नाशिक-पुणे रेल्वे 3 वर्षात आणणार "ट्रॅक'वर : गिरीश महाजन

residentional photo
residentional photo

नाशिक ः नाशिक-पुणे हा महत्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लावत तीन वर्षांमध्ये रेल्वे "ट्रॅक'वर आणली जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज दिली.

नाशिक-पुणे रेल्वेचा प्रकल्प अहवाल अंतीम टप्प्यात असून सविस्तर सर्वेक्षण, भूसंपादन, निविदा प्रक्रिया होण्यासाठी कालबद्ध नियोजन अपेक्षित आहे. त्यादृष्टीने सर्व संबंधित विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक मुंबईत घेण्यात यावी, अशी विनंती श्री. महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वेमंत्री पियूष गोयल यांना पत्र लिहून केली आहे. 

मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाचा सामंजस्य करार झाल्याने पालकमंत्री म्हणून श्री. महाजन यांनी श्री. फडणवीस आणि श्री. गोयल यांचे आभार मानले आहेत. या नव्या रेल्वेमार्गामुळे नाशिक शहर आणि जिल्ह्याच्या विकासाला हातभार लागेल, असे स्पष्ट करुन श्री. महाजन म्हणाले, की राज्य सरकारने नाशिक जिल्ह्यातील तीन मोठे प्रकल्प "कॉस्ट शेअरिंग बेसीस'वर नव्या प्रकल्पासाठी प्रस्तावित केले. त्यांच्या कामाची सुरुवात "महारेल', या राज्य सरकार आणि रेल्वे मंत्रालयाच्या संयुक्त कंपनीच्या माध्यमातून होणार आहे.

मुळातच, नाशिक-पुणे रेल्वेमार्ग हा नाशिककरांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. नाशिक-पुणे-मुंबई या सुवर्णत्रिकोणात पुण्यात मोठ्याप्रमाणात औद्योगिकीकरण झाले. आता पुण्यात जागेची फारशी उपलब्धता नाही. त्यामुळे नाशिक-पुणे रेल्वेमार्गाने नाशिकच्या विकासाला मोठी संधी उपलब्ध होईल. 
 
6 तासाचा प्रवास येणार अडीच तासावर 
नाशिक-पुणे या रेल्वेमार्गाने 248 किलोमीटर अंतर अडीच तासात पार केले जाईल. त्यामुळे वाढत्या वाहतुकीमुळे नाशिक ते पुणे प्रवासाला लागणाऱ्या सहा तासाच्या वेळेत बचत होईल. इंधन खर्च आणि प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे. शिवाय रस्ते अपघातांवर नियंत्रण मिळवत रेल्वेस्थानकांवर सौर ऊर्जेची निर्मिती होईल. त्यामुळे "कार्बन क्रेडीट'च्या माध्यमातून जागतिकस्तरावर पर्यावरण विषयक फायदे मिळतील.

 रेल्वे मंत्रालयाने आता नवीन कोचेस 220 किलोमीटर प्रति तास धावण्याच्या क्षमतेचे आणूनही रेल्वेट्रॅक ची क्षमता निम्मी असल्याने त्या अपेक्षित वेगाने धावू शकत नाहीत. हा प्रश्‍न नवीन लोहमार्गात दूर होणार असतानाच नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब केल्याने रेल्वेगाडीचा वेग दुपटीने वाढेल. मुळातच, नाशिक-पुणे हा पहिला लोहमार्ग नवीन तंत्रज्ञानाने बनवला जाईल, हे कौतुकास्पद आहे. त्यासाठी सरकार साडेसात हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे, असेही श्री. महाजन यांनी म्हटले आहे. 

गिरीश महाजन म्हणतात... 
-दळणवळणाच्या जलद सुविधेने नाशिकचा औद्योगिक, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक व स्मार्ट विकासाला होईल. शिवाय रोजगार निर्माण होऊन स्थानिक तरुणांना संधी उपलब्ध होतील. 
- नाशिक-पुणे आणि इगतपुरी-मनमाड 124 किलोमीटर लांबीच्या तिसऱ्या रेल्वेमार्गाचे काम प्रस्तावित आहे. मनमाड-इंदूर या नवीन मार्गामुळे नाशिकच्या औद्योगिक विकासाला हातभार लागेल. 
- 8 ऑगस्ट 2017 ला सुरु झालेल्या महाराष्ट्र रेल्वे मूलभूत सुविधा विकास कंपनी लिमिटेड "महारेल' चे कामकाज जोमाने सुरू झाले आहे. या कंपनीने मोठ्या प्रमाणात कामे हाती घेतली आहेत. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com