ॲप्लिकेशनद्वारे मनपाकडे पाच दिवसांत बावीसशे तक्रारी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 मार्च 2018

नाशिक - महापालिकेच्या कामकाजाला शिस्त लावण्याबरोबरच नागरिकांच्या तक्रारींचा तत्काळ निपटारा करण्याच्या उद्देशाने विकसित करण्यात आलेले एनएमसी ई-कनेक्‍ट ॲप्लिकेशनसह टपालाद्वारे प्रशासनासमोर तक्रारींचा पाऊस पडला आहे. पाच दिवसांत तब्बल दोन हजार २६० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तक्रारींचा ओघ बघता त्यांचे निराकरण करण्याची मोठी कसरत महापालिकेच्या ४७ विभागांना करावी लागणार आहे.

नाशिक - महापालिकेच्या कामकाजाला शिस्त लावण्याबरोबरच नागरिकांच्या तक्रारींचा तत्काळ निपटारा करण्याच्या उद्देशाने विकसित करण्यात आलेले एनएमसी ई-कनेक्‍ट ॲप्लिकेशनसह टपालाद्वारे प्रशासनासमोर तक्रारींचा पाऊस पडला आहे. पाच दिवसांत तब्बल दोन हजार २६० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तक्रारींचा ओघ बघता त्यांचे निराकरण करण्याची मोठी कसरत महापालिकेच्या ४७ विभागांना करावी लागणार आहे.

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागरिकांना तत्पर सेवा देण्यासाठी विविध उपक्रम राबविले आहेत. त्यात एनएमसी ई-कनेक्‍ट ॲप्लिकेशन विकसित केले असून, त्यावर तक्रार दाखल झाल्यानंतर चोवीस तासांच्या आत विभागप्रमुखांना तक्रार पाहणे बंधनकारक आहे. दखल न घेतल्यास स्वयंचलित पद्धतीने कारणे दाखवा नोटीस पोचत असल्याने त्याचा धसका अधिकाऱ्यांनी घेतला आहे. ५ ते ९ मार्चदरम्यान आलेल्या तक्रारींचा गोषवारा १२ मार्चला आयुक्त तपासणार असल्याने विविध विभागप्रमुख कामाला लागले आहेत. महापालिकेकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार दोन हजार २६० तक्रारी आल्या आहेत. त्यात सर्वाधिक तक्रारी नगररचना विभागाशी संबंधित आहेत. नगररचना विभागाकडे २३७ तक्रारी दाखल झाल्या, त्यात अनधिकृत बांधकामांबाबत तक्रारींचा समावेश आहे. त्यानंतर पश्‍चिम विभागीय कार्यालयाकडे २३० तक्रारी आल्या आहेत. सहा विभागांपैकी सर्वांत छोटा विभाग असतानाही अधिक तक्रारी आल्याने ही विशेष बाब ठरली आहे. त्याखालोखाल वैद्यकीय विभाग १९३, अतिक्रमण निर्मूलन विभाग १३६, लेखा विभाग ११४, सार्वजनिक बांधकाम विभाग १०१ याप्रमाणे तक्रारींचा ओघ आहे.

खातेनिहाय तक्रारी ः
अतिरिक्त आयुक्त १- २२, अतिरिक्त आयुक्त २- ८४, मूल्यनिर्धारण कर संकलन विभाग- ५३, स्थानिक संस्था कर विभाग- ४७, विविध करवसुली विभाग- ९४, नगरसचिव- ४३, जनसंपर्क- २६, लेखापरीक्षण- ४७, मलनिस्सारण- ५७, पाणीपुरवठा व यांत्रिकी- ३४, मोटार दुरुस्ती- २०, खत प्रकल्प- ११, विद्युत विभाग- ५७, उद्यान- ५६, गुणनियंत्रण- ८९, मिळकत- ८३, विधी- ६४, गोदावरी संवर्धन कक्ष- १७, अग्निशमन- २२, माहिती व तंत्रज्ञान- ३६, सुरक्षा- ३१, राष्ट्रीय नागरी उपजीविका- १४, हॉकर्स- ३६, झोपडपट्टी सुधारणा- २९, कामगार कल्याण- १०, क्रीडा- १२, मध्यवर्ती भांडार- १९, छपाई व वितरण- ७०, महिला व बालकल्याण- १४, निवडणूक विभाग- १०.

Web Title: marathi news nashik municipal corporation Twenty-two complaints to the Municipal Corporation in five days