पांढरे सोने घरात साठवणुकीचा जुगार भोवला २५ कोटीला

संतोष विंचू
सोमवार, 5 मार्च 2018

तेलही गेले अन तूपही..
शेतात दिवाळीपासून वेचून ठेवलेला कापूस फेब्रुवारी व मार्च मध्ये विक्री होत आहे.म्हणजेच तीन ते चार महिने कापूस घरात साठवलेला असल्याने त्याची सरकी सुकून वजनात घट झाल्याचा वाईट अनुभव दरवाढीच्या प्रतीक्षेत आला आहे.वेचून साधारणतः ३०-३१ क़्विटल कापूस साठवला तो आता विक्री करतांना २६-२७ क़्विटल वजन भरले आहे.म्हणजे तेलही गेले अन तूपही..अशी अवस्था अनेकांची झाली आहे.  

येवला  : यंदा शेतात पांढरे सोने चांगलेच पिकले मात्र ते विकण्याची संधी शेतकऱ्यांना साधता आली नसल्याने सुमारे पंचवीस कोटी रुपयांचा चुना तालुक्याला लागला आहे.कापसाच्या भावात क्विंटलला सहा हजारांपर्यंत दरवाढ होईल या अपेक्षेने जवळपास ९० टक्के शेतकऱ्यांनी घरात कापूस साठवला मात्र अपेक्षित दरवाढ झाली नाहीच उलट मध्यंतरी ५ हजार ५०० रुपयांपर्यत वाढलेल्या दराने कापूस विक्री न केल्याने अखेर पाच हजार ते पाच हजार २००  रुपयांनी हा कापूस विकण्याची वेळ येत आहे. यामुळे साठवणुकीचा जुगार शेतकर्यांच्या अंगलट आला आहे.

मागील दोन वर्षांत पांढर्या सोन्याला सहा हजाराच्या आसपास भाव मिळाला. मागील वर्षीही पाच हजार ८०० रुपयांचा दर मिळाल्याने यंदाही तालुक्यात सुमारे पंचेचाळीस हजार एकरांवर कापसाची लागवड झाली होती. विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी आता बागायती क्षेत्रात देखील कापसाचे पीक फुलवणे सुरू केले आहे. याचमुळे एकरी सात ते आठ क्विंटलपर्यंत उत्पन्न अवर्षणप्रवण उत्तरपूर्व भागातही निघाले आहे.या हिशोबाने तालुक्यात सुमारे ३ लाख ६० हजार  क्विंटलच्या आसपास कापूस निघाला आहे. याला क्विंटलला पाच हजार ८०० रुपयांच्या दरानुसार शेतकऱ्यांना २०८ कोटी रुपये मिळणे अपेक्षित होते मात्र सरासरी भाव पाच हजाराचा मिळाल्याने सुमारे १८० कोटी रुपये शेतकऱ्यांच्या हातात आल्याने २५ कोटीहून अधिक नुकसान भाववाढीच्या प्रतीक्षेत झाले आहे.

सुरुवातीला पाच हजाराच्या आसपास प्रती क्विंटलने कापूस खरेदी सुरू झाली होती. मात्र काही पंडितांनी पाश्चिमात्य देशात कापसाचा तुटवडा असल्याने मागणी वाढून निर्यात वाढेल,परिणामी भाव पुन्हा सहा हजारांपर्यंत जातील असे भविष्य वर्तवले होते. यामुळे जवळपास सर्वच शेतकऱ्यांनी घरात सुमारे तीन ते चार महिने कापूस साठवून ठेवला.

याच दरम्यान कापसाचे भाव पाच हजार ४०० ते ५०० रुपयांपर्यंतही दहा-बारा दिवस गेले होते. मात्र अजून भाव वाढतील व सहा हजार होतील म्हणून साठवलेला कापूस शेतकर्यांनी विकलाच नाही पण हा जुगार अंगलट आला. भाव कमी होहून पाच हजार १०० ते ३०० रुपयांपर्यंत पडल्याने शेतकऱ्यांनी आता अधिक नुकसान नको म्हणत पाच हजार ते पाच हजार २०० रुपयांच्या दरम्यान भावाने कापसाची विक्री करून टाकली आहे. आता तर यात अजूनच घट होऊन चार हजार ८०० ते ९०० रुपये दराने कापसाची खरेदी सुरू आहे.या घटणाऱ्या दरामुळे शेतकऱ्यांचा मात्र मोठा हिरमोड होऊन आर्थिक नुकसान देखील झाले आहे.

तेलही गेले अन तूपही..
शेतात दिवाळीपासून वेचून ठेवलेला कापूस फेब्रुवारी व मार्च मध्ये विक्री होत आहे.म्हणजेच तीन ते चार महिने कापूस घरात साठवलेला असल्याने त्याची सरकी सुकून वजनात घट झाल्याचा वाईट अनुभव दरवाढीच्या प्रतीक्षेत आला आहे.वेचून साधारणतः ३०-३१ क़्विटल कापूस साठवला तो आता विक्री करतांना २६-२७ क़्विटल वजन भरले आहे.म्हणजे तेलही गेले अन तूपही..अशी अवस्था अनेकांची झाली आहे.  

Web Title: Marathi news Nashik news cotton price