esakal | नंदुरबारमधून लालपरीला मिळाले तीसच प्रवाशी...आता वेळापत्रक निश्‍चित; कशी धावणार बस 
sakal

बोलून बातमी शोधा

bus

जगभरात कोरोनाने थैमान घातल्याने मार्चपासून देशात सर्वत्र लॉकडाउन जाहीर करण्यात आला होता. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद करण्यात आली होती. गोरगरिबांची जीवनवाहिनी समजली जाणाऱ्या एसटीचीही चाके थांबली होती. इतिहासात पहिल्यांदाच राज्य परिवहन महामंडळाची बससेवा सलग सहा महिन्यांपासून ठप्प होती.

नंदुरबारमधून लालपरीला मिळाले तीसच प्रवाशी...आता वेळापत्रक निश्‍चित; कशी धावणार बस 

sakal_logo
By
धनराज माळी

नंदुरबार : कोरोनामुळे मार्चपासून राज्य परिवहन महामंडळाची बससेवा बंद होती. ‘मिशन बिगीन-४’ अंतर्गत शासनाच्या आदेशान्वये आंतरजिल्हा बससेवेचा गुरुवारी (ता. २०) प्रारंभ करण्यात आला. परंतु पहिल्याच दिवशी प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळाला. बस वाहतुकीसाठी ६० चालक व वाहकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून, येणाऱ्या- जाणाऱ्या सर्वच बसमध्ये सॅनिटायझेशन करण्यात आले. 
जगभरात कोरोनाने थैमान घातल्याने मार्चपासून देशात सर्वत्र लॉकडाउन जाहीर करण्यात आला होता. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद करण्यात आली होती. गोरगरिबांची जीवनवाहिनी समजली जाणाऱ्या एसटीचीही चाके थांबली होती. इतिहासात पहिल्यांदाच राज्य परिवहन महामंडळाची बससेवा सलग सहा महिन्यांपासून ठप्प होती. त्यामुळे महामंडळाला कोट्यवधी रुपयांच्या उत्पन्नावर पाणी फिरवावे लागले. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी एसटीची बससेवा सुरू करण्याच्या निर्णय परिवहनमंत्री ॲड. अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत दिल्यानंतर गुरुवार (ता.२०)पासून नंदुरबार आगारात सकाळपासूनच धुळे व नाशिकसाठी बससेवा सुरू करण्यात आली. नंदुरबार आगारातून आंतरजिल्ह्यासाठी पहिली बस सकाळी साडेआठला सोडण्यात आली. त्यात आठ प्रवासी होते, तर दुसरी बस अकराला नाशिकसाठी निघाली. त्यातही आठच प्रवासी होते. त्यानंतर धुळ्याला दोन बस रवाना करण्यात आल्या. त्यात एका बसमध्ये आठ, तर दुसऱ्या बसमध्ये दहा प्रवासी होते. दुपारपर्यंत ३० प्रवाशांनी आंतरजिल्ह्यात प्रवास केला. 

कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद 
पाच महिन्यापासून परिवहन महामंडळाच्या बस बंद असल्यामुळे शासनाला कोट्यवधी रुपयांचे नुकसान सोसावे लागले. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नव्हते. कर्मचाऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले. अनेकांना सक्‍तीच्या रजा घ्याव्या लागल्या. लॉकडाउनमध्ये जसजशी शिथिलता मिळत गेली, तशी वाहतूक व्यवस्था थोड्याफार प्रमाणावर सुरळीत सुरू झाली. आता आंतरजिल्ह्यात प्रवाशांना प्रवास करता येणार असल्यामुळे महामंडळाला उत्पन्न मिळणार आहे. आता सर्व काही व्यवस्थित होणार असल्याची आशा कर्मचाऱ्यांना आहे. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता. 

लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू 
नंदुरबार बसस्थानकाच्या आवारात सकाळपासूनच नियुक्तीचे कर्मचारी कामावर हजर झाले. मेपासून जिल्हाअंतर्गत बसच्या प्रवासाला सुरवात करण्यात आली आहे. परंतु, प्रवाशांकडून पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही. शासनाच्या आदेशान्वये आंतरजिल्ह्यात प्रवासासाठी बसला मुभा देण्यात आली आहे. प्रवाशांकडून प्रतिसादाची अपेक्षा असून, त्यानुसार पुणे, मुंबई, औरंगाबाद या लांब पल्ल्याच्या गाड्या सोडण्यात येतील, अशी माहिती आगारप्रमुख मनोज पवार यांनी दिली. 

नंदुरबार स्थानकावरून २४ ऑगस्टपासून सुटणाऱ्या बसेसचे वेळापत्रक 

बसचा मार्ग 

पासून -पर्यंत - फेऱ्यांची वेळ 

नंदुरबार-नाशिक - ५,६,७,८,९ः३०,११,१४ः३०,१६,१८,२० 

नंदुरबार-धुळे - ६,८,१०,११,१२,१३,१४,१५,१६,१७,१८,१९,२० 
 
नंदुरबार- शिरपूर- ७,१३ 

नंदुरबार- औरंगाबाद -१५ः३०
 

संपादन : राजेश सोनवणे 

loading image
go to top