सभापतिपदासाठी एक-एक वर्षाचा फार्मुला 

nandurbar zp
nandurbar zp

नंदुरबार : जिल्हा परिषदेचा अध्यक्ष,उपाध्यक्ष निवडीचा चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. मात्र आता सर्वाना वेध लागले आहे ते विविध विषय समिती सभापती निवडीचे. २७ जानेवारीस सभापतींची निवड होणार आहे. त्यामुळे सभापती पदाची संधी कुणाला व कोणते खाते मिळेल याबाबतच्या चर्चाना उत आले आहे. सर्वाना न्याय देण्यासाठी एक -एक वर्षाचा फार्मुला वापरला जाण्याची शक्यता आहे. 

कधी नव्हे एवढी लक्षवेधी व चुरशीची निवडणूक जिल्हा परिषदेची ठरली आहे. भाजपला वाटत होते शिवसेना आमच्या सोबत येईल, सत्ता आमची स्थापन होईल असा दावा करत होती. तर तसाच दावा कॉंग्रेसचे नेते करत होते. शिवसेना त्यात मात्र किंगमेकर होते. त्यामुळे शिवसेना कुणासोबत जाणार या भूमिकेकडे साऱ्यांचेच लक्ष लागले होते. मात्र शिवसेनेची नेमकी चर्चा कुणासोबत सुरू होती. हे शेवटच्या क्षणापर्यंत गुलदस्त्यात ठेवण्यात आले. एकीकडे शिवसेनेचे नेते चंद्रकांत रघुवंशी यांचे कॉंग्रेसशी जुने संबंध व त्यांच्या नेत्यांशी असलेली जवळीक यामुळे ते कॉंग्रेसकडे जातील असा अंदाज बांधला जात होता. तर निवडणुकीपूर्वी माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्याशी असलेला सलोखा व निवडणुकीतील वाटाघाटीच्या बातम्यांमुळे ते डॉ. गावित यांच्यासोबत जातील. म्हणजेच भाजपची सत्ता स्थापन होईल असे चित्र निर्माण झाले होते. मात्र राज्यात असलेली आघाडीची सत्तेचा विचार करता शिवसेना भाजपला समर्थन देणार नाही हेही तेवढेच चित्र स्पष्ट होते. मात्र स्थानिक नेत्यांमधील बेबनावामुळे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी काहीही निर्णय घेऊ शकतात असे वाटत होते. मात्र शेवटच्या क्षणापर्यंत उत्सुकता निर्माण करत अखेर शिवसेनेने कॉंग्रेसला साथ देत अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची वाटाघाटी करून सत्ता स्थापन केली. त्यामुळे अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडीबाबत सुरू असलेल्या नाट्यावर अखेर परदा पडला. 


सभापतिपदी कोणाची वर्णी ? 
कॉंग्रेस- शिवसेनेच्या वाटाघाटीत सभापतिपदाबाबत चर्चा झाली नसल्याचे शिवसेनेचे नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी स्पष्ट केले आहे. मात्र त्यांनाही सभापतिपद हवे आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषदेचे सभापती पद कुणाला व किती मिळतील या निर्णयाकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे. अद्याप तरी सभापती निवडीच्या विषयावर दोन्ही गटाकडून मौन पाळण्यात आले आहे. मात्र सभापती निवडीसाठीही दोन्ही पक्षातील नेत्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. हे निश्‍चित आहे. 

नाराजी नाट्य रंगणार 
सभापती निवड २७ जानेवारीस दुपारी विशेष सभा होणार आहे. शक्यतोवर सभापतिपदाची निवड बिनविरोध होणे अपेक्षित आहे. मात्र जर इच्छुकांमध्ये समझोता झाला नाही तर निवडणूक होऊ शकते. मात्र सभापतिपदासाठी मोठ्या प्रमाणात इच्छुकांचा नावांची यादी पुढे येत आहे. त्यामुळे कुणाची वर्णी लागेल याबाबत उत्सुकता वाढली आहे. ज्यांची निवड होईल ते भाग्यवान अन्यथा ज्याची निवड होणार नाही ते नाराज असे नाट्य रंगणार आहे. 

इच्छुकांची भाऊगर्दी 
इच्छुकांमध्ये कॉंग्रेसतर्फे कात्री गटाचे सदस्य रतन पाडवी, मोलगीचे सी.के.पाडवी, म्हसावद गटाचे अभिजित पाटील, आष्टे गटातील देवमन पवार, बुधावल गटातील सुहास 
नाईक, नवापूरमधून अजित नाईक यांची मुख्य नावे पुढे आहेत. त्याव्यतिरिक्त अनेक सदस्य इच्छुक आहेत. तर शिवसेनेला अक दोन सभापती मिळू शकतात. त्यात शंकूतला शिंत्रे, विजय पराडके, गणेश पराडके, किरसिंग पाडवी, शंकर पाडवी यांची नावे चर्चेत आहेत. त्यात एक वर्षाचा फार्मुला वापरून सर्वाना न्याय देण्याचा प्रयत्न होऊ शकतो. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com