ऑनलाईन अभ्यासासाठी इथे जलकुंभ व टेकड्यांचा आधार 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 2 July 2020

लॉकडाउनमुळे शाळा, महाविद्यालये बंद असल्याने घरी थांबून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी इंटरनेटची सुविधा आवश्‍यक आहे. मात्र मोबाईल रेंजचा फज्जा उडाला आहे. शहरात सर्व मोबाईल कंपन्यांचे नेटवर्क मिळते. मात्र ग्रामीण भागात रेंज मिळत नसल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी अभ्यासक्रमात मागे पडतील,

सारंगखेडा : जेवढे उंचावर जाणार तेव्हाच मोबाईलला रेंज मिळेल, अशी परिस्थिती असल्यामुळे सारंगखेडा परिसरातील कळंबू, टेंभा, देऊर, कुहावद, कवठळ ( ता. शहादा ) या पाच गावातील ग्रामस्थांना जलकुंभाचा अथवा टेकड्यांचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे ग्रामस्थ वैतागले आहेत. त्यातच विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्याचा निर्णय शाळांनी घेतल्याने या गावांमधील विद्यार्थ्यांनी कुठे जावे? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

आवर्जून वाचा - संशयीताचा मृत्यू...तरीही पॅकिंग उघडून मृतदेहाची आंघोळ; शंभर जणांची उपस्थिती, गुन्हा दाखल 

मोबाईल रेंज मिळविण्यासाठी नागरिकांना पाण्याचा टाकीवर, गावाच्या वेशीवर, तर कुठे उंच टेकड्यांवर चढून गेल्यावर संपर्क साधावा लागत आहे. अशा परिस्थितीत ऑनलाइन शिक्षण विद्यार्थ्यांना घेणे शक्‍यच नाही. विज्ञान आणि तंत्रज्ञानाने नेत्र दिपवून टाकणारी प्रगती साधली असली तरी आजही ग्रामीण भागात अनेक गाव पाड्यांपर्यंत विकसित व अद्ययावत तंत्रज्ञान पोहोचले नाही. टेंभा, देऊर, कळंबू , कुहावद, कवठळ ( ता. शहादा) येथे मोबाईल कंपन्यांनी ग्राहकांना अक्षरशः सर्वच पातळ्यांवर मेटाकुटीला आणले आहे. सध्या लॉकडाउनमुळे शाळा, महाविद्यालये बंद असल्याने घरी थांबून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी इंटरनेटची सुविधा आवश्‍यक आहे. मात्र मोबाईल रेंजचा फज्जा उडाला आहे. शहरात सर्व मोबाईल कंपन्यांचे नेटवर्क मिळते. मात्र ग्रामीण भागात रेंज मिळत नसल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी अभ्यासक्रमात मागे पडतील, अशी चिंता पालकांमध्ये व्यक्त होत आहे. शहादा तालुक्‍यात ग्रामीण भागातील मोठ्या गावांमध्ये यंत्रणा कार्यान्वित असली तरी खेड्यांवर त्याची रेंज मिळत नसल्याने "आऊट ऑफ रेंज', "नॉट रिचेबल', "नेटवर्क बिझी' अशी उत्तरे तर सातत्याने मिळतात. 
 
कनेक्‍टीव्हीटीसाठी स्पॉट ठरलेले 
कळंबू , टेंभा, देऊर या गावात मोबाईलची रेंज मिळावी, यासाठी झाडावर, जलकुंभावर, भिंतीवर, गावालगतच्या उंच टेकडीवर ग्रामस्थांसह तरुणांना जावे लागत आहे. हे जेवढे मजेशीर वाटते तेवढेच संतापजनकही आहे. तंत्रज्ञान प्रगत होत असले तरी हा प्रयोग होतो. अशा परिस्थिती मध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण ही दिवास्वप्न ठरले आहे . 
 
आमच्या गावात एक वर्षापूर्वी आयडिया, वोडाफोनचा टॉवर होता. मात्र या कंपनीने टॉवर बंद केल्यापासून रेंज मिळत नाही . रेंज मिळविण्यासाठी घराच्या छतावर उभे राहावे लागते. 
-राजेंद्र पाटील (ग्रामस्थ), टेंभा, ता. शहादा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar sarankheda village no internet range disconnect student online study