‘एसटी’चे मालवाहतूक क्षेत्रात पदार्पण! 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 27 May 2020

महामंडळ मालवाहतुकीच्या क्षेत्रात प्रथमच प्रवेश करीत असल्याने दर निश्चित करीत असताना बाजारामध्ये प्रचलित असलेल्या दरानुसार मालवाहतुकीच्या दरांची निश्चिती होणार आहे.

नंदुरबार : ‘लॉकडाउन’मुळे प्रवासी वाहतूक सेवा बंद असल्याने होणारे मोठे आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने आता मालवाहतूक क्षेतात पर्दापण केले आहे. याअनुषंगाने धुळे विभागातून पहिला मालवाहतुकीचा ट्रक रवाना केल्याची माहिती विभाग नियंत्रक मनीषा सपकाळ यांनी दिली. 

‘लॉकडाउन’मुळे राज्यात मालवाहतुकीवर मोठा परिणाम जाणवत असताना तातडीची उपाययोजना म्हणून राज्य शासनाने महामंडळात एका अधिसूचनेद्वारे मालवाहतुकीचे अधिकार प्रदान केले आहेत. यापूर्वी महामंडळाकडे प्रवासी वाहतुकीचा अधिकार असल्याने त्या अनुभवाच्या अनुषंगाने मालवाहतुकीचे नियोजन करण्याबाबत महामंडळाकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. 

सद्यःस्थितीत महामंडळाकडे २७८ ट्रक असून, त्यांनी १५३ ट्रक बंदिस्त स्वरूपाचे आहेत. महामंडळाकडे १७ हजार बस ताफ्यात असून, त्यातील जवळजवळ तीन हजार बस बंदिस्त ट्रकमध्ये परावर्तित केल्या जाणार आहेत. धुळे विभागाकडे सद्यःस्थितीत आठ बंदिस्त ट्रक आहेत. याद्वारे धुळे, नंदुरबार जिल्ह्यांतून मालवाहतुकीचे नियोजन होणार असल्याची माहिती देण्यात आली. 

महामंडळ मालवाहतुकीच्या क्षेत्रात प्रथमच प्रवेश करीत असल्याने दर निश्चित करीत असताना बाजारामध्ये प्रचलित असलेल्या दरानुसार मालवाहतुकीच्या दरांची निश्चिती होणार आहे. परावर्तित करण्यात येणाऱ्या ट्रकची वाहतूक क्षमता एक मेट्रिक टनइतकी करण्यात येणार आहे. मालवाहतुकीची सेवा राज्यभरात २५० आगार व ६०० बसस्थानकांमार्फत उपलब्ध राहील. 

आगारात संपर्क साधावा 
या वाहतुकीबाबत अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या आगारात संपर्क साधल्यास आवश्यक ती माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे. शेतकरी, व्यापारी, लघु व मोठे कारखानदार यांनी सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन विभाग नियंत्रकांनी दिलेल्या प्रसिद्धिपत्रकात केले आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar ST's debut in the freight sector