कॉंग्रेसचे बूथप्रमुख ते कॅबिनेट मंत्री ः एका अर्धशतकाचा निष्ठेने प्रवास 

KCPadvi
KCPadvi

धडगाव अर्थात अक्राणीसारख्या दुर्गम भागात सत्तरीच्या दशकात गावपाड्यांवर जायला साधे रस्तेही नव्हते, संपर्काची इतर साधने ही फार लांबची बाब होती. अशा स्थितीत तेथील निवडणुकांत बूथप्रमुख म्हणून काम करत कॉंग्रेसशी नाळ घट्ट जुळली. कॉंग्रेसच्या विचारांची साथ कायम ठेवत तेथून सुरू झालेला ऍड. के. सी. पाडवी यांचा प्रवास. निष्ठांवत राहिल्याने त्यांना आज थेट कॅबिनेट मंत्रिपदापर्यंत घेऊन गेला. त्यांचा हा प्रवास संघर्षमय असला, तरी कठीण प्रसंगांतही कॉंग्रेसशी न घेतलेली फारकत, ही त्यांची मोठी जमेची बाजू ठरली आहे. 


एकत्रित धुळे जिल्हा असताना विशालकाय जिल्ह्यात कॉंग्रेसमध्ये नेतृत्वाची मोठी फळी होती. कॉंग्रेसमध्ये बहुतांश नेते थेट राज्य आणि देशपातळीवरील पक्षांच्या नेत्यांचे लक्ष वेधून घेणारे होते. कॉंग्रेसच्या नेत्या व तत्कालीन पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांचे या जिल्ह्यावर विशेष प्रेम होते. अशा काळात कॉंग्रेसमध्ये उदयास आलेले तरुण नेतृत्व म्हणजे ऍड. के. सी. पाडवी. जिल्ह्यातून तब्बल सात वेळा विधानसभेवर निवडून येणारे ऍड. पाडवी यांची सध्याच्या राज्य मंत्रिमंडळात लागलेली वर्णी म्हणूनच महत्त्वाची मानली जात आहे. कॉंग्रेसच्या निष्ठांवत, सातपुड्यातील पुत्राला मिळालेल्या या संधीमुळे तमाम जिल्हावासियांना आनंद झाला आहे. त्यांची कारकीर्द पाहिली तर एक बूथ प्रतिनिधी ते पक्षाच्या कोअर कमिटीपर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे. कॉंग्रेसच्या पडत्या काळातही साथ न सोडणाऱ्या शिलेदारांपैकी एक म्हणून मंत्रिमंडळात थेट पहिल्या यादीत त्यांची निवड झाली आहे. 


ऍड. पाडवी यांनी लहानपणापासूनच कॉंग्रेसचे काम केलेले आहे. प्राथमिक शिक्षण घेताना त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मतदान केंद्र प्रतिनिधी म्हणून काम पाहिले. तिसरीत असताना 1967 मध्ये त्यांनी कॉंग्रेसचे प्रतिनिधी म्हणून काम पाहिले. 1969 मध्ये जिल्हा परिषद निवडणुकीत बूथ प्रतिनिधी म्हणून काम केले. 1977 च्या लोकसभा निवडणुकीवेळी ते कॉंग्रेसचे सक्रिय सदस्य म्हणून आदिवासी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून सक्रिय झाले. 1989 मध्ये लोकसभेची उमेदवारी त्यांच्यासाठी चालून आली, त्यात त्यांना एक लाख 35 हजार इतकी मते मिळून ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले. या लक्षणीय मतांची दखल कॉंग्रेसने घेतली होती, मात्र त्यांना कॉंग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्याने 1990 मध्ये जनता दलाकडून त्यांनी उमेदवारी केली अन्‌ ते विजयी झाले. 1991 मध्ये पुन्हा कॉंग्रेसमध्ये प्रवेश करून त्यांनी सक्रिय काम पाहिले. 1995 मध्ये अपक्ष उमेदवारी करून ते आमदार म्हणून विजयी झाले. त्यावेळच्या युती सरकारकडून त्यांना मंत्रिपदाची ऑफरही देण्यात आली, मात्र त्यांनी ती नाकारली. 1998 मध्ये लोकसभा निवडणुकीत त्यांनी कॉंग्रेसचे काम केले. 1999 मध्ये कॉंग्रेसकडून विजयी झाले. 2004 मध्ये तसेच, 2009, 2014 आणि 2019 मध्ये त्यांनी अक्राणी याच मतदारसंघातून आपली विजयी घोडदौड सुरू ठेवली. 

रस्ते, पुलांच्या कामांना मिळविली मंजुरी 
नंदुरबार जिल्हानिर्मितीनंतर जिल्ह्यातील दुर्गम भाग म्हणून परिचित असणाऱ्या धडगाव-अक्कलकुवा मतदारसंघांत बारमाही रस्ते नसल्याने असंख्य अडचणींचा सामना करावा लागायचा. हे लक्षात घेता धडगाव शहराला जोडणारे रस्ते व पुलांच्या मंजुरीचे काम त्यांनी मोठ्या प्रमाणावर केले. 1990 पूर्वी परिस्थिती अत्यंत बिकट होती, मात्र ऍड. पाडवी यांनी आमदार झाल्यानंतर सर्वप्रथम बारमाही रस्ते करण्याचे काम हातात घेतले. त्याला कारणही तसेच आहे. पुलोद आघाडीचे सरकार असताना त्यावेळी मंत्री पावसाळ्यात जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता पुलाअभावी त्यांना धडगावहून शहाद्याकडे जाता आले नाही. तब्बल बारा दिवस त्यांना धडगावातच अडकून राहावे लागले होते. याबद्दल आमदार ऍड. पाडवी अतिशय नाराज झाले होते व त्यातूनच त्यांनी पुढील काळात बारमाही रस्ते करण्याचे काम धडाक्‍याने हाती घेतले. 

हातोडा पुलाचा रचला पाया 
जिल्ह्याच्या दुर्गम भागाला जोडणारा सेतू म्हणून परिचित असणाऱ्या हातोडा पुलाच्या पूर्णत्वासाठी अनेकांनी प्रयत्न केले असले, तरी त्याचे बरेच श्रेय धडगावचे आमदार ऍड. के. सी. पाडवी यांनाही जाते. कुपोषणाबाबत पाहणी दौऱ्यात 2001 मध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी धडगावला भेटी दिल्या होत्या. त्यावेळी ऍड. पाडवी यांनी त्यांना दुर्गम भाग जलदगतीने नंदुरबारला जोडण्यासाठी हातोडा पूल झाला तर संपर्क आणि सुविधा वाढू शकतात हे पटवून दिले व सातत्याने पाठपुरावाही केला. 2002-03 मध्ये पावसाळी अधिवेशनात पुरवणी अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला, त्यावेळी 32 कोटींची तरतूदही करण्यात आली होती. त्यामुळे हातोडा पुलाचा पायाच ऍड. पाडवी यांनी रचला आहे, असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com