शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी भाजपचा आवाज; तहसीलदारांनी लागलीच काढले आदेश

सकाळ वृत्तसेवा
Friday, 28 August 2020

नंदुरबार जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना पीक कर्ज व कर्ज माफी व पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना सर्व राष्ट्रीयकृत बँका व धुळे जिल्हा मध्यवर्ती बँक यांच्या मार्फत नाहक त्रास देऊन फिरवा फिरवीचे काम होत आहे. खरीप हंगाम लक्षात घेता शेतकऱ्यांना नितांत गरज असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीचे त्वरित निराकरण करणे आवश्यक आहे.

नवापूर : तालुक्यातील शेतकऱ्यांना बँकेत अधिकाऱ्यांकडून कर्ज माफी, पीक कर्ज, व पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना दिला जाणारा नाहक त्रास बंद न झाल्यास आंदोलन करण्यात येईल, तसेच शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळावा या मागणीसाठी भाजपने निवेदन देताच तहसीलदार यांनी बँक अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शेतकऱ्यांना पीक कर्ज व इतर योजनांचा लाभ देण्याच्या सूचना केल्या. 

निवेदन देताना तालुकाध्यक्ष भरत गावित, महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक मोर्चा उपाध्यक्ष एजाज शेख, जिल्हा सरचिटणीस राजेंद्र गावित व पदाधिकारी यांनी आज तहसीलदार सुनीता जऱ्हाड व पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांना दिले. 
निवेदनात म्हटले आहे की, नंदुरबार जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना पीक कर्ज व कर्ज माफी व पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना सर्व राष्ट्रीयकृत बँका व धुळे जिल्हा मध्यवर्ती बँक यांच्या मार्फत नाहक त्रास देऊन फिरवा फिरवीचे काम होत आहे. खरीप हंगाम लक्षात घेता शेतकऱ्यांना नितांत गरज असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीचे त्वरित निराकरण करणे आवश्यक आहे. बँकेतील शेतकऱ्यांचा त्रास थांबला पाहिजे अन्यथा संबंधित शाखांसमोर आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगितले. निवेदनावर भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष भरत गावित, जिल्हा सरचिटणीस राजेंद्र गावित, महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक मोर्चा उपाध्यक्ष एजाज शेख, माजी नगरसेवक रमला राणा, प्रणव सोनार, जयंतीलाल अग्रवाल, हेमंत जाधव, जितेंद्र अहिरे, सौरव भामरे आदींच्या सह्या आहेत. 
 
बँकेच्‍या बैठकीत सुनावले खडे बोल 
भाजप पदाधिकाऱ्यांनी निवेदन देताच तहसीलदार सुनिता जऱ्हाड, सहायक निबंधक प्रताप वळवी यांनी नवापूर तालुक्यातील बँक अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. त्‍यात शासनाच्या सूचना प्रमाणे शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करावे, या बाबतीत हयगय केली तर तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना अहवाल पाठवून कार्यवाही करण्यात येईल, असे सुनावले. बैठकीला बँक ऑफ महाराष्ट्र, धुळे जिल्हा बँक, युनियन बँकेचे अधिकारी सोडून इतर बँकेच्या अधिकाऱ्यांनी पाठ फिरवली होती. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news navapur farmer pik loan nivedan in tahsil office on bjp