नंदुरबारला पाच समित्या सभापती बिनविरोध 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 14 January 2020

बांधकाम सभापतिपदी दीपक दिघे, महिला व बालकल्याण समिती सभापतिपदी कल्याणी मराठे, शिक्षण समिती सभापतिपदी ज्योती पाटील, पाणीपुरवठा समिती सभापतिपदी कैलास पाटील, तर आरोग्य व स्वच्छता समिती सभापतिपदी शारदा ढंडोरे यांची निवड करण्यात आली. 

नंदुरबार : नंदुरबारसह तळोदा , नवापूर पालिकेच्या प्रत्येकी पाच विषय समितींच्या सभापती व सदस्यांचा निवडीसाठी आज तिन्ही पालिकांमध्ये विशेष सभा झाल्या. त्या सभेत सवार्नुमते विषय समिती सभापतींची निवड प्रक्रिया शांततेत पार पडल्या. 
येथील पालिका विषय समित्यांच्या सभापतींची निवड सर्वानुमते बिनविरोध करण्यात आली. बांधकाम सभापतिपदी दीपक दिघे, महिला व बालकल्याण समिती सभापतिपदी कल्याणी मराठे, शिक्षण समिती सभापतिपदी ज्योती पाटील, पाणीपुरवठा समिती सभापतिपदी कैलास पाटील, तर आरोग्य व स्वच्छता समिती सभापतिपदी शारदा ढंडोरे यांची निवड करण्यात आली. 
पालिकेत विषय समिती सभापतींची एका वर्षाने निवड करण्यात येते. मावळत्या सभापतींनी पदाचा राजीनामा दिल्याने आज पालिकेत निवडप्रक्रियेसाठी विशेष सभा घेण्यात आली. यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत होत्या. याप्रसंगी नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी, उपनगराध्यक्षा भारती राजपूत, मुख्याधिकारी भीमराव बिक्कड आदी उपस्थित होते. पाच विषय समित्यांच्या सभापतिपदासाठी प्रत्येकी एक अर्ज आल्याने बिनविरोध निवड झाली. 
बांधकाम समिती सभापतिपदी दीपक प्रभाकर दिघे, महिला व बालकल्याण समिती सभापतिपदी कल्याणी अर्जुन मराठे, शिक्षण समिती सभापतिपदी ज्योती पाटील, पाणीपुरवठा समिती सभापतिपदी कैलास पाटील यांची पुनर्निवड झाली, आरोग्य व स्वच्छता समिती सभापतिपदी शारदा प्रकाश ढंढोरे आणि स्थायी समितीच्या सभापतिपदी नगराध्यक्षा रत्ना चंद्रकांत रघुवंशी व नियोजन समिती सभापतिपदी उपनगराध्यक्षा भारती अशोक राजपूत यांची निवड झाली. 
यावेळी नवनियुक्त सभापतींचा अधिकाऱ्यांसह नगरसेवकांनी सत्कार केला. माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी, उपनगराध्यक्षा भारती राजपूत, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ. विक्रांत मोरे यांनी नवनियुक्त सभापतींचा सत्कार केला. यावेळी निवडून आलेल्या सभापतींच्या समर्थकांनी आतषबाजी करून ढोल-ताशांचा गजर करीत जल्लोष केला.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar palika sabhapati election