टोमॅटोला दर नसल्याने तोडणी बंद, उत्पादन खर्चही निघणे झाले मुश्कील 

रोशन भामरे 
गुरुवार, 15 मार्च 2018

तळवाडे दिगर (नाशिक) : सध्या टोमॅटोला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्यातील शेतकऱ्यांना टोमॅटो तोडणी बंद करण्याची वेळ आली आहे. परिसरातील तळवाडे दिगर, किकवारी, दसाणे, केरसाने, मोरकुरे, पठावे, डांगसौंदाणे, जोरण आदी गावातील शेतकऱ्यांनी टोमॅटोला चांगला बाजारभाव मिळेल, या आशेने मोठ्या प्रमाणात लागवड केली; मात्र सध्या टोमॅटोस अतिशय कमी बाजारभाव मिळत आहे.

तळवाडे दिगर (नाशिक) : सध्या टोमॅटोला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्यातील शेतकऱ्यांना टोमॅटो तोडणी बंद करण्याची वेळ आली आहे. परिसरातील तळवाडे दिगर, किकवारी, दसाणे, केरसाने, मोरकुरे, पठावे, डांगसौंदाणे, जोरण आदी गावातील शेतकऱ्यांनी टोमॅटोला चांगला बाजारभाव मिळेल, या आशेने मोठ्या प्रमाणात लागवड केली; मात्र सध्या टोमॅटोस अतिशय कमी बाजारभाव मिळत आहे.

या बाजारभावात शेतकऱ्यांच्या झालेला खर्चसुद्धा निघत नाही. कारण टोमॅटो पिकला औषध फवारणी, बांधणी, मल्चिंग पेपर, तसेच मांडव व तोडणी असा एकरी एक लाख रुपये खर्च करूनही आज टोमॅटो  तीन-चार रुपये प्रतिकिलो दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांचा खर्चही निघत नाही.त्यामुळे टोमॅटो तोडून बाजारात विक्रीसाठी नेली असता त्याचा खर्चसुद्धा निघत नाही व उलट शेतकऱ्यांना पदरचे पैसे भरावे लागतात. गेली दोन-तीन वर्ष टोमॅटो पिकामध्ये शेतकऱ्यांना फटका बसत आहे. पूर्वी नगदी पिक म्हणून टोमॅटो ओळखला जात होता. परंतु हल्ली कोणत्याही कारणाने टोमॅटो दर मिळत नाही.

या पिकला खर्च मोठ्या प्रमाणावर येतो. तसेच काळजीही घ्यावी लागते. दर न मिळाल्याने मोठे कर्ज शेतकऱ्यांच्या अंगावर येते. टोमॅटो हा नाशवंत पिक असल्यामुळे ते साठवून ठेवता येत नाही तरी देखील परिसरातील बहुतेक शेतकऱ्यांनी आपल्या टोमॅटो शेतात तोडणी बंद केली आहे. त्यामुळे शेतात टोमॅटो खच पडला असून शेत लाल दिसू लागले आहेत. शेतकऱ्यांना पहिल्या आठवड्यात कांद्याला चांगला बाजारभाव मिळाला. मात्र गेल्या दोन दिवसात कांद्याचेही बाजारभाव उतरल्याने कांद्याबरोबर टोमॅटोनेही शेतकऱ्यांना रडवले.

कोणत्याही पिकला चांगला बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरीवर्ग आणखीच अडचणीत सापडला आहे.आत्ता शेती करायची तरी कशी आणि पिक घ्यावे तरी काय असा गंभीर प्रश्न शेतकरी वर्गापुढे उभा राहिला आहे.

सद्या तळवाडे दिगर व परिसरातील टोमॅटो उत्पादक शेतकरी आपला माल सुरत, नावपूर, नंदूरबार, मालेगाव, बिल्ली मोरा आदी शहरात विक्रीसाठी नेत आहे. मात्र, तिथे प्रती क्रेटस (जाळी) सरासरी ५० ते ६० दर मिळत असून माल नेण्याचे भाडे ४५ ते ५० रुपये त्यात तोलाई,वाराई,हमाली जाते तर शेतकऱ्यांना टोमॅटो तोडणीसाठी १५ रुपये प्रती क्रेटस खर्च येतो म्हणजे टोमॅटो बाजारातपर्यंत नेण्यासाठीची ५० ते ६० रुपये खर्च येतो तेवढाच भाव मिळत असल्यामुळे बाकीचा खर्च घरातून टाकण्याची वेळ आज टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांवर आली आहे.

टोमॅटो उत्पादनासाठी साधारणता एकरी खर्च 
जमिनीची मशागत                                 ६ ते ८ हजार रुपये 
मल्चिंग पेपर                                         १० ते १२ हजार रुपये 
ठिबक सिंचन                                         ८ ते १० हजार रुपये 
रोप                                                      ८ ते १०  हजार रुपये 
औषध फवारणी                                      २० ते २५ हजार रुपये 
खत/ जमिनीतून दिले जाणारे खते             २५ ते ३० हजार रुपये 
मंडपासाठी बाबू                                      २० ते २५ हजार रुपये 
तार                                                      ६ ते ८ हजार रुपये 
सुतळी                                                   ६ ते ८ हजार रुपये 
लागवडी पासून काढणी पर्यंत मंजूर            २५ ते ३० हजार रुपये

Web Title: Marathi news nashik news tomato no value production value