esakal | राज्यातील ६६ वर शिक्षकांचा कोरोना सेवेत मृत्यू

बोलून बातमी शोधा

techer
राज्यातील ६६ वर शिक्षकांचा कोरोना सेवेत मृत्यू
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नंदुरबार, देऊर ः राज्यातील प्राथमिक शिक्षक मार्च २०२० पासून कोविड-१९ अंतर्गत विविध सेवेत कार्यरत आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत शिक्षकांनाही ५० लाखांचे विमाकवच शासनाने लागू केले आहे. यादरम्यान कोविड सेवेत असताना ६६ शिक्षकांचा मृत्यू झाला, तर आतापर्यंत ३६५ शिक्षक कोरोना संसर्गाने बाधित झाले आहेत. मृत शिक्षकांच्या परिवाराला मात्र अद्याप विमाकवचचा लाभ मिळालेला नसून, तो त्वरित द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीतर्फे राज्य शासनाकडे करण्यात आली आहे.

हेही वाचा: संकटकाळात कोविड सेंटरच्या मदतीला धावले शिवदुर्ग प्रतिष्ठान

कोविड सेवेत कार्यरत असताना राज्यातील अनेक शिक्षकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शासनाची व जनतेची प्रामाणिकपणे सेवा करत असताना शिक्षकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. आता कोविड क्लेम न मिळाल्यामुळे त्यांचे कुटुंबीय उघड्यावर आले आहेत. शिक्षक वगळता इतर कर्मचाऱ्यांना मात्र क्लेम मिळाले आहेत हे विशेष. म्हणजे कामाच्या वेळी कामाला लावून मृत्यू झाल्यास पाठ फिरविणे, असा प्रकार शिक्षकांबाबत घडताना दिसून येत आहे. महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेने याबाबत राज्यभरातून ऑनलाइन माहिती मागविली आहे. त्यात सर्वाधिक बाधित १०१ शिक्षक नागपूर जिल्ह्यातील आहेत, तर सर्वाधिक १२ मृत्यू धुळे जिल्ह्यातील शिक्षकांचा झाला आहे. यांपैकी कोणालाच ५० लाखांचा विमा क्लेम मिळालेला नाही, असे त्यांच्या परिवारातर्फे सांगण्यात आले. तसेच याउपरही शिक्षकांची सेवा कोविडसाठी घेणे सुरूच आहे.

पुरोगामी संघटनेच्या मागण्या ः

-शिक्षकांची सेवा घेण्यापूर्वी प्रत्येक कोविड दवाखान्यात कोविडयोद्ध्याकरिता बेड राखीव असावेत.

-कोविड सेवा देताना पॉझिटिव्ह आल्यास पुनश्च कोविड ड्यूटी देण्यात येऊ नये.

-अतिगंभीर आजारग्रस्त, दिव्यांगांना अशा सेवेतून वगळावे.

-मृत शिक्षकांच्या कुटुंबीयांना त्वरित विमाकवच योजनेची रक्कम अदा करावी.

हेही वाचा: धुळ्यात तपासणी सत्र; लॉकडाउन’बाबत पोलिस कठोर

मुख्यमंत्र्यांना निवेदन

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे व आरोग्य विभाग प्रधान सचिव गिरीश व्यास यांना महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, सरचिटणीस हरीश ससनकर यांनी निवेदन देऊन मागण्यांची पूर्तता करण्याची मागणी केली. राज्य पदाधिकारी विजय भोगेकर, अलका ठाकरे, बळिराम मोरे, बालाजी पांडागळे, राज्यप्रमुख संघटक भूपेश वाघ, रुखमा पाटील, विभागीय अध्यक्ष प्रभाकर चौधरी, सचिव रवींद्र देवरे, नंदुरबार जिल्हाध्यक्ष पंकज भदाणे, सरचिटणीस रवींद्र अडगाळे, उपाध्यक्ष शांतिलाल धनगर, कोशाध्यक्ष विजय सोनार, बलदेव वसईकर, नवल माळी, देवेंद्र खरे आदी पदाधिकाऱ्यांच्या त्यावर सह्या आहेत.

मृत शिक्षकांची जिल्हानिहाय आकडेवारी

धुळे १२, नगर ३, अमरावती १, औरंगाबाद ४, बीड १, चंद्रपूर २, गडचिरोली १, गोंदिया ३, जळगाव ८, कोल्हापूर ३, नागपूर ४, नांदेड ४, नंदुरबार ५, नाशिक १, परभणी ३, पुणे ३, सोलापूर ३, ठाणे २, उस्मानाबाद १, वर्धा ३, यवतमाळ ४.

संपादन- भूषण श्रीखंडे