नामपुरात खुनाच्या घटनेनंतर संतप्त नागरिकांचा रास्तारोको

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जानेवारी 2018

नामपूर : येथील शिवमनगर परिसरातील जनावरे खरेदी-विक्री करणाऱ्या व्यावसायिकाच्या खुनानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी नामपूर मालेगाव रस्त्यालगत ग्रामीण रुग्णालयासमोर रास्ता रोको, टायरांची जाळपोळ करुन संताप व्यक्त केला.

नामपूर : येथील शिवमनगर परिसरातील जनावरे खरेदी-विक्री करणाऱ्या व्यावसायिकाच्या खुनानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी नामपूर मालेगाव रस्त्यालगत ग्रामीण रुग्णालयासमोर रास्ता रोको, टायरांची जाळपोळ करुन संताप व्यक्त केला.

मालेगावचे अप्पर पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या समजुतीनंतर संतप्त जमावाने आंदोलनाचा निर्णय मागे घेतला. याप्रकरणी द्याने ( ता बागलाण ) येथील तीन संशयित आरोपींवर जायखेडा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेना पदाधिकारी आणि नामपूर बाजार समितीचे मुख्य प्रशासक भाऊसाहेब कापडनीस यांना पहाटेच्या सुमारास अटक करण्यात आली असून, अन्य दोघांच्या शोधासाठी सात पोलिसांची पथके जिल्ह्यात रवाना झाली आहेत.

येथील शिवमनगर भागात राहणाऱ्या मयत वारिस मुख्तार शेख ( वय ३० ) यास द्याने येथील काही तरुण काल ( ता. २४ ) रात्रीच्या सुमारास कामाचा बहाना करुन घेऊन गेले. त्यानंतर त्याला लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण करीत त्याचा खून करुन त्याचा मृतदेह नामपूर ताहराबाद रस्त्यालगतच्या द्याने येथील टेकडीजवळ फेकून दिला. मयत वारिस यांचा भाऊ आरिफ शेख यांनी जायखेडा पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर तातडीने पोलिस घटनास्थळी दाखल झाले. नाशिक येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळा पथकाने घटनास्थळाची पाहणी करुन आपला अहवाल वरिष्ठांना सुपूर्द केला. घटनेनंतर पोलिसांनी तातडीने मयत वारिसला येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याच निधन झाले. सकाळी वारिसच्या खुनाची बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर येथील ग्रामीण रुग्णालय परिसरात मोठ्या संख्यने नागरिक जमा झाले. खुनाच्या निषेधार्थ युवकांनी अचानक रास्तारोको आंदोलन केले. रस्त्यांवर टायर्स जाळण्यात आल्याने शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 

शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यांसाठी राज्य राखीव दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आली. मालेगावचे अप्पर पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता दोषींवर कठोर करवाई करण्याचे आश्वासन दिल्याने तणाव निवळला.

मयत वारिस याच्या मागे आई, वडील, भाऊ, पत्नी, तीन मुले असा परिवार आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी शशिकांत शिंदे, जायखेड्याचे पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस तपास सुरु आहे.

Web Title: Marathi news nashik news after murder peoples start Rasta Roko