नंदुरबार जिल्ह्यात अतिवृष्टी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

नंदुरबार ः नंदुरबार जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत अतिवृष्टी झाली असून, सर्व सहा तालुक्‍यांत सरासरी147 मी. मी. पावसाची नोंद झाली आहे. पावसाने अवघा जिल्हा जलमय झाला आहे. अंकलेश्वर बऱ्हाणपूर, नागपूर, सुरत हे महामार्ग तसेच नंदुरबार- शहादा आणि शहादा- तोरणमाळ हे राज्य मार्ग ठप्प झाले आहेत. येत्या चोवीस तासांत जिह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. 

नंदुरबार ः नंदुरबार जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत अतिवृष्टी झाली असून, सर्व सहा तालुक्‍यांत सरासरी147 मी. मी. पावसाची नोंद झाली आहे. पावसाने अवघा जिल्हा जलमय झाला आहे. अंकलेश्वर बऱ्हाणपूर, नागपूर, सुरत हे महामार्ग तसेच नंदुरबार- शहादा आणि शहादा- तोरणमाळ हे राज्य मार्ग ठप्प झाले आहेत. येत्या चोवीस तासांत जिह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. 

दीडशेवर घरांची पडझड 
जिल्ह्यातील नदी नाल्यांना पूर येऊन अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. रोझवा पुनर्वसन वसाहतीतील पंचवीसहून अधिक घरे पाण्याखाली गेली असून, जिल्हाभरात दीडशेवर घरांची पडझड झाली आहे. नवापूर येथे एक जण वाहून गेला आहे. नंदुरबार, नवापूर, शहादा आणि तळोदा शहरात रविवारी पहाटेपासून दुपारी बारापर्यंत पूरस्थिती निर्माण झाली. वसाहतींना पाण्याचा वेढा पडला आहे. कृषी बाजार समिती, रुग्णालये, बसस्थानक परिसर सगळेच जलमय झाले असून, या सर्व शहरांमधील वाहतूक काही काळ बंद होती. 

वाहतूक खोळंबली 
नंदुरबार -शहादा रस्ता बंद असून, या दोन शहरांमधील संपर्क तुटला आहे. या रस्त्यावरील सिमेंटचा स्लॅब वरच तरंगला असून, खालून सर्व मुरूम वाहून गेला आहे. परिणामी जड वाहतुकीबरोबरच सामान्य वाहनांना देखील तो रस्ता धोकादायक बनला आहे. विशेष म्हणजे तळोदाकडून येणाऱ्या अंकलेश्‍वर-बऱ्हाणपूर राष्ट्रीय महामार्गाचाच हा भाग असल्याने तेथून होणारी सर्व आंतरराज्यीय जड वाहतूक खोळंबली आहे. ती अन्य आडमार्गाने वळविण्यात आली आहे. बरीच वाहने तिकडून नंदुरबारला येऊन दोंडाईचामार्गे निघू लागली आहेत. 

नदीला पूर, पूल पाण्याखाली 
धडगाव तालुक्‍यातही अतिवृष्टी होऊन उदय नदीला पूर आला. दरंड कोर्गालवरील संपर्कही खंडित झाला. याच मार्गावरील पालख्या पूल पुराच्या पाण्यात बुडाल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. हतनूर धरणातून सोडलेल्या साडेतीन हजार क्‍युमेक्‍स पाण्यामुळे तापी नदी दुथडी भरून वाहत आहे. प्रकाशा शहर यामुळे जलमय बनले असून, आता तेथील लोक पाऊस थांबण्याची प्रतीक्षा करू लागले आहेत. शहादा तालुक्‍यातील दरा मध्यम प्रकल्पात 84 टक्के पाणीसाठा झाला; तर अन्य लघू बंधारे जेमतेम स्थितीत आहेत. 

अंबेबारा धरण भरले 
नंदुरबारच्या शिवण नदीलाही यंदा पहिल्यांदाच मोठा पूर आला. त्यामुळे नंदुरबारचे अंबेबारा धरण पूर्ण भरून वाहू लागले आहे; तर वीरचक धरणात वीस टक्के जलसाठा वाढला आहे. परिणामी नंदुरबारवासीयांची वर्षभराची पाण्याची चिंता जवळपास मिटली आहे. 

रंगावलीला पूर 
नवापूर तालुक्‍यातील रंगावली नदीला पहिल्यांदाच पूर आला. यामुळे कोरडे पडलेले रंगावली धरण भरून वाहू लागले आहे. सर्पिणी नदी धोक्‍याची पातळी ओलांडण्याच्या स्थितीत आहे. दरम्यान, नंदुरबार तालुका अक्कलकुवा तालुका तळोदा तालुका तसेच शहादा तालुक्‍यात 100 हून अधिक घरांची पडझड झाली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar rain ativrusti