esakal | शहादा शहर-तालुक्याला मुसळधारेचा तडाखा; पिकांचे नुकसान
sakal

बोलून बातमी शोधा

 Heavy Rain Crop Damage

शहादा शहर-तालुक्याला मुसळधारेचा तडाखा; पिकांचे नुकसान

sakal_logo
By
कमलेश पटेल


शहादा :
तालुक्यात मंगळवारी रात्री वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या मुसळधार (Heavy Rain) पावसाने सर्वत्र हाहाकार उडाला. अनेक नदी-नाल्यांना प्रथमच पाणी (Flood) आले. दरम्यान या धुवाधार पावसामुळे ऊस, पपई, केळी, मिरची या पिकांचेही नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. तालुक्यात २४ तासांत सरासरी ९३.८ मिमी पावसाची नोंद झाली. दरम्यान नुकसानग्रस्त (Crop Damage) पिकांची पाहणी करून त्वरित पंचनामे करावेत, अशी मागणी होत आहे.

हेही वाचा: रस्ता बंद..म्हणून पतीने खांद्यावर पत्नीला उचल्ले, पण वाटेतच मृत्यू


तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात पिकांची परिस्थिती नाजूक असतानाच सप्टेंबर महिन्यात आलेल्या जोरदार अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यात तालुक्यातील बहुतांशी भागात विविध पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी पुरता कोलमडला आहे. मुसळधार पावसाने पिकांना चांगलेच झोडपल्याने पिके जमिनीवर आडवी झाली आहेत. असे असले तरी या पावसामुळे नदी-नाल्यांना प्रथमच पाणी आल्याने रब्बीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. गेल्या वर्षी कोरोनामुळे उत्पादित मालाला भाव नव्हता परंतु उधार उसनवार, कर्ज काढून कसेबसे शेतकऱ्यांनी पेरणी केली. त्यातच पाण्याचा पत्ता नसल्याने खरीप हंगाम येतो की नाही, अशी चिंता सतावत होती. मंगळवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने पिकांना आडवे केल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.


शहादा शहरातही मंगळवारी सायंकाळी अतिवृष्टी झाल्याने शहरातील विविध वस्त्या, रस्ते, शासकीय कार्यालये जलमय झाली. काही ठिकाणी वृक्षांची पडझड झाल्याने काही काळ विद्युत पुरवठा खंडित झाला होता. वीज वितरण कंपनीचा कर्मचाऱ्यांनी विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी परिश्रम घेतले. शहादा मंडळात १४६ मिमी पावसाची नोंद झाली. शहरासह सायंकाळी सातच्या सुमारास मेघगर्जनेसह जोरदार पावसाला सुरवात झाली. तब्बल दोन तास मुसळधार झाला. तदनंतर विश्रांती घेत सौम्य धारा बरसल्या. जोरदार पावसामुळे सर्वत्र पाणी साचले होते. त्यात शहरातून जाणाऱ्या पाटाचे व इतर भागातील पाणी शहरात आल्याने डोंगरगाव रस्त्यावरील न्यायालय परिसर, प्रांत अधिकारी कार्यालय तसेच दोंडाईचा रस्त्यावरील शासकीय विश्रामगृह, सार्वजनिक बांधकाम विभाग, स्टेट बँक आवार सर्वत्र पाण्याखाली होते.

हेही वाचा: चाळीसगाव पुराच्या कटू आठवणी..पुन्हा आठव्या दिवशी


दरम्यान २०१९ ची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी काही वकील बांधवांनी तत्काळ न्यायालय परिसरात धाव घेत महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षित स्थळी हलविले. दरम्यान ज्या कार्यालय परिसरात पाणी साचले आहे त्या साऱ्याच अधिकाऱ्यांना काही काळ कार्यालयात जाणे पाण्यामुळे जायबंदी झाले होते. प्रांताधिकारी कार्यालयात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने परिसर जलमय झाला होता. शहरालगत जाणाऱ्या भेंडवा नाल्याला यंदा प्रथमच पाणी आले. नाल्यालगतच शहराला पाणीपुरवठा करणारे पालिकेचे जलशुद्धीकरण केंद्र असून त्यात पाणी गेल्याने शहराचा पाणीपुरवठाही विस्कळित झाला. कर्मचाऱ्यांमार्फत पालिकेने लागलीच साफसफाई सुरू केली. दरम्यान शहरातील वसाहतींमध्ये व मुख्य रस्त्यांवर पाणी मोठ्या प्रमाणावर वाहत असल्याने नागरिक त्याच्यातून मार्ग काढत होते.

हेही वाचा: चोरट्यांनी जळगाव शहरात केली हॅटट्रिक..!


मंडळनिहाय पर्जन्य (मिमीमध्ये)
शहादा : १४६
कलसाडी : १२८
प्रकाशा : ८६
ब्राह्मणपुरी : ९२
म्हसावद : ८२
मोहिदे त.श. : १०५
वडाळी : ४१
असलोद : ९०
मंदाणा : ८२
सारंगखेडा : ८६
तालुका एकूण सरासरी : ९३.८ मिमी

loading image
go to top