esakal | संकटकाळात कोविड सेंटरच्या मदतीला धावले शिवदुर्ग प्रतिष्ठान

बोलून बातमी शोधा

covide center
संकटकाळात कोविड सेंटरच्या मदतीला धावले शिवदुर्ग प्रतिष्ठान
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

साक्री : वर्षभरापासून संसर्गजन्य कोरोना विषाणूशी आरोग्य यंत्रणेसह जिल्हा प्रशासनाचा मुकाबला सुरू आहे. या यंत्रणेतही माणूसच अहोरात्र कार्यरत आहे. तेही आता काहीसे थकू लागले आहेत. अशा वेळी सरकारी यंत्रणेच्या चुका काढण्यापेक्षा त्यांच्या मदतीला जावे व रुग्णांनाही दिलासा, आधार द्यावा या उद्देशाने येथील शिवदुर्ग प्रतिष्ठानने पुढाकार घेतला. यात भाडणे येथील कोविड केअर सेंटर येथे मदत केंद्र सुरू करत त्या ठिकाणी आहे ते काम प्रतिष्ठानचे स्वयंसेवक इमानेइतबारे करत आहेत. त्यांनी प्रशासनाला समन्वयासह साथ देत बांधिलकीच्या कार्यात वाहून घेतले आहे.

हेही वाचा: धुळ्यात वाइन शॉप उघडताच उडाली झुंबड !

शिवदुर्ग प्रतिष्ठानतर्फे भाडणे कोविड केअर सेंटर येथे मदत केंद्र उभारण्यात आले आहे. तेथे रुग्णांसह नातेवाइकांना मदत व मार्गदर्शन केले जात आहे. कोविड सेंटर, तसेच स्वॅब कलेक्शन सेंटरचा परिसर स्वयंसेवकांनी स्वच्छ करून कचऱ्याची विल्हेवाट लावली आहे. या ठिकाणी येणारे ऑक्‍सिजन सिलिंडर वाहनातून उतरविणे, रिकामे सिलिंडर पुन्हा वाहनात ठेवणे, बरे झालेल्या रुग्णांना घरी पोचविण्यासाठी वाहन उपलब्ध करून देणे, रुग्णांच्या नातेवाइकांशी संपर्क साधून देणे, मृतदेह वाहनात ठेवण्यास मदत करणे, तसेच तेथे कार्यरत डॉक्टर, कर्मचाऱ्यांना काही मदत लागल्यास त्याची पूर्तता करण्याचे कार्य शिवदुर्ग प्रतिष्ठानचे सर्व स्वयंसेवक करत आहेत. दिवसभर रोटेशन पद्धतीने जबाबदारीनुसार ते काम करत आहेत.

सेवेसोबत औषधांची मदत

शिवदुर्ग प्रतिष्ठानने विविध लहान-मोठ्या कामासोबतच वैद्यकीय सेवेला हातभार लावला आहे. नाशिक येथील श्रीगुरुजी रुग्णालयात कार्यरत डॉ. मनोहर शिंदे यांनी प्रतिष्ठानच्या माध्यमातून दहा दिवस या ठिकाणी मोफत वैद्यकीय सेवा दिली. पुढेही ते नियमित भेट देणार आहेत. साक्री शहरातील डॉ. अनिल नांद्रे व आणखी काही डॉक्टरही सेवा देत आहेत. सेंटरला उपलब्ध नसलेली परंतु आवश्यक असणारी काही औषधे बाहेरून आणावी लागतात. अशी औषधे प्रतिष्ठानतर्फे ना नफा-ना तोटा तत्त्वावर रुग्णांना उपलब्ध करून दिली जात आहेत. ज्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे, त्यांना मोफत औषधे उपलब्ध करून दिली जातात. याकामी प्रतिष्ठानचे सदस्य आर्थिक भार उचलत असून, अनेक दानशूर योगदान देत आहेत. शिवदुर्ग प्रतिष्ठानच्या या उदात्त कार्यामुळे कोविड सेंटरमधील रुग्णांना तसेच नातेवाइकांना आधार मिळत आहे. शिवदुर्ग प्रतिष्ठानच्या आदर्शवत कार्याची तालुक्यात प्रशंसा होत आहे.

हेही वाचा: कोलकातामधील झपाटलेल्या ठिकाणांची आहे रहस्यमय, रंजक कथा

तरुणाईची ऊर्जा विधायक कार्यात

शिवदुर्ग प्रतिष्ठानमध्ये ५० ते ६० तरुणांचा सहभाग आहे. त्यांनी २०१८ मध्ये प्रतिष्ठानची स्थापना केली. यात डॉक्टर, इंजिनिअर, प्राध्यापक, शिक्षक, पत्रकार, फार्मासिस्ट, ठेकेदार आदी विविध क्षेत्रांतील होतकरूंचा समावेश आहे. गड-किल्ल्यांवर ट्रेकिंग व विविध स्पर्धा, रक्तदान, ज्वलंत विषयांवर प्रबोधन, जागृती आदी उपक्रम राबविताना त्यांनी कोरोनाच्या संकटकाळात आपली ऊर्जा विधायक कार्यात सत्कारणी लावली आहे. त्यांची सकारात्मक भूमिका इतर तरुणांसाठी अनुकरणीय, प्रेरणादायी ठरत आहे.

संपादन- भूषण श्रीखंडे