esakal | नंदुरबारः सातपुड्यातील रानमेव्याला परराज्यात मागणी वाढली
sakal

बोलून बातमी शोधा

Custard apple

नंदुरबारः सातपुड्यातील रानमेव्याला परराज्यात मागणी वाढली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा


नंदुरबार ः सातपुड्यातील (Satpuda) रानमेवा म्हणून प्रसिद्ध असलेल्या सीताफळांची (Custard apple) आवक धडगाव येथे वाढली आहे. खरेदीसाठी मध्य प्रदेश (Madhya Pradesh) व गुजरात (Gujarat) राज्यातील व्यापारी रानमेवा खरेदीसाठी धडगावात दाखल होऊ लागले आहेत. सीताफळाची स्वतंत्र बाजारपेठ (Market) नसल्यामुळे सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांना (Farmers) समानकारक भाव मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा तोटा व व्यापाऱ्यांचा फायदा, असे चित्र दिसून येत आहे.

हेही वाचा: जळगाव मनपाःभाजपाने शिवसेनेची केली कोंडी; महासभा तहकुब


सातपुड्याच्या डोंगरदऱ्यांत नैसर्गिक पद्धतीने पिकवलेल्या सीताफळाची यंदा उत्पादनात चांगली वाढ झाली आहे. कोणत्याही रासायनिक खतांचा वापर न करता नैसर्गिक रित्या उत्पादित झालेल्या सीताफळांची सातपुड्यातील रानमेवा म्हणून प्रसिद्धी आहे. यंदा अतिवृष्टी व वादळी वारा कमी झाल्याने फळधारणा चांगली झाली आहे, तसेच फळ गळती थांबल्याने उत्पादनात वाढ झाली आहे. सध्या धडगाव बाजारपेठेत सीताफळांची आवक वाढली असून दीडशे ते दोनशे रुपये टोपली विक्री होत आहे. सातपुड्यातील रानमेवा खरेदीसाठी गुजरात मध्य प्रदेश येथील व्यापारी धडगावात दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून सीताफळांची टोपली पद्धतीने विक्री होत असल्याने शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळत नाही. त्यामुळे धडगाव येथे सीताफळ विक्रीसाठी स्वतंत्र बाजारपेठ उपलब्ध व्हावी जेणेकरून वजनाने व लिलावाद्वारे विक्री होऊन शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त मिळेल, अशी व्यवस्था शासनाने व लोकप्रतिनिधींनी करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

हेही वाचा: जळगावः धरण स्थळावरील पर्यटन केंद्राचा प्रस्ताव लालफितीत


फळ प्रक्रिया उद्योगाची घोषणा हवेतच
सातपुड्याचा डोंगर दऱ्यातील जनतेला नैसर्गिक वनसंपत्तीचे वरदान लाभले आहे. येथे शेती चांगली नसली तरी इतर वनउपज मोठ्या प्रमाणात उत्पादित होतात. टोळंबी, आंबा, सीताफळ यासारखे अनेक फळे येथी रहिवाशांचे पोटाची खळगी भरण्याचे साधने बनली आहेत. मात्र या ठिकाणी या उत्पादनाला स्थानिक बाजारपेठ नाही. त्यामुळे श्रमाचा तुलनेत मोबदला कमी मिळतो. त्यामुळे वर्षभर जेमतेम पोटाची खळगी भरेल एवढे आर्थिक उत्पन्न मिळते. त्यासाठी या परिसरात प्रक्रिया उद्योग उभारण्याची मागणी वेळोवेळी झाली आहे. मात्र नेहमीची येतो पावसाळा या उक्तीप्रमाणे आत्तापर्यंत सारेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व राजकीय नेते आले, मागणीला होकार देत आश्‍वासने दिले. मात्र एकही आश्‍वासनांची पूर्तता अद्याप झालेली नाही. त्यामुळे नेत्यांची आश्‍वासने हवेतच विरल्याचे चित्र आहे. जर या ठिकाणी प्रक्रिया उद्योग सुरू झाल्यास आमचूर, टोळंबी, महूफुले, सीताफळ, भगर यासरखे उद्योग सुरू होऊन या भागाचा विकास होऊ शकेल.

loading image
go to top