बिगरमोसमी पावसाने उडविली झोप! 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 7 March 2020

बाजार समितीत असलेले व्यापाऱ्यांचे धान्य, मका भिजला. यामुळे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, काढणीला आलेल्या गव्हावर फारसा परिणाम झालेला नसला, तरी पावसामुळे कमी झालेल्या तापमानाचा उशिरा पेरणी झालेल्या गव्हाला फायदा होणार आहे. 

नंदुरबार : शहरासह परिसरात आज सकाळी साडेसातच्या सुमारास बिगरमोसमी पावसाने हजेरी लावली. सुमारे दहा ते पंधरा मिनिटे झालेल्या या हलक्या सरींनी मिरची व्यापारी अन् शेतकऱ्यांची झोप उडविली. अचानक आलेल्या या पावसाने पथारीवर वाळत ठेवलेल्या मिरच्या भिजल्या, तसेच बाजार समितीत असलेले व्यापाऱ्यांचे धान्य, मका भिजला. यामुळे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, काढणीला आलेल्या गव्हावर फारसा परिणाम झालेला नसला, तरी पावसामुळे कमी झालेल्या तापमानाचा उशिरा पेरणी झालेल्या गव्हाला फायदा होणार आहे. 

हेपण पहा - धुळे शहर "ओडीएफ प्लस-प्लस'
 

वातावरणात गुरुवारी (ता. ५) रात्रीपासून गारठा निर्माण झाला होता. रात्री थंडी जाणवत होती. सकाळी वातावरण बदलले. सूर्यदर्शन न होता काहीसे धुकेमय वातावरण होते. पावसाचे कोणतेही चिन्ह नव्हते. सकाळी अचानक पावसाला सुरवात झाल्याने शेतकऱ्यांसह येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांची धावपळ उडाली होती. पथारीवर वाळलेली मिरची झाकण्यासाठी एकच धांदल उडाली. जवळपास पंधरा मिनिटे पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे बाजार समितीत शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेले ज्वारी, गहू, मका ही पिके शेडच्या बाहेर टाकलेली असल्याने पावसात सापडली. बाजार समितीत काही भाग उताराचा असल्याने तेथे असलेल्या धान्याच्या ढिगातून पाण्यासोबत धान्य वाहू लागले. व्यापाऱ्यांचे धान्याची पोती भिजली. 

मिरची व्यापाऱ्यांनी शहराबाहेर पथाऱ्या थाटल्या आहेत. दिवसा ऊन पडत असल्याने व पाऊस येईल, असे कोणतेही वातावरण दिसत नसल्याने मिरची वाळविण्यासाठी उघड्यावरच टाकलेल्या होत्या. काहींचे ढीग पडले होते. पावसाला सुरवात होताच ते झाकण्यासाठी मिरची व्यापाऱ्यांची एकच धावपळ उडाली. यात मोठे आर्थिक नुकसान झालेले नसले, तरी शेतकरी व व्यापाऱ्यांचा माल भिजला, धावपळ उडाली. केवळ पंधरा मिनिटांत शेतकरी व व्यापाऱ्यांना नाकीनऊ आणून सोडले. 
 
शेतातील धान्याला धोका 
सध्या गहू, उन्हाळी मका, हरभरे पिके काढणीवर आले आहेत. काहींची काढणी सुरू आहे; तर काही जणांनी पिके कापून शेतात ठेवली आहेत. अंतिम टप्यातील कापूस काढणी सुरू आहे. अशातच पावसाच्या सरी कोसळल्याने रब्बीतही पाऊस नुकसान करतो की काय, अशी भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar rain farmer Pepper product loss