पाच हजारावर येवलेकरात रंगले सप्तरंगी रंगयुद्ध

संतोष विंचू
बुधवार, 7 मार्च 2018

१८ व्या शतकापासून येथे हे सामने रंगतात, शिलेदार बदलले पण परंपरा मात्र वर्षागणिक दृढ होतांना दिसतेय. आज सकाळपासूनच सारे शहर रंगात बुडाले होते.याचमुळे शहरात जणू संचारबंदी लागू असल्याचे दृश्य दिवसभर होते.

येवला : आमने-सामने आलेले १५-२० ट्रक्टर..प्रत्येक ट्रालीत रंगाने भरलेले टीप अन दहा ते पंधरा युवक तर मोकळ्या पटांगणातही एकत्रित आलेले हजारो शौकीन येवलेकर..

सगळ्यांकडून एकमेकावर होणारी रंगांची उधळण तीही प्रेम व स्नेहपूर्वक...असे जगावेगळे अन नजरेत साठवून ठेवावे असे चित्र येथे मंगळवारी टिळक मैदान व डी.जी.रोड वर लक्ष वेधून घेत होते.निमित ठरले होते ते रंगपंचमीनिमित्त झालेल्या सामन्याचे..!

१८ व्या शतकापासून येथे हे सामने रंगतात, शिलेदार बदलले पण परंपरा मात्र वर्षागणिक दृढ होतांना दिसतेय. आज सकाळपासूनच सारे शहर रंगात बुडाले होते.याचमुळे शहरात जणू संचारबंदी लागू असल्याचे दृश्य दिवसभर होते.

किंबहुना प्रचंड गर्दीत भरणारा आठवडे बाजार देखील आज सुनासुना राहिला.चौकाचौकात ध्वनिक्षेपकावर सुरात सूर मिळवून युवक रंगाची उधळण करीत होते.सांयकाळी पाचनंतर टिळक मैदानात रंगाचे सामने रंगले.पाच वाजता पहिला सामना येथे सुरु झाला.पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मैदानातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. श्रीफळ वाढवून तसेच फटाक्यांची आतीषबाजी व हवेत फुगे सोडण्यात येवुन रंगांच्या सामन्यास सुरुवात झाली.हलकडी, ढोल या पारंपारीक वाद्याच्या तालावर अबालवृद्धांनी वयाचे भान विसरुन ठेका धरत ह्या सामन्यांचा आनंद लुटला.यावेळी काहींनी लाठ्या काठ्या फिरवुन प्रात्यक्षिकेही सादर केली.टिळक मैदानात ट्रॅक्टर व त्यात रंगांनी भरलेले ३० ते ४० टीप होते. हे समोरासमोर आले अन्‌ रंगोत्सवाला सुरवात झाली.बादल्यांनी रंग फेकून एकमेकांवर रंगाची उधळण होत होती.नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे रंगाचा हा सामना अधिकच रंगला.ट्रॅक्टवर समोरासमोर आल्यानंतर रंग फेकण्यासाठी प्रत्येक जण तुटून पडला होता.ट्रॅक्टर रिकामा झाला की लगेचच गावाबाहेर शेतकऱ्याकडून ट्रॅक्टमरमधील टिपात पाणी भरून रंग बनवून पुन्हा सामन्यात सहभाग घेतला जात होता.तासभर सुरू असलेला हा सामना नवचैतन्याच्या धुंदीतच थांबला.या सामन्यात पदाधिकारी,तालमीचे कार्यकर्ते,मित्र मंडळे व नागरिक प्रचंड संख्येने सहभागी झाले होते.

त्यानंतर परंपरेनुसार दुसरा सामना खेळण्यासाठी डी.जी. रोड येथे तालीम,मंडळे व युवा वर्ग आपले ट्रॅक्टर घेऊन येथील पटांगणात आले.येथे नवभारत मित्र मंडळाचे अविनाश कुक्कर यांनी सर्वांचे स्वागत केले. श्रीफळ वाढवून सामन्यास सुरुवात झाली.नवभारत मित्र मंडळाच्या वतीने याठिकाणी डी.जे.ची व्यवस्था करण्यात आली होती.गाण्याच्या तालावर ठेका धरत हजारोंच्या संख्येने उपस्थितांनी सामन्याचा आनंद लुटला.दोन्ही ठिकाणचे सामने पाहण्यासाठी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.परिसरातील घराच्या बाल्कनी, गच्ची प्रेक्षकांनी तुडुंब भरल्या होत्या.टिळक मैदान व डी.जी.रोड या दोन्ही ठिकाणी धोंडीराम वस्ताद तालीम संघ,बालाजी मित्र मंडळ,खंडेराव मित्र मंडळ,बुंदेलपुरा व्यायामशाळा,परदेशपुरा तालीम संघ,दत्त व्यायाम शाळा,पाटीलवाडा मित्र मंडळ,नवजवान मित्र मंडळ,खंडू वस्ताद तालीम संघ,जय भवानी तालीम संघ,काटा मारुती तालीम संघ,संत नामदेव व्यायाम शाळा,नवभारत मित्र मंडळ,कलाविहार ग्रुप,अष्टविनायक ग्रुप,गुजराथी मंडळ,गजराज मंडळ,बजरंग मित्र मंडळ आदिसह मंडळानी या सामन्यात सहभाग घेतला.

Web Title: Marathi news Nashik news Rangpanchami in Yeola

टॅग्स