चौगावच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानभरपाई मिळावी

रोशन खैरनार
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

सटाणा : चौगाव (ता.बागलाण) येथे विद्युतवाहक तारांमध्ये घर्षण झाल्याने शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीत भस्मसात झालेल्या डाळिंब बागेची बागलाणचे माजी आमदार संजय चव्हाण यांनी आज (ता.२८) पाहणी केली. यावेळी श्री.चव्हाण यांनी वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता एम.जे.घरटे व उपकार्यकारी अभियंता ए.आर.अहिरे यांना या घटनेचा तातडीने अहवाल तयार करून नुकसानग्रस्त शेतकरी लताबाई शेवाळे व भास्कर शेवाळे यांना नुकसानभरपाई मिळवून देण्याच्या सूचना दिल्या.  

सटाणा : चौगाव (ता.बागलाण) येथे विद्युतवाहक तारांमध्ये घर्षण झाल्याने शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीत भस्मसात झालेल्या डाळिंब बागेची बागलाणचे माजी आमदार संजय चव्हाण यांनी आज (ता.२८) पाहणी केली. यावेळी श्री.चव्हाण यांनी वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता एम.जे.घरटे व उपकार्यकारी अभियंता ए.आर.अहिरे यांना या घटनेचा तातडीने अहवाल तयार करून नुकसानग्रस्त शेतकरी लताबाई शेवाळे व भास्कर शेवाळे यांना नुकसानभरपाई मिळवून देण्याच्या सूचना दिल्या.  

चौगाव येथील भीमदरा शिवारात बंद्या डोंगरालगत सोमवारी (ता.२६) माजी सरपंच लताबाई शेवाळे व त्यांचे दीर भास्कर शेवाळे यांच्या ३ एकर डाळिंब बागेस विद्युतवाहक तारांमध्ये घर्षण झाल्याने शॉर्टसर्किट होऊन भीषण आग लागली होती. डाळिंब बागेतील सर्व १६०० झाडे या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने शेवाळे कुटुंबियांचे आठ ते दहा लाख रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे. पतीचे निधन झाले असताना लताबाईंनी आपले सोने गहाण ठेऊन बँकेकडून सात लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. या पैशांवर त्यांनी शेतात विहिरीचे खोदकाम करून डाळिंब बाग उभारली होती.

अत्यल्प पाऊस व खडकाळ जमिनीमुळे डाळिंबास पाणी देणे अवघड होते, यावर मात करण्यासाठी त्यांनी वेळप्रसंगी व्याजाने पैसे उचलले व टँकरने पाणी विकत घेऊन डाळिंब बाग जगविली. दीड वर्षांनंतर आज बहार धरण्याची वेळ आली असताना त्यांच्या शेतातून जाणाऱ्या वीज वितरण कंपनीच्या विद्युतवाहक तारांमधील घर्षणामुळे बागेत ठिणग्या पडल्या आणि क्षणार्धात संपूर्ण बाग आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत निसर्गाची दोन हात करून डाळिंब बाग फुलविणाऱ्या शेवाळे कुटुंबियांचे या आगीत होत्याचे नव्हते झाल्याने शासनाने त्यांना तात्काळ नुकसानभरपाई देऊन मदत करावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली होती. 

आज सकाळी बागलाणचे माजी आमदार संजय चव्हाण, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी, बाजार समितीचे माजी संचालक अनिल चव्हाण, बागलाण विकास मंचचे नंदकिशोर शेवाळे, विजय शेवाळे आदींसह वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता एम.जे.घरटे व उपकार्यकारी अभियंता ए.आर.अहिरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली. वीज तारांमध्ये वारंवार घर्षण होऊन बागलाण तालुक्यातील शेतांमध्ये आग लागण्याचे प्रकार सध्या वाढले असून त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. अशा अप्रिय घटना पुन्हा घडू नयेत याकरिता वीज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विद्युत तारांमधील हा झोळ त्वरित दुरुस्त करावा आणि विद्युत तारा पूर्ववत कराव्यात, अशा सूचनाही माजी आमदार श्री.चव्हाण यांनी यावेळी श्री.घरटे व श्री.अहिरे यांना दिल्या. 

बागलाण तालुक्यात विद्युत तारांमध्ये घर्षण होऊन शेतात आग लागण्याचे अनेक प्रकार यापूर्वी घडले आहेत. आधीच कर्जबाजारी असलेला सर्वसामान्य शेतकरी या प्रकारामुळे उध्वस्त होत असताना त्याला तातडीने मदतीचा हात देणे गरजेचे असते. मात्र घटनेनंतर पंचनामा होऊनही कृषी विभाग व वीज वितरण कंपनीचे अधिकारी विविध कारणे पुढे करून संबंधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यास टाळाटाळ करतात. अशा अधिकाऱ्यांविरुद्ध मुंबई येथे चालू अधिवेशनात आवाज उठवणार असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार आहे, असे बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी सांगितले. 
 

Web Title: Marathi news nashik news farmers loss compensation