकर सत्तेतून जात नाही म्हणून कोणी सत्तेच्या लालसेपोटी, कोणी मुलांचा राजकीय भवितव्यासाठी तर कोणी चौकशीचा ससेमिरा लागू नये म्हणून पक्षांतर केले.

धुळे : नंदुरबार जिल्ह्याचे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अमरीश पटेल, माजी आमदार तथा कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत रघुवंशी, कार्याध्यक्ष दीपक पाटील आदींनी पक्षांतर केले. त्यांच्यासोबत कार्यकर्त्यांचा जत्थाही गेला. त्यामुळे जिल्ह्यात कॉंग्रेसला मोठा हादरा बसला होता. अशा बिकट स्थितीत ॲड. के.सी. पाडवी यांनी जराही खचून न जाता कॉंग्रेसमध्येच राहून लोकसभा, विधानसभा निवडणुका लढविल्या. त्यांना मंत्रिपद देऊन अखेर त्यांच्या एकनिष्ठतेला कॉंग्रेसने न्याय दिला आहे. नंदुरबार जिल्ह्यावरील गांधी घराण्याचे प्रेम अजूनही जैसे थे असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यांच्या मंत्रिपदामुळे जिल्ह्यात कॉंग्रेसला नक्कीच नवसंजीवनी मिळाली आहे. मरगळ आलेल्या कार्यकर्त्यांनाही आता उभारी येणार आहे. 

संबंधीत बातमी > कॉंग्रेसचे बुथप्रमुख ते कॅबिनेट मंत्री

राज्यात गेले पाच वर्ष कॉंग्रेस सत्तेबाहेर राहिली. त्यातच केंद्र व राज्यात असलेल्या भाजप सरकार आता लवकर सत्तेतून जात नाही म्हणून कोणी सत्तेच्या लालसेपोटी, कोणी मुलांचा राजकीय भवितव्यासाठी तर कोणी चौकशीचा ससेमिरा लागू नये म्हणून पक्षांतर केले. याच काळात सत्तेसाठी पक्षांतराच्या मेगा भरतीत वर्षानुवर्ष कॉंग्रेसचे एकनिष्ठ मानले जाणारे व कॉंग्रेसशी नाळ जुळलेल्या ज्येष्ठ नेते आमदार अमरिश पटेल, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, माजी खासदार माणिकराव गावित, त्यांचे पुत्र भरत गावित, शहादातून दीपक पाटील या नेत्यांनी कॉंग्रेस सोडली. त्यावेळेस के. सी. पाडवी यांच्या नावाचीही जोरदार चर्चा होती. मात्र त्यांनी कॉंग्रेसमध्येच राहणार असल्याचे जाहीर केले होते. नंदुरबार जिल्ह्यात तर श्री. रघुवंशी यांनी कॉंग्रेस सोडल्यामुळे कोणीही वाली नाही व कॉंग्रेस संपेल असेच चित्र उभे राहिले होते. त्याउलट ते ज्या शिवसेनेत गेले त्या पक्षाची ताकाद वाढली, तेही नाकारता येणार नाही. एवढेच काय वर्षानुवर्ष अत्यंत निकट असलेल्या श्री. पाडवी यांच्या विरोधात पक्षादेश पाळत श्री. रघुवंशी यांनी विधानसभेत प्रचार केला. त्याचा परिणाम विधानसभेत के.सी.पाडवी यांचा मताधिक्यावर झाला. त्यांना निसटता विजय स्वीकारावा लागला. 

तेच उमेदवार तेच प्रचारप्रमुख 
लोकसभेत श्री. पाडवी यांना स्वतःच उमेदवाराची व प्रचार प्रमुखाची भूमिका पार पाडावी लागली. अपयश आले. पक्षस्तरावरून निवडणुकीत कोणीही मदतीला आले नाही. तरीही खचून न जाता तेच उमेदवार व तेच स्टार प्रचारक, तेच जिल्हाध्यक्ष बनून जिल्ह्यात आहेत त्या कार्यकर्त्यांना एकसंघ ठेवण्याचे काम केले. विधानसभा निवडणुकीतही स्वतः उमेदवार असतांना त्यांनी जिल्ह्यातील चारही जागांवर उमेदवार देऊन स्वतःसह दोन जागा कॉंग्रेसला मिळवून दिल्या. 

मंत्रिपदाने मिळाला न्याय 
मंत्रिमंडळातील समावेशाने कॉंग्रेसने अखेर त्यांचा प्रामाणिकपणाला न्याय दिला आहे. त्यांनी राखलेली पक्षनिष्ठा व पडतीच्या काळात एकनिष्ठ राहून लोकसभा, विधानसभा व आत्ताच्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका स्वतः लक्ष देऊन लढविल्या. सत्ता नसल्याने खचून न जाता त्यांनी आहेत त्या कार्यकर्त्यांना एकसंघ ठेवण्याचे काम केले. ती म्हणजे त्यांच्यासाठी तारेवरची कसरतच होती. त्यांना मिळालेल्या मंत्रिपदामुळे दहा वर्षापासून मंत्रिपद नसलेल्या जिल्ह्याला न्याय मिळाला आहे, त्यांना मंत्रिपद देऊन नंदुरबार जिल्ह्यातील कॉंग्रेसला नवसंजीवनी दिली आहे. मरगळ आलेल्या कार्यकर्त्यांनाही आता उभारी येईल. 

गांधी घराणे आणि नंदुरबार 
स्व. इंदिरा गांधींपासून गांधी घराण्याचे नंदुरबार या आदिवासी जिल्ह्यावर विशेष प्रेम आहे, हे सवर्श्रृत आहे. ते पुन्हा के. सी. पाडवींच्या मंत्रिमंडळातील समावेशाने सिद्ध झाले आहे. कॉंग्रेसने प्रत्येक वेळेस जिल्ह्याला मंत्रिपद दिले आहे. विशेषतः ज्येष्ठ नेते सुरूपसिंग नाईक यांच्या रूपाने मंत्रिपद जिल्ह्याला हमखास असायचे. आता पुन्हा सत्तेची संधी मिळाली, त्यात आलेल्या मंत्रींचा यादीत नंदुरबारला के. सी. पाडवी यांच्या रूपाने प्राधान्यक्रम देण्यात आला आहे. त्यामुळे कॉंग्रेसने नंदुरबार जिल्ह्यावरील प्रेम व मंत्रिपदाची परंपरा कायम ठेवली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar k c padvi congress cabinate minister