esakal | अखेर अर्थचक्र झाले गतिमान 
sakal

बोलून बातमी शोधा

nandurbar

शासनाने सर्व दुकानांना सकाळी आठ ते दुपारी बारापर्यत सुरू ठेवण्याची मुभा दिली आहे,त्यासाठी व्यापारी संकुले, एकाच सरळ रेषेत दुकाने असल्यस त्यापैकी कुणाला प्राधान् राहिल हेही स्पष्ट केले आहे,

अखेर अर्थचक्र झाले गतिमान 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नंदुरबार : जिल्हा ऑरेंज झोनमध्ये मोडत असल्याने लॉकडाऊनमध्ये काही अटी व शर्ती कायम ठेवत प्रशासनाने दिलासा दिल्याने आजपासून जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी व्यापारी, व्यवसायिक प्रतिष्ठाने सुरू झाल्याने अर्थचक्र गतिमान होण्यास सुरवात झाली. नियम व अटी पाळत चार तासांसाठी आज दुकाने उघडल्याने मात्र नागरिकांनी खरेदीसाठी प्रचंड गर्दी केली होती. फिजिकल डिस्टन्सला दिलेली तिलांजली पाहता नागरिकांना जणू कोरोनो संपला आहे असेच वाटत असल्याने दिलेली सूट तेवढ्याच जबाबदारीने वापरली पाहिजे असे आजच्या स्थितीवरून दिसून येते. 
शासनाने सर्व दुकानांना सकाळी आठ ते दुपारी बारापर्यत सुरू ठेवण्याची मुभा दिली आहे,त्यासाठी व्यापारी संकुले, एकाच सरळ रेषेत दुकाने असल्यस त्यापैकी कुणाला प्राधान् राहिल हेही स्पष्ट केले आहे,त्यामुळे एकवटलेल्या बाजारपेठेसाठी या नियमाची व्यावसायिकांच्या दृष्टीने थोडी अडचण होत आहे. याचे प्रत्यंतर आज नवापूर व तळोदा येथे आले. मात्र नियमांच्या चौकटी मोडू नये असे स्थानिक प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 

सर्व प्रकारच्या व्यावसायिकांना चार तास सूट देण्यात आल्याने आज नंदुरबार येथे पहिल्याच दिवशी बाजारपेठ गजबजली होती. असे असले तरी चार तास पुरेसे नाहीत, अशा भावना व्यावसायिकांनी व्यक्त केल्या आहेत. जिल्ह्यात आज सर्वाधिक गर्दी इलेक्टाक्सच्या दुकानात झालेली होती. 
गुढीपाडवा आणि अक्षय तृतीयेचा सण व्यापारी व्यावसायिकांच्या हातून निघून गेला. यावेळी इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक वस्तू ,वाहने खरेदीला चांगला प्रतिसाद मिळतो.फेब्रुवारी महिन्यापासून एसी, कुलर,पंखे आदी वस्तूंचा हंगाम चांगला असतो. त्यामुळे व्यापाऱ्यांनी आपली तयारी केली होती. मात्र हा हंगाम लॉकडाऊनमध्ये अडकून पडल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. तरीही मे महिन्याचा सुरूवातीस चार तासासाठी सूट दिल्याने व्यापारी, व्यावसायिकांना दिलासा मिळा आहे. 

इलेक्ट्रॉनिक्स दुकानांवर गर्दी 
दुकाने उघडण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या ग्राहकांनी विविध साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी केली होती. 
उन्हाळा सुरू असल्याने तापमानाने हैराण झालेल्या नागरिकांनी आज कुलर, एसी, पंखे खरेदीसाठी गर्दी केली होती. इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक साहित्य खरेदीसाठीही विक्रेत्यांकडे मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. मोबाईल, कृषी साहित्य, स्पेअर पार्ट , बांधकाम साहित्य, प्लबिंग मटेरिय़ल आदी साहित्य खरेदीसाठीही विक्रेत्यांकडे गर्दी दिसून आली. 

पहिला दिवस स्वच्छतेचा 
गेल्या दीड महिन्यापासून सर्वच प्रकारचे व्यवस्थापन कार्यालये व प्रतिष्ठाने बंद पडले होते. त्यामुळे आज पहिल्या दिवशी ते उघडल्यावर सर्वत्र धूळ, कचरा व अस्वच्छता दिसून आली.त्यामुळे आजचा पहिला दिवस व्यापारी, व्यावसायिकांचा स्वच्छतेत गेला. मध्येच गिऱ्हाईक आल्यावर त्याला वस्तू देणे, परत स्वच्छता करणे अशातच आजचा दिवस गेला. खऱ्या अर्थाने उद्या (ता.५) पासून व्यावसायिक लाईन लागेल. आज दुकाने उघडताच सर्वत्र किलबिलाट व गजबज वाढला होता. जणू काही शहर पूर्वपदावर आल्याचे चित्र होते. जिकडे तिकडे नागरिकांची वर्दळ, भरधाव वेगाने वाहणारे वाहने असे चित्र होते. 

पोलिसांवर जबाबदारी वाढली 
लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली असली तरी पोलिसांवर प्रशासनाने घालून दिलेल्या निर्बंधामुळे त्याची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांवर जबाबदारी आली आहे. दुचाकीवर दोन सीट नको, चार चाकी वाहनात तीन जणांशिवाय जास्त व्यक्ती नको, शहरात फिरणाऱ्या नागरिकांनी मास्क घातले आहे की नाही, दुकानदार नियमांचे पालन करताहेत की नाही, या सर्व गोष्टींवर पोलिसांचा पहारा आहे. त्यामुळे लॉकडाऊन खुले केले असले तरी पोलिस मात्र जबाबदारीतून मुक्त झालेले नाहीत. ते आजही तेवढ्याच तत्परतेने शहरातील रस्त्यांवर सेवा बजावण्यासाठी सज्ज होते.