तळोदेचे झाले तळोदा; पहा कसा होता नामकरणाचा इतिहास

तळोदेचे झाले तळोदा; पहा कसा होता नामकरणाचा इतिहास
history taloda
history talodahistory taloda

तळोदा (नंदुरबार) : तळोदे शहर नावाचा अपभ्रंश होऊन आता तळोदा असा उल्लेख वाढला आहे. असे असले तरी जुन्या नोंदीमध्ये व वयोवृद्ध नागरिकांचा लेखनात अजूनही तळोदे असेच लिहिलेले पहावयास मिळते. त्यात ज्या ऐतिहासिक कारणांसाठी तळोदे असे नामकरण शहराचे झाले होते ते देखील नव्या पिढीसाठी मार्गदर्शक असे आहे. त्याची चर्चा अधून मधून जाणकार व वयोवृद्ध नागरिक करीत असतात. मात्र तो इतिहास जपण्याची गरज आहे. दुसरीकडे इंटरनेटवर शहराचा शोध घेतला तर आजही अनेक वेबसाइटवर तळोदे असाच उल्लेख आढळत माहिती उपलब्ध होते. त्यामुळे तळोदे की तळोदा उल्लेख करावा असा संभ्रम आजही कायम आहे.

तळोदे हे खानदेशातील एक महत्त्वाचे शहर आहे. त्यात बारगळ जहागीरदार यांच्या जहागिरीमुळे खानदेशात तळोद्याची एक वेगळी ओळख आहे. मुघल व त्याआधीचा काळातही तळ देण्याचे हक्काचे ठिकाण म्हणून येथील परिसराची ओळख होती. एकीकडे इंदोर तर दुसरीकडे दक्षिणेकडील नाशिक पुण्यापर्यंतच्या प्रदेशात या ऐतिहासिक गुणांनी या ठिकाणाचे आपले स्थान अबाधित राखले होते.

असे झाले होते नामकरण

तळोदे असे शहराचे नामकरण कसे झाले; याबद्दल दोन आधार सांगितले जातात. त्यातील पहिला आधार म्हणजे पाचशे ते आठशे वर्षांच्या इतिहासात विविध राजवटीमध्ये सैन्यदलाला दक्षिणेकडून उत्तरेकडे कूच करावयाचे असल्यास काही ठिकाणी तळ द्यावे लागत होते. तळोद्याच्या परिसर आधीपासून भरपूर पाण्याने समृद्ध असा असल्याने मुबलक पाण्याच्या साठ्यामुळे येथे राहण्यासाठी योग्य जागा होती. त्यात दक्षिणेकडून येणाऱ्या सैन्याला उत्तरेकडे जात असताना सातपुड्याच्या पर्वतरांगा पार कराव्या लागत असल्याने ते आराम करण्यासाठी तळोद्याला तळ देत असत तर सातपुडा उतरून पुन्हा दक्षिणेकडे जावयाचे असल्यास पुन्हा आराम करण्यासाठी तळ द्यावा लागत असे. तेच तळ देण्याचे ठिकाण म्हणजेच तळोदे असे नामकरण झाल्याचे सांगितले जाते.

सात तळे असल्‍याचा दुसरा उल्‍लेख

दुसरीकडे ऐतिहासिक बारगळ गढीचे बांधकाम करण्यासाठी मातीची व विटांची तटबंदी बांधण्यासाठी गढीच्या आजूबाजूला असणाऱ्या जागेवरून माती खणण्यात आली व त्यामुळे परिसरात आजूबाजूला सात तळे तयार झाले. तळे तयार झाल्याने यांवरून तळोदे हे नाव पडले असावे असेही म्हटले जाते. शहराचे नामकरण कसे झाले याची चर्चा या ऐतिहासिक कारणांवरून केली जात असली तरी महसूल दप्तरी तळोदे असाच उल्लेख आजही आढळतो. जुन्या कागदपत्रांमध्ये आजही तळोदे असेच लिहिलेले आढळते परंतु नवीन गोष्टी घडत असल्याने आता तळोदे मागे पडून तळोदा असा उल्लेख वाढला आहे.

तळोदे की तळोदा

व्यापारी प्रतिष्ठाने, बँका, एसटीबस सेवा व इतरठिकाणी तळोदा असेच लिहिलेले दिसते. तळोदेच्या अपभ्रंश तळोदा असे झाले तरी त्याचे ऐतिहासिक महत्त्व एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे जाणे महत्त्वाचे आहे. अन्यथा तळ देण्याची जागा असा होणारा उल्लेख मागे पडण्याची भीती आहे. त्यामुळे तळोद्याचे तळे राखावयाचे असेल तर तळोदे असेच म्हणावे असेही गमतीने म्हटले जाते.

संपादन- राजेश सोनवणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com