esakal | आमचे सर असे नाहीत...! 
sakal

बोलून बातमी शोधा

आमचे सर असे नाहीत...! 

आमचे सर असे नाहीत...! 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नंदुरबार : ‘‘आम्ही पाचवीपासून शिकत आहोत, आमचे सर तसे कधीच वागले नाहीत. मात्र, ते शिकवीत असताना ब्रिगेडचे चार गुंड थेट वर्गात आले आणि त्यांनी आमचे प्रिय सर जे. डी. पाटील यांच्यासह चौघा शिक्षकांना बदडून काढले. ते आज ‘आयसीयू’मध्ये आहेत. खतरनाक दृश्‍य होते ते... मारहाण करणाऱ्या गुंडांचे आम्ही फोटो काढले आहेत. आम्हाला आणि आमच्या शिक्षकांना न्याय द्या...’’ असा आर्त टाहो फोडत पथराई (ता. नंदुरबार) येथील आवडाबाई शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ संचलित माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी या गुंडगिरीला वाचा फोडली आहे. 
हा प्रकार नेमका कुणाच्या ‘आशीर्वादा’ने झाला, याची चर्चा परिसरात रंगली असून, संस्थाचालकांकडे अंगुलीनिर्देश केला जात आहे. विशेष म्हणजे, आपल्या संस्थेत घडलेल्या या प्रकाराबाबत संस्थाचालकाने अजूनही पोलिस ठाण्यात रीतसर तक्रार दिलेली नाही. शिक्षण विभाग आणि जिल्हा प्रशासनानेही या गंभीर प्रकाराची दखल घेतलेली नाही. हे प्रकरणच दडपण्याचा प्रयत्न होत आहे. 

हेपण पहा - गाढ झोपेत होती ती...अन्‌ असे घडले, की ती झोपेमध्येच गेली 


पथराई येथील माध्यमिक विद्यालयात बुधवारी (ता. १९) दुपारी चारला वर्ग सुरू असताना चार गुंडांनी थेट प्रवेश केला. तुम्ही आदिवासी मुलींची छेडछाड करता, त्यांना अश्‍लील व्हिडिओ दाखवितात, अशी आमच्याकडे तक्रार आली आहे, असे सांगत त्यांनी शिक्षक जे. डी. पाटील यांना थेट झोडपायला सुरवात केली. सर असे नाहीत, याची जाण असलेले विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी असे काहीच नाही, असे सांगण्याचा प्रयत्नही केला. मात्र, गुंडांनी त्यांना दम दिला. यादरम्यान काही विद्यार्थिनींनी मारहाण करणाऱ्यांची छायाचित्रेही काढून घेतली. जे. डी. पाटील यांना मारहाण होत असल्याचे पाहून आलेले आर. एस. पाटील, टी. एस. पाटील आणि श्री. साळुंखे अशा चारही शिक्षकांना बेदम मारहाण करण्यात आली. हे दृश्‍य पाहून भेदरलेल्या विद्यार्थ्यांनी पालकांना कळविले. श्री. पाटील हे शिक्षक सध्या नंदुरबारमध्ये उपचार घेत आहेत. 
या साऱ्या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांनी गावात पायी फिरून मोर्चा काढला. सर्व ग्रामस्थांना आवाहन करीत, ‘आम्हाला न्याय द्या, आमच्या शिक्षकांना न्याय द्या...’ अशी प्रत्येकाला विनवणी करीत हा मोर्चा शाळेवर आला. तेथे विद्यार्थी जमले व त्यांनी पुन्हा घटनेचा जोरदार निषेध केला. 
 
आमचे सर असे नाहीत...! 
ब्रिगेडचे चार गुंड मारहाण करीत होते, खूप खतरनाक दृश्‍य होते ते. आमचे जे. डी. पाटील आणि सर्वच सर, असे कधीच वागले नाहीत. आम्ही पाचवीपासून इथे शिकत आहोत. उलट आम्हाला ते अतिशय मनापासून शिकवितात. आमच्या गुरूंना मारहाण करणाऱ्यांना अटक झालीच पाहिजे. त्यांच्यावर असे घाणेरडे आरोप करणाऱ्यांना अद्दल घडविलीच पाहिजे, अशी प्रतिक्रिया नववीतील विद्यार्थिनीने मोर्चानंतर बोलताना दिली. तिची ही बोलकी प्रतिक्रिया ही ठरवून दिलेली किंवा मॅनेज केलेली नाही. सांगताना ती ठसाठसा रडत होती. साऱ्याच विद्यार्थ्यांना हुंदका आवरत नव्हता. 
 
साऱ्यांनीच मौन व्रत घेतले 
मारहाणीच्या घटनेनंतर संस्थाचालकांनी खरेतर स्वतःहून पोलिस ठाण्यात जात या प्रकरणाची तक्रार करायला हवी होती. मात्र, ते या घटनेची वाच्यता होऊ नये म्हणून प्रयत्न करीत होते. यामुळे संशयाची सुई त्यांच्याकडेच जाते, अशी चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे, शिक्षण विभागाने या शाळेला भेट देत नेमका प्रकार जाणून घ्यायला हवा होता. तसेही झालेले नाही. राज्यपालांच्या दौऱ्यात असल्याने कुणीही या विद्यार्थ्यांच्या मागणीकडे गांभीर्याने पाहिलेले नाही. आता जिल्हाधिकारी तरी या प्रकरणात लक्ष घालतील, अशी आशा या विद्यार्थ्यांना लागून आहे. शिक्षण क्षेत्रातील काळिमा फासणाऱ्या या घटनेने शिक्षक समूह हवालदिल झाला आहे.