..तर नवापूरचा आमदार भाजपचाच : खासदार हीना गावित

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 3 December 2020

पक्षाची कार्यपद्धती व संघटनात्मक रचनेतील भूमिका या विषयावर नंदुरबार येथील प्रा. पंकज पाठक व पक्षाच्या आदिवासी आघाडीचे प्रदेश सचिव अनिल वसावे यांनी २०१४ नंतर भारतीय राजकारणातील बदल, भाजप व आपले दायित्व याबाबत मार्गदर्शन केले.

नवापूर (नंदुरबार) : भाजपच्या अभ्यास वर्गात तुम्ही जे आत्मसात कराल, ते तुम्ही सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचविण्याचे काम केले, तर पुढच्या वेळी नवापूर तालुक्याचा आमदार भाजपचा असेल, असा विश्‍वास खासदार डॉ. हीना गावित यांनी व्यक्त केला. 
विसरवाडी (ता. नवापूर) येथे भारतीय जनता पक्षाचे दोनदिवसीय तालुका कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग बुधवार (ता. २)पासून सुरू झाले. त्यात अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या हस्ते प्रशिक्षण वर्गाचे उद्‌घाटन झाले. 
जिल्हाध्यक्ष चौधरी म्हणाले, की दोनदिवसीय प्रशिक्षणाला विद्यार्थ्यांप्रमाणे सहभाग घेऊन पक्षाचे ध्येयधोरण समजून घ्या. या प्रशिक्षणाचा राजकीय कारकिर्दीत उपयोग होईल. प्रशिक्षणामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला एकजूट ठेवून कोरोना महामारीचा मुकाबला केला, हे जगात एकमेव उदाहरण आहे. पक्षाची कार्यपद्धती व संघटनात्मक रचनेतील भूमिका या विषयावर नंदुरबार येथील प्रा. पंकज पाठक व पक्षाच्या आदिवासी आघाडीचे प्रदेश सचिव अनिल वसावे यांनी २०१४ नंतर भारतीय राजकारणातील बदल, भाजप व आपले दायित्व याबाबत मार्गदर्शन केले. प्रा गणेश पाटील, भाजप तालुकाध्यक्ष भरत गावित यांनीही मार्गदर्शन केले. 
डॉ. शशिकांत वाणी, आदिवासी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष नागेश पाडवी, जिल्हा सरचिटणीस राजेंद्र गावित, नंदुरबारचे संघटन सरचिटणीस नीलेश माळी, जिल्हा चिटणीस संदीप अग्रवाल, महिला मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षा संगीता गावित, अल्पसंख्याक मोर्चाचे उपाध्यक्ष एजाज शेख, सरचिटणीस दिलीप गावित, आदिवासी मोर्चाचे प्रदेश सचिव अनिल वसावे, सरचिटणीस जयंतीलाल अग्रवाल, पंचायत समिती सदस्य राजेश गावित, शहराध्यक्ष प्रणव सोनार, नगरसेवक महेंद्र दुसाने, जाकिर पठाण, रमला राणा, पदधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. भाजप शिक्षक आघाडीचे तालुकाध्यक्ष महेंद्र पाटील यांनी सूत्रसंचालन केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news navapur bjp melava and mp heena gavit statement