गुंजाळीचा तरूणाने फुलविली पडीक जागेत परसबाग 

parasbag nandurbar
parasbag nandurbar

तळोदा : घराभोवतीच्या मोकळ्या जागेत पंधरा प्रकारच्या भाज्या व फळ पिके तेही सेंद्रीय पद्धतीचा अवलंब करून गुंजाळी (ता.तळोदा) येथील तरुणाने परसबाग फुलवली आहे. या परसबागेत विविध प्रकारची १५ उपयोगी झाडे,पाच ते सहा प्रकारचे फुलझाडेही आहेत. त्या तरूणाची प्रेरणा घेत गावातील अनेकांनी तशा परसबागा फुलविण्याची धडपड सुरू केली आहे. दैनंदिन लागणाऱ्या भाज्या घरासाठी उपलब्ध होत आहेत. मात्र त्यातून काही विक्री करून आर्थिक पाठबळही मिळू लागले आहे. हा तरूणांचा प्रयोग परिसरात प्रेरणादायी ठरणारा आहे. 


बोरद रस्त्यावर गुंजाळी हे छोटेसे गाव आहे. तेथे नारायण सजन ठाकरे यांचे गावालगत घर आहे. त्यांचा मुलगा अनिल ठाकरे यांनी आपल्या घराभोवतीच्या पडीक जागेचा अत्यंत बहुमोल उपयोग केला आहे. त्या जागेवर मिरची , कांदे , लसूण , मेथी , वांगी , टमाटे , मुळा , कारले , फ्लॉवर , गिलके , भेंडी , वालपापडी ,कोथिंबीर, यांची लागवड करून आदर्श परसबाग फुलविली आहे. 

सेंद्रिय पद्धतीचा अवलंब 
परसबागेत भाज्यांना कोणत्याही रासायनिक खतांच्या डोस व फवारणी न करता सेंद्रिय पद्धतीने आंतरपीक पद्धतीने पेरणी करण्याचा प्रयोग केला आहे. सध्या बाजारपेठेत रासायनिक खतांची मात्रा भरमसाठ दिलेला भाजीपाला विक्रीसाठी येतो. मात्र या परसबागेत सेंद्रिय शेतीसारखे प्रयोग करून भाजीपाला लागवड केली आहे. परसबागेच्या हा प्रयोग पाहण्यासाठी अनेकजण येथे भेट देण्यासाठी येत आहेत. 

फळे,फुल झाडांची लागवड 
केवळ भाजीपाला न लावता परसबागेत फळझाडे देखील लावण्यात आली आहेत. ज्यात पेरू , आंबा , चिकू , लिंबू , सीताफळ, शेवगा ,जांभूळ ,बोर यांच्या समावेश आहे.औषधी वनस्पती म्हणून गवती चहा ,कोरफड हे देखील लावण्यात आले आहे. तर शेवंती , झेंडू , गुलाब , सदाफुली , कण्हेर या फुलझाडांचीही येथे लागवड नजरेत भरते. या परसबागेत कुटुंबातील सर्व सदस्य आवडीने काम करतात.कुटुंबाला लागणारा भाजीपाला घरीच उपलब्ध होत आहे. कमी जागेत जास्त भाज्या लावण्याचा प्रयोग केला असल्याने जास्त भाज्या व पिके घेऊ शकत असल्याचे रविता ठाकरे यांनी सांगितले. 

परसबागेतून आर्थिक मदत 
केवळ कुटुंबाला लागणारा भाजीपालाच येथे मिळत नाही तर तयार होणारा भाजीपाला शेजारील कढेल , उमरी , मोहिदा , मोरवड ,चौगाव ,मोड या गावांना देखील ते विक्री करतात. त्यामुळे या परसबागेतून रोजगार निर्मिती देखील होत आहे. 

अनेकांसाठी प्रेरणादायी 
या परसबागेला पाहून गुंजाळी गावातील अनेक जणांनी आपल्या घराच्या आजूबाजूला असणाऱ्या जागेत परसबाग फुलविण्यास सुरुवात केली आहे. त्यामूळे परसबाग फुलविण्याची जणू आता स्पर्धा गावात लागली आहे. तीस चाळीस वर्षांपूर्वी नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक गावांत अशा परसबागा घरोघरी असत. त्या परसबाग संस्कृतीची आठवण यामुळे अनेकांना आली आहे. ह्या परसबागा आरोग्यदायी जीवनशैलीसाठी आवश्यक असल्याने त्यांची वाढच होण्याची गरज आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com