'मोक्का'तील गुन्हेगारास पोलिसांकडून अटक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जानेवारी 2018

नांदगाव/न्यायडोंगरी : रस्ता लूट, खंडणी, खून अशा प्रकारातील मोस्ट वाँटेड फरार असलेला 'मोक्का'अंतर्गत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात नगर, नाशिकच्या संयुक्त कारवाईला यश आले. सकाळी अकराच्या सुमाराला न्यायडोंगरी येथील कोकाटे यांच्या मोटारसायकल गॅरेजवर बॅटरीच्या चौकशीसाठी एका नव्या दुचाकीवर तिघेजण आले.

नांदगाव/न्यायडोंगरी : रस्ता लूट, खंडणी, खून अशा प्रकारातील मोस्ट वाँटेड फरार असलेला 'मोक्का'अंतर्गत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात नगर, नाशिकच्या संयुक्त कारवाईला यश आले. सकाळी अकराच्या सुमाराला न्यायडोंगरी येथील कोकाटे यांच्या मोटारसायकल गॅरेजवर बॅटरीच्या चौकशीसाठी एका नव्या दुचाकीवर तिघेजण आले.

ते आल्यानंतर लगेच त्यांच्यामागून अचानक दोन वेगवेगळ्या चारचाकी वाहनातून आठ ते दहा जण अचानक उतरले. उतरता क्षणालाच चारचाकी चालकाने त्यांच्यावर झेप घेत या दुचाकीचालकावर थेट झडपच घातली. अचानकपणाने उद्भवलेल्या या प्रकारामुळे उपस्थित भयभीत झाले. मात्र, यादरम्यान तिघांपैकी अन्य दोघे या झटापटीतून निसटून जाण्यात यशस्वी झाले. नांदगाव रस्त्याकडील खंडेराव मंदिराच्या दिशेने हे दोघे पळू लागले. त्यांचा पाठलाग करण्यात आला. हा सर्व प्रकार बघून आजूबाजूला असलेल्या बघ्यांची गर्दी वाढली. सुरवातीला ऊसतोडी मजूर व त्यांना घ्यायला आलेले मुकादम यांच्यातच काही तरी घडले असावे, असा समज होता.

त्यानंतर त्यांनी ओळखपत्र दाखवत नगर पोलिस असल्याचे सांगितले. या पोलिसांनी स्पष्ट केल्यावर मग गावातील ग्रामस्थ मदतीला धावले आणि पळणाऱ्यांना महाले यांच्या घराजवळ पकडण्यात आले. हा सर्व प्रकार चित्रटात शोभावा असा होता. ज्यांना पोलिसांनी पकडले ते तिघे जण मोक्यातील फरार आरोपी असल्याचे नंतर निष्पन्न झाले.

यादरम्यान न्यायडोंगरीमधील हा थरार एकीकडे सुरु असताना दुसरीकडे जळगाव बुद्रुक शिवार व माणिकपुंज शिवारात जीवघेणा दुसरा थरारक प्रसंग उद्भवलेला होता. नांदगाव पोलिस पथक चौथ्या संशयिताला पकडण्यासाठी गेले असता त्याने शरण येण्याऐवजी पोलिसांच्या दिशेने गोळीबार सुरु केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी गोळीबार केला आणि चौथा आरोपीला ताब्यात घेण्यात आले.

नांदगाव तालुक्यातील जळगाव बुद्रुक परिसरात ज्या माणिकपुंज धरण परिसरात पोलिसांवर गोळीबार झाले त्या ठिकाणी पोलिस अधीक्षक व राज्यातील गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली.

जळगाव बुद्रुक येथील माणिकपूंज धरणावर एटीएससह पोलिस अधीक्षक दराडे, पोद्दार, नगरचे पोलिस अधीक्षक दाखल झाले. या परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले. पोलिसांनी पकडलेल्या संशयितांपैकी दोघांचे जळगाव बुद्रुकमध्ये गेल्या 5-6 महिन्यांपासून वास्तव्य होते. 

Web Title: Marathi News Nashik News MOCCA criminal arrested