नंदुरबारकर स्वतःच झाले ‘होम क्वारंटाइन’! 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 18 April 2020

शहरातील ४८ वर्षीय व्यक्तीचा ‘कोरोना’ संसर्गाचा अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आल्याची माहिती शुक्रवारी (ता. १७) रात्री आठच्या सुमारास गावात पसरली. तेव्हापासून शहरवासीयांमध्ये खळबळ उडाली आहे

नंदुरबार : शहरात ‘कोरोना’ संसर्ग ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण आढळल्याने आजपासून तीन दिवस संचारबंदीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. दवाखाने व औषध विक्रेते वगळता सरसकट सर्व बंद ठेवण्याचे आदेशात म्हटले आहे. त्यामुळे आज शहरात सकाळपासूनच सर्वत्र सन्नाटा पसरला होता. रस्त्यांवर बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त दिवसभर कोणीही बाहेर पडले नाही. अखेर रुग्ण आढळून आल्यावरच सर्वांना ‘कोरोना’ची भीती वाटू लागली असल्याने नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने स्वतःला घरात ‘क्वारंटाइन’ करून घेतल्याचे चित्र दिसून आले. 

अक्‍कलकुवा सीमेलगत सन्नाटा!

शहरातील ४८ वर्षीय व्यक्तीचा ‘कोरोना’ संसर्गाचा अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आल्याची माहिती शुक्रवारी (ता. १७) रात्री आठच्या सुमारास गावात पसरली. तेव्हापासून शहरवासीयांमध्ये खळबळ उडाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी रात्रीच तीन दिवस कडक संचारबंदीचे आदेश काढले. त्यानुसार शहारातील १४ मुख्य रस्त्यांवर रात्रीतून बॅरिकेट्स लावण्यात आले. यापूर्वी शहरातील मुख्य सहा रस्त्यांवर पोलिसांनी बॅरिकेट्स लावले होते. 

हे ही वाचा : अठराविश्‍व दारिद्रय तरीही नाकारली मदत...म्हणाले गरजूंना द्या सामान

तीन दिवस कडक संचारबंदी 
‘कोरोना’ प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून २० एप्रिलपर्यंत शहरातील वैद्यकीय सेवा व औषधांची दुकाने वगळता इतर सर्व आस्थापना अर्थात भाजीपाला, किराणा, पेट्रोलपंपासह बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत. नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले असून, शहरात अनावश्यक बाहेर पडल्यास कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. भारूड यांनी आदेशात म्हटले आहे.  

रस्ते झाले निर्मनुष्य 
जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदीचे आदेश जारी करताच आज सकाळपासूनच पोलिस चौकाचौकांत तैनात झाले होते. शहरात सोशल मीडियाच्या माध्यमातून संचारबंदीची माहिती नागरिकांपर्यंत पोचली होती. मात्र, ग्रामीण भागातील अनेकांना त्याबाबत माहिती नव्हती. अनेकांना रस्त्यांवरून परतावे लागले. यावेळी भाजीपाला, दूध, पेट्रोलपंपही बंद केल्याने व पोलिसांनी कडक भूमिका घेतल्याने शहरात रस्त्यांवर कोणीही फिरताना दिसून आले नाही. परिणामी शहरातील रस्ते निर्मनुष्य झाले होते. 
 

अखेर एका रुग्णाने केला घोळ 
नंदुरबार जिल्ह्यात गेल्या २६ दिवसांच्या ‘लॉकडाउन’ काळात एकही ‘कोरोना’चा रुग्ण आढळला नाही. सर्वाधिक धोका नंदुरबारला असताना जिल्हा ‘कोरोनामुक्त’ होता. शासन- प्रशासनाचे योग्य नियोजन व प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे नंदुरबार ‘ग्रीन झोन’मध्ये मोडत होता. वीस एप्रिलनंतर कदाचित टप्प्याटप्प्याने ‘लॉकडाउन’ शिथिल करून नंदुरबारवासीयांना मोकळे फिरता आले असते. सर्वांचे व्यवहार सुरू होऊन नागरिकांचा रोजीरोटीचा प्रश्‍न सुटला असता. प्रशासन जरी सतर्क असले, तरी शेवटी बाहेरगावच्या माध्यमातून शहरातील एकाला ‘कोरोना’ झाल्याचे निष्पन्न झाले. ‘ग्रीन झोन’मधील नंदुरबार जिल्ह्याचा ‘ऑरेंज झोन’मध्ये समावेश होईल. शेवटी एका रुग्णामुळे जिल्ह्याने एवढे दिवस सतर्क राहून केलेल्या उपाययोजनांवर पाणी फिरल्याच्या भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news Nandurbar people home quarantine