शरद पवारांच्या सभेनंतर भाजपला आली जाग 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 मार्च 2018

नाशिक - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुक्तपणे बोलतात, पण पदरात काही देत नाहीत, असा चिमटा काढत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या दत्तक नाशिकच्या घोषणेबद्दल चौफेर टीकास्त्र सोडले होते. त्यानंतर रविवारी (ता. 11) भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांना जाग आल्याचे चित्र संवादाच्या कार्यक्रमातून पुढे आले. 

नाशिक - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुक्तपणे बोलतात, पण पदरात काही देत नाहीत, असा चिमटा काढत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या दत्तक नाशिकच्या घोषणेबद्दल चौफेर टीकास्त्र सोडले होते. त्यानंतर रविवारी (ता. 11) भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांना जाग आल्याचे चित्र संवादाच्या कार्यक्रमातून पुढे आले. 

भाजपचे शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांनी पक्षाच्या "वसंत-स्मृती' कार्यालयात पक्षाच्या आदेशानुसार हा संवादाचा कार्यक्रम घेतला. आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी राज्याच्या अर्थसंकल्पातील तरतुदी सांगत विरोधकांवर टीका केली. मग "दत्तक नाशिकला काय मिळाले ते सांगा,' असा प्रश्‍न पत्रकारांनी करताच, शहराध्यक्षांना प्रकर्षाने आठवली ती स्मार्टसिटी योजना. विधिमंडळ अधिवेशनात नाशिकसाठी चांगली तरतूद मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच प्रा. फरांदे यांनी गावठाण विकासासाठी मागविलेला अहवाल, एलईडी दिव्यांचे काम, भविष्यात चांगली केली जाणारी बससेवा याबद्दलची माहिती दिली. 

मुख्यमंत्र्यांची घेणार भेट 
कौशल्य विद्यापीठ सहा विभागांत होणार असल्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केले आहे. तरीसुद्धा नाशिकला मिळावे म्हणून लवकरच पक्षाचे आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत, अशी माहिती संवादावेळी देण्यात आली. शिवाय सरकारी वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रम, प्रक्रिया उद्योगांसाठीचा अल्पसा निधी, शैक्षणिक वर्ष संपत आले, तरीही विद्यार्थ्यांना न मिळालेली शिष्यवृत्ती या प्रश्‍नांचे काय, असे विचारल्यावर आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे सांगत संवादाच्या कार्यक्रमावेळी वेळ मारून नेण्यात आली. पक्षाचे प्रवक्ते प्रा. सुहास फरांदे, नाना शिलेदार, उत्तम उगले, पवन भगूरकर, जिल्हाध्यक्ष दादा जाधव आदी उपस्थित होते. 

कम्युनिस्टांना पाठिंबा देण्याची वेळ का? 
समृद्धी महामार्गाला अडथळा निर्माण करण्यासाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे नेते राजकारण करत आहेत, असा आरोप प्रा. फरांदे यांनी केला. त्याच वेळी मुंबईत धडकलेल्या किसान सभेच्या "लॉंग मार्च'ला शिवसेना, मनसे, राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आहे त्याबद्दल काय? या प्रश्‍नाला उत्तर देताना प्रा. फरांदे यांनी कम्युनिस्टांना पाठिंबा देण्याची वेळ विरोधकांप्रमाणे शिवसेनेवर का आली, असा प्रश्‍न उपस्थित करत जनतेतील जागा दिसल्याने ही वेळ त्यांच्यावर आल्याची टीका त्यांनी केली. 

आयुक्तांबद्दलच्या भूमिकेबद्दल प्रश्‍नचिन्ह 
विरोधकांचा दबाव अन्‌ नाशिककरांच्या नाराजीच्या पार्श्‍वभूमीवर अव्वाच्या सव्वा करवाढीचा प्रस्ताव फेटाळत महापालिकेत "तुकाराम' बीजेला भाजपचा "दे धक्का' शहरवासीयांनी अनुभवला. आठ दिवसांनंतर रविवारी आमदार फरांदे यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या शिस्तीचे कौतुक करत त्यांनी आयुक्तांना नाशिककरांकडून पाठिंबा मागितलाय. महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, शहराध्यक्षांच्या उपस्थितीत आमदार फरांदे आयुक्तांबद्दल बोलत होत्या. मात्र शहराध्यक्षांनी त्याविषयी काहीही भाष्य केले नसल्याने आयुक्तांबद्दलच्या भाजपच्या भूमिकेबद्दल प्रश्‍नचिन्ह कायम असल्याचे स्पष्ट झाले. 

Web Title: marathi news nashik news sharad pawar bjp