जलयुक्त शिवार योजनेची प्रस्तावित कामे पूर्ण करा : वाठोडा ग्रामस्थ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जानेवारी 2018

सटाणा : बागलाण तालुक्यातील आदिवासी पश्चिम भागातील वाठोडा येथे पिण्याच्या पाण्याची भीषण पाणीटंचाई आहे. मात्र, गावात जलयुक्त शिवार योजनेच्या प्रस्तावित कामांऐवजी वनविभागातर्फे वनीकरणाची कामे सुरु झाल्याने आदिवासी ग्रामस्थांची मोठी फसवणूक झाली आहे. शासनाने गावातील पाणीटंचाई सोडविण्यास प्राधान्य देऊन जलयुक्त शिवार योजनेची मंजूर झालेली कामे पूर्ण करावी, अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता तीव्र आंदोलन छेडण्याचा संतप्त इशारा आदिवासी ग्रामस्थांनी आज गुरुवार (ता.२५) रोजी निवेदनाद्वारे दिला आहे.

वाठोडा ग्रामस्थांनी आज बागलाणचे नायब तहसीलदार विनोदकुमार चव्हाण यांची भेट घेऊन या प्रकारची माहिती दिली आणि न्याय न मिळाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. यावेळी दिलेल्या निवेदनात, बागलाण तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी व डोंगराळ भागात वाठोडा गाव आहे. केळझर येथील गोपाळसागर धरणावरील बाजूस वाठोडा गाव असल्याने पावसाच्या पाण्यावरच ग्रामस्थांना अवलंबून राहावे लागते. त्यामुळे गावात नेहमीच पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवते. शासनाने गावाचा समावेश जलयुक्त शिवार योजनेत केला होता. त्यानुसार वनविभागाने परिसरात १० पाझर तलाव, १० वनतळे व १० सिमेंट बंधाऱ्यांच्या बांधकामाचा प्रस्ताव तयार केला होता. अजूनही या योजनेच्या कामांना सुरुवात झालेली नाही. मात्र, वनविभागाने जलयुक्त शिवार योजनेच्या कामांऐवजी वृक्षारोपणासाठी खड्डे खोदण्याची कामे सुरु केली आहेत. त्यामुळे पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या ग्रामस्थांचा भ्रमनिरास झाला आहे. गावाचे वनविभागास पूर्ण सहकार्य असून, वृक्ष संवर्धनासाठी स्वतंत्र सुरक्षारक्षक उपलब्ध करून दिला आहे. मात्र, वनविभागाने प्रस्तावाप्रमाणे कामे न करता ग्रामस्थांची फसवणूक केल्याची भावना ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली आहे. 

वनविभागाने गावातील पिण्याच्या पाण्याच्या समस्येचा प्रथम विचार करून जलयुक्त शिवार योजनेच्या कामांना प्राधान्य द्यावे. त्यानंतरच वृक्षारोपण व इतर कामे हाती घ्यावी. त्यास आम्ही संपूर्ण सहकार्य करू. मात्र, आधी आमच्या पिण्याच्या पाण्याचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावावा. अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.

यावेळी भावराव भोये, चिंतामण ठाकरे, सोमनाथ ठाकरे, उमाजी ठाकरे, पंडित ठाकरे, शिवा ठाकरे, गनू ठाकरे, तुळशीराम पवार, उलुशा ठाकरे, देवराम भोये, वसंत अहिरे, महादू कामडी, सुभाष ठाकरे, संपत गांगुर्डे, मधुकर गांगुर्डे, नानाजी ठाकरे, छगन ठाकरे, दीपक ठाकरे रोहिदास पवार आदींसह शेकडो आदिवासी ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Marathi News Nashik News pending work final vathoda villagers