कांद्याचे भाव गडगडले; लासलगावमध्ये चार दिवसांत 750 रुपये घसरण

कांद्याचे भाव गडगडले; लासलगावमध्ये चार दिवसांत 750 रुपये घसरण

नाशिक : गुजरात आणि राजस्थानमधील नवीन कांद्याची आवक सुरू झाल्याने कांद्याचे आगार असलेल्या लासलगाव बाजारात चार दिवसांत क्विंटलला 750 रुपयांनी भाव कोसळले आहेत. तसेच पिंपळगाव बसवंतमध्ये 450 रुपयांनी भाव घसरले. त्याचवेळी ग्राहकांना अधिक भावाने कांदा खरेदी करावा लागू नये म्हणून प्रतिटन 850 डॉलर किमान निर्यातमूल्य करण्यात आल्याने निर्यातीत घट झाली आहे. 

निर्यातमूल्य हटविण्यात आल्याने 2016-17 मध्ये विक्रमी म्हणजेच, 34 लाख 92 हजार मेट्रिक टन कांद्याची निर्यात झाली होती. यंदा आतापर्यंत 15 लाख 3 हजार मेट्रिक टन कांदा निर्यातीसाठी पाठविण्यात आला आहे. लासलगावमध्ये 5 जानेवारीला दीड हजार ते 3 हजार 800 आणि सरासरी 3 हजार 540 रुपये क्विंटल या भावाने कांदा विकला गेला होता. दोन दिवसांत इथे सरासरी भाव 3 हजार 100 रुपये असा निघाला. काल (ता. 9) 22 हजार 724 क्विंटल कांदा दीड हजार ते 3 हजार 463 आणि सरासरी 2 हजार 900 रुपये क्विंटल भावाने शेतकऱ्यांना विकावा लागला. 

आज 18 हजार क्विंटल कांद्याची दीड हजार ते 3 हजार 200 आणि 2 हजार 750 रुपये क्विंटल या भावाने विक्री झाली. पिंपळगाव बसवंतमध्ये 5 जानेवारीला क्विंटलभर कांद्याचा सरासरी भाव 3 हजार 251 रुपये असा राहिला होता. आज इथे 2 हजार 800 रुपये क्विंटल या सरासरी भावाने शेतकऱ्यांना कांदा विकावा लागला आहे. 

जागतिक बाजारपेठेमध्ये प्रतिटन 300 ते 350 डॉलर या भावाने कांदा विकला जात आहे. भारतीय कांद्याचे किमान निर्यातमूल्य 850 डॉलर असल्याने ग्राहक मिळणे मुश्‍कील झाले आहे. सध्यस्थितीत देशांतर्गत कांद्याची आवक वाढत आहे. त्यातच कांद्याला चांगला भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी उन्हाळ कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. त्यामुळे देशाच्या गरजेच्या 50 लाख टनांचे अधिक उत्पादन अपेक्षित आहे. त्यामुळे केंद्र सरकारने किमान निर्यातमूल्य हटविणे आवश्‍यक आहे. 
- चांगदेवराव होळकर, माजी अध्यक्ष, नाफेड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com