महामार्गावरील खड्डे जीवघेणेच; आणखी एकाचा मृत्यु 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 डिसेंबर 2019

महामार्गावरील खड्डा चुकविण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. यात पिकअप गाडी रस्त्याच्या डाव्या बाजूला खाली ब्रासमध्ये उतरून पलटी झाली.

पारोळा : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर दळवेल गावाजवळील गुडलक पंपादरम्यान खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात पिकअप गाडी चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. तर तीन जण जखमी झाल्याची घटना आज घडली. 
फागणे गावाहून जळगांवकडे जाणारी पिकअप गाडी (क्र एम. एच. 18, बी. जी. 4524) यावरील चालक महेंद्र अरुण पाटील यांचेसह केबिनमध्ये बसलेला इस्लामुद्दीन गुलाम वारीस (रा.खुदागंज सितापुर, उत्तरप्रदेश), सुशीलकुमार व गणेश गुंजाळ (रा. पथराळ) हे चौघेही होते. दरम्यान दळवेल गावाजवळील गुडलक पंपामागे चालक महेंद्र अरुण पाटील (रा. पिंप्राळा, जळगाव) याने महामार्गावरील खड्डा चुकविण्याचा प्रयत्न केला.

हेही पहा > वडिलांवर कर्ज मुलाने संपविले जीवन 

या प्रयत्नात चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. यात पिकअप गाडी रस्त्याच्या डाव्या बाजूला खाली ब्रासमध्ये उतरून पलटी झाली. यात इस्लामुद्दीन गुलाम वारीस दाबला गेल्याने त्याचा जागीच मृत्यु झाला. तर चालक महेंद्र पाटील व सुशील कुमार यांना जबर दुखापत झाली आहे. सदर घटनेची माहिती कळताच रुग्णवाहिका चालक ईश्वर ठाकूर व शरद पाटील यांनी जखमींना उपचारासाठी कुटीर रुग्णालयात आणले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. परंतु जबर दुखापतीमुळे त्यांना पुढील उपचारासाठी धुळे येथे हलविण्यात आले. सदर घटनेबाबत ग्रामस्थांसह पोलिसांनी धावपळ करत महामार्ग मोकळा केला. याबाबत आरोपी पिकअप गाडीचालक महेंद्र अरुण पाटील यांच्याविरुद्ध गणेश गुंजाळ यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार अशोक कुणबी करत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news national haiway pickup van accident