श्री क्षेत्र मांगीतुंगी पर्वतावरील जमीन मूर्तीनिर्माण समितीकडे सुपूर्द

रोशन खैरनार
बुधवार, 21 फेब्रुवारी 2018

सटाणा (नाशिक) : जगभरातील जैन बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या तीर्थक्षेत्र श्री मांगीतुंगी (ता.बागलाण) येथे अखंड पाषाणात उभारण्यात आलेल्या भगवान ऋषभदेव यांच्या जगातील सर्वात उंच 108 फुट मूर्तीपर्यंत भाविकांना जाण्यासाठी शासनाने 2.73 हेक्टर वनजमीन मुर्तीनिर्माण समितीला दिली आहे. यासंदर्भात शासनाकडून आदेश प्राप्त होताच वनविभागाने हा रस्ता भाविकांसाठी खुला केला आहे. त्यामुळे या ऐतिहासिक मूर्तीपर्यंत थेट दर्शनाची सोय होणार असल्याने भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

सटाणा (नाशिक) : जगभरातील जैन बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या तीर्थक्षेत्र श्री मांगीतुंगी (ता.बागलाण) येथे अखंड पाषाणात उभारण्यात आलेल्या भगवान ऋषभदेव यांच्या जगातील सर्वात उंच 108 फुट मूर्तीपर्यंत भाविकांना जाण्यासाठी शासनाने 2.73 हेक्टर वनजमीन मुर्तीनिर्माण समितीला दिली आहे. यासंदर्भात शासनाकडून आदेश प्राप्त होताच वनविभागाने हा रस्ता भाविकांसाठी खुला केला आहे. त्यामुळे या ऐतिहासिक मूर्तीपर्यंत थेट दर्शनाची सोय होणार असल्याने भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

गणिनीप्रमुख ज्ञानमती माताजी यांची श्री क्षेत्र मांगीतुंगी पर्वतावर पूर्वमुखी भगवान ऋषभदेव यांची अखंड पाषाणात 108 फुट उंच मूर्ती उभारावी, अशी इच्छा होती. ज्ञानमती माताजी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वामी रवींद्रकीर्ती महाराज, महामंत्री डॉ.पन्नालाल पापडीवाल, इंजिनिअर सी. आर. पाटील यांनी सन 2002 मध्ये भगवान ऋषभदेव 108 फुट मूर्ती निर्माण समिती स्थापन करून या कामाची सुरुवात केली. तब्बल पंधरा वर्ष मांगीतुंगी पवर्तावर उत्खननाचे काम करून अखंड पाषाणाचा शोध लावण्यात आला. त्यानंतर भगवान ऋषभदेवांची 108 फुट उंच मूर्ती कोरण्यात आली. तीनशेहून अधिक मूर्तिकारांनी अविरतपणे काम करून मूर्तीचे काम पूर्ण केले. फेब्रुवारी 2016 मध्ये केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप अध्यक्ष अमित शहा, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आदी मान्यवरांच्या हस्ते महामस्तकाभिषेक सोहळा साजरा करून मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली होती. या सोहळ्यास जगभरातील पन्नास लाखाहून अधिक भाविकांनी हजेरी लावली होती.

दरम्यान, महामस्तकाभिषेक सोहळ्यावेळी काही ठराविक भाविकांना थेट मूर्तीपर्यंत जाण्यासाठी समितीने वाहनव्यवस्था केली होती. मात्र सोहळा आटोपल्यानंतर पर्वतावर थेट वाहनाने जाण्यासाठी तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने हा मार्ग बंद करण्यात आला होता. तेव्हापासून हा मार्ग बंद करण्यात आल्याने भाविक थेट दर्शनापासून वंचित होत होते. सर्व भाविकांना सुलभ पद्धतीने दर्शन व्हावे याकरिता पीठाधीश स्वामी रवींद्रकीर्ती महाराज, महामंत्री पन्नालाल पापडीवाल, अध्यक्ष संजय पापडीवाल, सी.आर.पाटील, जीवनप्रकाश जैन यांनी शासनाकडे पाठपुरावा करून तात्काळ प्रस्ताव सादर केला होता. संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी याबाबत वेळोवेळी पाठपुरावा केल्यानंतर केंद्र सरकारच्या वने आणि पर्यावरण मंत्रालयाने मान्यता दिली. केंद्र शासनाच्या निर्णयानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही मुर्तीनिर्माण समितीने सादर केलेल्या या प्रस्तावास ता.12 फेब्रुवारी मंत्रीमंडळाच्या बैठकीत अंतिम मंजुरी दिली आहे. हा आदेश नुकताच वन विभागाला प्राप्त झाला असून त्यानुसार पीठाधीश स्वामी रवींद्रकीर्ती महाराज, डॉ.पन्नालाल पापडीवाल, सी.आर.पाटील, संजय पापडीवाल, जीवनप्रकाश जैन, प्रमोद जैन, पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या उपस्थितीत नारळ वाढवून पर्वतावर जाण्याचा मार्ग खुला करण्यात आला आहे. शासनाच्या या आदेशामुळे देशभरातून येणाऱ्या भाविकांची मोठी सोय होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi news nashik news mangitungi hill government temple