विशेष मोहिम...छत्तीस हजार नागरिकांना नवीन शिधापत्रिका ! 

धनराज माळी 
Friday, 17 July 2020

संकटाच्या काळात नागरिकांना शिधापत्रिका प्राप्त झाल्याने अंत्योदय कुटुंबाला ३५किलो अन्नधान्य वितरण करण्यात येणार आहे. प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत प्रती सदस्य ५ किलो धान्य वितरण करण्यात येणार आहे.

नंदुरबार  : जिल्हा प्रशासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या नवीन शिधापत्रिका वितरित करण्याच्या विशेष मोहिमे अंतर्गत गेल्या चार महिन्यात सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत दहा हजार ७६८ शिधापत्रिकांची वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ३६ हजार २३१ व्यक्तींना अन्नधान्याचा लाभ होणार आहे. 

जिल्हाधिकारी राजेंद्र भारूड यांनी जिल्ह्यातील शिधापत्रिका नसलेल्यांना त्या उपलब्ध करून देणे व असलेल्यांना अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेचा लाभ देणे, अशा दोन्ही पातळ्यांवर विशेष मोहीम राबविण्यात आली. त्यानुसार चार हजार शंभर नव्या शिधापत्रिका वितरित करण्यात आल्या, तर ६ हजार ६६८ शिधापत्रिकांचा समावेश दोन्ही योजनेत करण्यात आला. 
अंत्योदय योजना 

या अंतर्गत एकूण ३७१९ शिधापत्रिकांची वाढ झाली आहे. त्यापैकी अक्कलकुवा १७१३, अक्राणी १०६०, शहादा १२३१ आणि नंदुरबार तालुक्यातील २६१ आहेत. त्यामुळे अक्कलकुवा तालुक्यातील ८७७८, अक्राणी ४८७९, नंदुरबार ३४६ आणि शहादा ५५२३ व्यक्तींना योजनेचा लाभ होणार आहे. ५४६ शिधापत्रिका रद्द करण्यात आल्याने वाढ झालेल्या व्यक्तींची एकूण संख्या १७ हजार ५०२ झाली आहे. 

प्राधान्य कुटुंब 

या योजनेअंतर्गत एकूण ७०४९ शिधापत्रिकांची वाढ झाली आहे. त्यापैकी अक्कलकुवा २४५८, अक्राणी ८२, शहादा२८९३, नवापूर १५०३ आणि तळोदा तालुक्यातील १२८८ आहेत. त्यामुळे अक्कलकुवा तालुक्यातील ६०४४, अक्राणी ४२०, शहादा१००३३, नवापूर ६१५७ आणि तळोदा तालुक्यातील ४५४१ व्यक्तींना योजनेचा लाभ होणार आहे. ८४६६ शिधापत्रिका रद्द करण्यात आल्याने वाढ झालेल्या व्यक्तींची एकूण संख्या १८ हजार ७२९ आहे. 

असा मिळेल लाभ 

संकटाच्या काळात नागरिकांना शिधापत्रिका प्राप्त झाल्याने अंत्योदय कुटुंबाला ३५किलो अन्नधान्य वितरण करण्यात येणार आहे. प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत प्रती सदस्य ५ किलो धान्य वितरण करण्यात येणार आहे. दोन्ही योजनेअंतर्गत तांदूळ ३ रुपये प्रति किलो व गहू २ रुपये प्रति किलो, याप्रमाणे नियमित अन्नधान्याचे वितरण करण्यात येईल. नियमित अन्नधान्य घेतल्यानंतर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत प्रति सदस्य ५ किलो याप्रमाणे एकूण सदस्य संख्येनुसार मोफत तांदळाचे वाटपही करण्यात येणार आहे. 

नर्मदा काठावर पोचले रेशन कार्ड 

त्यात उडद्या-१४४, भादल-४६, भाबरी-४० असे २३० कुटुंब प्रमुखांना पिवळे रेशन कार्ड देण्यात आले. वर्षानुवर्षे आपल्या हक्काच्या रेशनकार्डपासून वंचित असलेल्या या कुटुंबांना रेशनकार्ड हातात पडताच त्यांचा चेहऱ्यावर आनंद दिसत होता. 
चौकट 

वन नेशन वन रेशन 

नव्याने शिधापत्रिका तयार झाल्याने आणि ‘वन नेशन वन रेशन’ योजनाही राज्यात सुरू झाल्याने स्थलांतर करणाऱ्या नागरिकांना यापुढे नियमितपणे अन्नधान्याचा लाभ इतरही राज्यात घेता येईल. विशेषतः योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या दुर्गम भागातील नागरिकांना या मोहिमेमुळे प्रथमच या दोन्ही योजनांचा लाभ घेता येणार आहे. ही मोहीम यापुढेही सुरू राहणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार यांनी दिली आहे. 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar Special campaign new ration cards to 36,000 citizens