भौतिक सुखाचा त्याग करीत सतरा वर्षीय तनिष्क घेणार दीक्षा

दिगंबर पाटोळे
रविवार, 21 जानेवारी 2018

या कालावधीत तनिष्कने नाशिक, मुंबई, अमदाबाद, पालीताना असा जैन साधु-संता बरोबर पदभ्रमन केल्याने त्याच्यावर जैन धर्मशास्त्राचा अधिकच प्रभाव पडत गेला. आणि तनिष्कने जैन धर्माच्या कार्यासाठी आपले उर्वरीत जीवन घालविण्यासाठी दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला.

वणी : बालवयातच सर्व एेहिक व भौतिक सुखाचा त्याग करीत सतरा वर्षीय तनिष्क समदडिया जैन धर्मशास्त्रानुसार उद्या ता. २२ रोजी पालीताना (गुजरात) येथे दीक्षा घेत असून, वणीतील शेकडो जैन बांधव पालीतान्यास दीक्षा विधी कार्यक्रमासाठी रवाना झाले आहेत.

येथील प्रतिष्ठित व्यापारी अल्केश समदडिया यांचा एकुलता एक तनिष्क समदडिया उद्या (ता. २२) जैन धर्माची दीक्षा घेऊन धर्माचा प्रचार व प्रसार करण्याचा मार्ग अंगीकारत आहे. तनिष्कचे शिक्षण नववीपर्यंत झालेले आहे. तीन वर्षापूर्वीच तनिष्कचे चुलते अनिल समदडिया यांची कन्या प्रेरणा समदडीया यांनी दीक्षा घेतलेली आहे. तेव्हापासून आपल्या चुलत बहिणीच्या (साध्वी विनम्रप्रीयाजी ) दीक्षा विधीनंतर तनिष्कवरही जैन धर्माचा व जैन संताच्या विचाराचा प्रभाव पडल्याने तीन वर्षांपासून तनिष्कही जैन संताच्या सानिध्यात वावरु लागला.

या कालावधीत तनिष्कने नाशिक, मुंबई, अमदाबाद, पालीताना असा जैन साधु-संता बरोबर पदभ्रमन केल्याने त्याच्यावर जैन धर्मशास्त्राचा अधिकच प्रभाव पडत गेला. आणि तनिष्कने जैन धर्माच्या कार्यासाठी आपले उर्वरीत जीवन घालविण्यासाठी दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. यावेळी तनिष्कच्या पालकांनी जैन धर्माची असलेली कडक साधना, उपासना आदीची माहिती देऊन त्यांस समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र तनिष्कने आपल्या निर्णयावर ठाम राहिला. दरम्यान, जैन संतानीही तनिष्कचे दीड-दोन वर्ष परीक्षण करुन कुटुंबीयांनी दिलेल्या संमतीनुसार दीक्षाविधीसाठी अनुमती दिली. त्यानुसार वणी येथे ता. १२ जानेवारीपासून तनिष्कची दीक्षाविधीपूर्व असलेले वरघोडा मिरवणूक, विदाई, मातृ-पितृ-पूजन, महिला संगीत आदी कार्यक्रम संपन्न होऊन १५ जानेवारी रोजी गृहत्याग करुन दीक्षा विधीसाठी पालिताना येथे रवाना झाला होता.

दरम्यान, आज ता. २१ रोजी सकाळी ९ ते १२ या वेळेत पालिताना येथे तनिष्क व त्याच्या सोबत विविध ठिकाणच्या १३ दीक्षार्थींची जैन साधु साध्वींच्या उपस्थित भव्य वरघोडा मिरवणूक काढण्यात आली. दुपारी परमपूज्य पुण्यपाल सुरीश्वरजी महाराज यांचे प्रवचन संपन्न होऊन दीक्षार्थींना दीक्षा विधी संपन्न झाल्यानंतर दैनंदिन वापरावयाचे वस्त्र, वस्तू (आेघा) यांचा चढावा संपन्न झाला.

दीक्षार्थीना शेवटचे कुटुंबीयांसमवेत सांसारिक जेवण ग्रहन केले. उद्या, ता. २२ रोजी पहाटे चारच्या मुहूर्तावर परमपूज्य पुण्यपाल सुरीश्वरजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो जैन साधू साध्वीजी व जैन बांधवाच्या उपस्थित दीक्षाविधी संपन्न होत आहे. 

Web Title: Marathi news Nashik news tanishk will take diksha