२९ लाखाचा अपहार : उपकोषागार कार्यालय कर्मचाऱ्यास चार वर्ष शिक्षा 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 31 October 2020

नवापूर उपकोषागार कार्यालयातील कनिष्ठ लिपिक इंदेलसिंग महारू जाधव (बंजारा) याने ११ जून २०१८ ला कार्यालयातील संगणक प्रणालीत तहसीलदारांचे खोटे देयक तयार करून त्यात खाडाखोड करून स्वतःचे नाव टाकून बँकेच्या सूचना पत्रकावर उप कोषागार अधिकारी (नवापूर) यांच्या बनावट स्वाक्षरी केली होती.

नवापूर (नंदुरबार) : नवापूर तहसीलदाराचे खोटे देयक तयार करून २९ लाखांचा अपहार करणाऱ्या उपकोषागार कार्यालयातील कनिष्ठ लिपिक इंदेलसिंग महारु जाधव (बंजारा) यास न्यायालयाने चार वर्षे शिक्षा व चार हजार रुपये दंड तर बँक कर्मचारी विनय किशनसिंह रावत यास एक वर्ष शिक्षा व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. जिल्हा सत्र न्यायालयाचे न्या.व्ही.जी.चव्हाण यांनी आज या खटल्याचा निकाल दिला. 
नवापूर उपकोषागार कार्यालयातील कनिष्ठ लिपिक इंदेलसिंग महारू जाधव (बंजारा) याने ११ जून २०१८ ला कार्यालयातील संगणक प्रणालीत तहसीलदारांचे खोटे देयक तयार करून त्यात खाडाखोड करून स्वतःचे नाव टाकून बँकेच्या सूचना पत्रकावर उप कोषागार अधिकारी (नवापूर) यांच्या बनावट स्वाक्षरी केली होती. बँकेचे सूचना पत्रक भारतीय स्टेट बँकेच्या नवापूर शाखेत सादर करून शासनाच्या तिजोरीतून २९ लाख रूपये स्वतःच्या खात्यात जमा करून घेतले होते. हा प्रकार लक्षात आल्यावर तत्कालीन अप्पर कोषागार अधिकारी प्रकाश बानकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नवापूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

टप्‍प्‍याटप्‍प्‍याने काढली रक्‍कम
तक्रारीनंतर पोलिसांनी लिपिक जाधव यांना अटक केली होती. तसेच स्टेट बँक प्रशासनाविरुद्धही तक्रार दिली होती. त्यानंतर बॅंकेने याबाबत चौकशी केली. त्यात १२ जून २०१८ ला जाधव याने त्याचा खात्यातून एटीएमद्वारे दोन टप्प्यात ८० हजार रूपये काढले होते. त्यानंतर २५ लाख रोकड काढले. असे २५ लाख ८० हजार त्याने काढले होते. माहिती उजेडात येताच तिसऱ्या दिवशी जाधव याचे बॅंक खाते गोठविण्यात आले. त्यावेळी त्याचा खात्यातून २२ लाख १४ हजार रूपये मुद्देमाल ताब्यात घेतला. मात्र त्याने तीन लाख ६६ हजार रूपये खर्च केले होते. 

दोषारोप सिद्ध
या घटनाक्रमानुसार पोलिसांनी तपास करून त्याचे दोषारोषपत्र न्यायालयाकडे सादर केले होते. त्यावर जिल्हा सत्र न्यायाधीश व्ही.जी.चव्हाण यांच्या समोर आज (ता.३१) सुनावणी झाली. प्राप्त पुराव्यावरून इंदलसिंग जाधव यास चार वर्षे शिक्षा व चार हजार रुपये दंड तर बँक कर्मचारी विनय किशनसिंह रावत यास एक वर्ष शिक्षा व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news navapur 29 lakh fraud case four year jail