
केवळ अकरा महिन्यांसाठी होत असलेल्या विधान परिषदेच्या धुळे- नंदुरबारच्या जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीत भाजपतर्फे माजी आमदार अमरिशभाई पटेल, तर महाविकास आघाडीतर्फे जिल्हा परिषदेचे सदस्य अभिजित पाटील हे नशीब आजमावत आहेत. दोन्ही उमेदवारांतर्फे प्रचाराची मोहीम राबविली आहे.
शहादा (नंदुरबार) : विधान परिषदेच्या मतदानाला अवघे दोन दिवस शिल्लक आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडी व भाजपच्या उमेदवारांमध्ये सरळ लढत होत असली, तरी निवडून येण्यासाठी दोन्ही उमेदवारांकडून प्रयत्नांची पराकाष्ठा होत आहे. कोण निवडून येईल, हे सांगणे कठीण असले तरी साम-दाम-दंड-भेद या सर्व नीतीच्या अवलंब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर पक्षनिष्ठा की व्यक्तिनिष्ठ यावरच उमेदवाराच्या विजयाचे गणित अवलंबून आहे.
केवळ अकरा महिन्यांसाठी होत असलेल्या विधान परिषदेच्या धुळे- नंदुरबारच्या जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीत भाजपतर्फे माजी आमदार अमरिशभाई पटेल, तर महाविकास आघाडीतर्फे जिल्हा परिषदेचे सदस्य अभिजित पाटील हे नशीब आजमावत आहेत. दोन्ही उमेदवारांतर्फे प्रचाराची मोहीम राबविली आहे. मतदारांच्या बैठका घेण्यावर जोर आहे. अमरिशभाई पटेल हे मातब्बर असले तरी अभिजित पाटलांकडे महाविकास आघाडीचे बळ आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकीचे बळ दाखविल्यास महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित पाटील यांचा विजय निश्चित आहे. सध्यातरी सर्वच महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या सूर अभिजित पाटलांना विजयी करा, असा आहे. हा सूर शेवटपर्यंत टिकणे महत्त्वाचे आहे. भाजपतर्फे संकटमोचक म्हणवले जाणारे गिरीश महाजन यांनी या निवडणुकीत पुढाकार घेतला आहे. नुकतेच त्यांनी धुळ्यात मतदारांची बैठकही घेतली असल्याचे बोलले जात आहे.
सर्व काही वरिष्ठ नेत्यांवर...
दरम्यान सर्व पक्षातील वरिष्ठ नेते आपापल्या पक्षाच्या उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन बैठकांमध्ये करत आहेत. परंतु शेवटच्या दिवशी व्यक्तिनिष्ठ की पक्षनिष्ठा या धोरणावर आज विजयाचे गणित अवलंबून आहे. आपापल्या जिल्ह्यातील पक्षाचे वरिष्ठ नेते जो आदेश देतील तो मतदारांना पाळणे प्रमाण आहे. विशेष म्हणजे, या निवडणुकीत मतदारसंख्या चांगलीच निर्माण होणार, हे निश्चित.
नंदुरबारला बैठक
महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित पाटील यांच्या प्रचारार्थ नंदुरबार येथे महाविकास आघाडीतील नेत्यांची व मतदारांची बैठक झाली. बैठकीला पालकमंत्री के. सी. पाडवी, काँग्रेसचे पक्ष निरीक्षक कल्याणराव काळे, आमदार चंद्रकांत रघुवंशी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ॲड. सीमा वळवी, माजी मंत्री पद्माकर वळवी, माजी आमदार उदेसिंग पाडवी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप नाईक, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विक्रांत मोरे आदींसह महाविकास आघाडीतील सर्वच नेते, मतदार उपस्थित होते. या वेळी सर्वच नेत्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन केले.
संपादन ः राजेश सोनवणे