लॉकडाऊन'मध्ये लागले 24 विवाह...वर-वधु पित्यांचे वाचले कोटी रुपये ! 

लॉकडाऊन'मध्ये लागले 24 विवाह...वर-वधु पित्यांचे वाचले कोटी रुपये ! 

नंदुरबार : कोरोनामुळे २२ मार्चपासून संचारबंदी आणि लॉकडाउनचा तिसरा टप्पा उद्यापर्यंत (ता. १७) आहे. चौथ्या टप्प्यात काही प्रमाणात शिथिलता मिळणार असल्याचे संकेत आहेत. संपूर्ण ‘लॉकडाउन’ असल्याने या दोन महिन्यांत एकही विवाह सोहळा मोठी गर्दीत होऊ शकलेला नाही. दुसरीकडे अगदी मोजक्याच नव्हे; अगदी वीस लोकांच्या उपस्थितीत जिल्ह्यात सुमारे २४ वर विवाह झाले आहेत. कोणताही खर्च नाही, बडेजाव नाही, अशा साध्या पद्धतीने झालेले हे विवाह म्हणजे कोरोनारूपी नियतीने दिलेला धडाच म्हणावा लागेल. प्राथमिक माहितीनुसार, या विवाहांनी वर-वधुपित्याचे किमान एक कोटी रुपये वाचविले आहेत. 


कोरोनामुळे जिल्ह्यात २२ मार्चपासून लॉकडाउन झाला. तत्पूर्वी, १९ मार्च ही विवाहाची मोठी तारीख होती. मात्र, तोपर्यंत कोरोनाचे भयानक रूप समोर आलेले नसल्याने अनेकांनी मोठ्या थाटात लग्ने उरकली. मात्र, त्यानंतर लॉकडाउन वाढत गेल्याने अनेक जमलेल्या विवाहांचे काय होणार, ही चर्चा सुरू झाली. अनेकांनी परिस्थिती पाहून विवाह रद्द करीत दिवाळीनंतरचे बुकिंगही करून ठेवले. मात्र, मध्यमवर्गीयांनी याही स्थितीत शासनाने दिलेल्या निकषांचा विचार करून अतिशय साध्या पद्धतीने विवाह सोहळे उरकायचे ठरविले. कुणी देवीच्या मंदिरालगत, तर कुणी घरासमोरील मोकळ्या जागेत अतिशय मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हे विवाह उरकले. नातेवाइकांना प्रेमाचा निरोप देत तुम्ही आहेत तिथेच थांबा, असा सल्ला देण्यात आला. 


मध्यमवर्गीयांचा विवाह म्हटला, तरी एका लग्नाचा खर्च किमान तीन लाख रुपये होतो. वरपिताही लोक काय म्हणतील, या भ्रामक भीतीपोटी खर्च करतोच. त्यामुळे हा होणारा चार लाखांचा खर्च धरला, तरी या विवाहातून किमान एक कोटी रुपये वाचले आहेत, असे म्हणायला हरकत नाही. याबाबत ग्रामीण भागातून खूप चांगल्या प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या आहेत. साठी-सत्तरी पार केलेल्या ज्येष्ठांच्या मतानुसार, यापुढे विवाह सोहळे असेच साध्या पद्धतीने झाले पाहिजेत, तरच शेतकरी वाचू शकेल. नियतीने ही वेळ आणली आहे, तो नियमच करून टाका, तर मोठ्या प्रमाणावर बचत होऊन शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ येणार नाही. 

 आर्वजून पहा : धक्कादायक...अजून जिल्ह्यात सात कोरोना बाधित रूग्ण आढळले ! 

काही उदाहरणे अशी 
बोराळे (मातकुट) येथील शेतकरी कुटुंबातील रवींद्र महारू पाटील यांचे पुत्र पंकज आणि चोपडा तालुक्यातील चिचाळे येथील भाऊराव ओंकार पाटील यांची कन्या वर्षा यांचा विवाह दोन्ही कुटुंबांतील मोजक्या नातेवाइकांच्या उपस्थितीत झाला. गावातील सामान्य कुटुंबातला हा विवाह होता. 


तळवे (ता. तळोदा) येथील गोविंद हरिभाऊ साळुंखे यांची कन्या मेघा आणि मोहिदा (ता. शहादा) येथील रमण परशुराम शिंदे यांचे पुत्र लक्ष्मण यांचा विवाह दोन्हीकडील मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला. साहजिकच मंडप, बँड, पंगत, आमंत्रण देणे, वऱ्हाडी जमवणे आदी गोष्टी टळल्या. दोन्ही पक्षांची मोठी आर्थिक बचत झाली. 


शहादा येथील गुजर समाजातील गिरधर हरी पाटील यांची कन्या मयूरी आणि कुढावद (ता. शहादा) येथील पुष्पलाल दशरथ चौधरी यांचे पुत्र प्रसाद यांचा विवाहही असाच झाला. शासनाच्या नियमानुसार वर व वधू दोन्ही कुटुंबीयांकडून दहा नातेवाइक उपस्थित होते. लेवा गुजर समाजाने हा बदल स्वीकारत एक पाऊल पुढे टाकले आहे. 

घराच्या धाब्यावर झाला विवाह! 
शनिमांडळ ः येथील नयनसिंग दैलतसिंग राजपूत यांची कन्या उमा आणि सतार (ह. मु. वरसूस, ता. शिंदखेडा) येथील (कै.) विजयसिंग आंनदसिंग राजपूत यांचे पुत्र हेमंत यांचा विवाह शनिमांडळ येथे राहत्या घराच्या धाब्यावर गोरज मुहूर्तावर लावण्यात आला. वधुमाता-पिता, वरमाता- पिता व दोघांकडील मामा यांच्याव्यतिरिक्त नवरदेवाचे व नवरीचे भाऊ व पुरोहित एवढेच लोक उपस्थित होते. लग्नाच्या वाचलेल्या खर्चातून गावातीलच गरीब वस्तीत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून त्यांना काही दिवसांचा आधार दिला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com